भाग्यश्री मुळे
कोरोनाने परीक्षा साऱ्यांची पाहिली तशीच तिचीही पाहिली. सारे व्यवहार ठप्प, घराबाहेर पडायला बंदी, शिवणकाम करून ती संसाराला हातभार लावत होती. पण ते कामही थांबलं. आता प्रश्न होता, पुढे पोटासाठी करायचं काय? तिच्या मनात आलं आपण पूर्णवेळ रिक्षा चालवली तर ? संसारात नेहमी विश्वासाने साथ देणारे पती सोमसिंग यांना तिनं आपली कल्पना सांगितली. ते म्हणाले काहीच हरकत नाही. आणि मग तिनं रिक्षेला किक मारली आणि झाली नाशिक शहरात रिक्षाचालक. तिच्या रिक्षेलाच नाही तर जगण्यालाही वाट सापडली आणि ही घरची लक्ष्मी हिमतीनं आपलं घरकुल सांभाळायला उभी राहिली. आज लक्ष्मीपूजन, भेटा या गृहलक्ष्मीला. तिच्या हिमतीची ही गोष्ट.नाशिक शहरातील पवननगर मध्ये राहणारी अश्विनी जाधव. कामगार वसाहतीत राहत असताना घर संसार सांभाळताना जमेल तसे अर्थार्जन करून पतीला साथ देत होती. कष्टाळू स्वभाव. कोविडची दुसरी लाट येण्यापूर्वी ती ब्लाऊज वगैरे शिवणकाम करून कुटुंबाला हातभार लावत होती. पण लॉकडाऊन सुरू झालं आणि तिचं शिवणकाम कमी झालं. लॉकडाऊन सारख्या गंभीर परिस्थितीत लोक नवीन कपडे कसे शिवणार म्हणा, ते स्वाभाविकच होतं पण त्यामुळे अश्विनीच्या संसाराचं आर्थिक गणित बिघडायला लागलं. कायम काहीतरी काम करणाऱ्या अश्विनीला असं रिकामं बसायची सवयही नाही. त्यातूनही तिची चिडचिड होऊ लागली. शेवटी एक दिवस तिने पतीला मी रिक्षा चालवायला घेऊ का? असं विचारलं.
पती सोमसिंग यांनी हसतमुखाने तिला होकार दिला. मालेगावजवळचं रावळगाव हे तिचं सासर तर धुळ्याजवळील शिरपूर हे तिचं माहेर. लहानपणापासून कष्ट, साधेपणा आणि धाडस यांची तिला सवय. आज हेच गुण तिच्या मदतीला धावून आले. अधूनमधून मालेगावला ये जा करताना अश्विनी रिक्षा चालवायला शिकली होती. त्याचाच आता तिला उपयोग झाला. आता पवननगर, सिडको ते सीबीएस, पंचवटी, कॉलेजरोड अशा शहरातील निरनिराळ्या उपनगरात प्रवासी घेऊन अश्विनीची रिक्षा वेगाने धावू लागली आहे. कोविड रुग्णसंख्येचा उच्चांक होता तेव्हाही अश्विनी मास्क, सॅनिटायझरसह स्वतःची काळजी घेत कोविड रुग्णांना दवाखान्यात, बरे झालेल्यांना दवाखान्यातून घरी आणण्याचं काम आत्मविश्वासाने आणि संवेदनशीलतेने करत होती. अश्विनी सांगते, “आपल्यात आत्मविश्वास असेल आणि हेतू प्रामाणिक असेल तर आपल्या प्रयत्नांना देवाचीही साथ लाभते.”अश्विनीचं 2009 साली लग्न झालं. तिला एक मुलगा, एक मुलगी असून ते चौथी आणि सहावीत शिक्षण घेत आहेत. लग्नानंतर अश्विनीने शिवणकामास सुरवात केली. कंपनीसाठी ती ग्लोव्हज शिवून द्यायची. काही वर्ष हे काम नेटाने केलं पण खर्च आणि फायदा याच गणित जुळेना. त्यामुळे ते काम थांबवलं. मग काही काळ मेसमध्ये पोळ्याही लाटल्या. चार वर्षांपासून ती घरीच शिवणकाम करत होती. रिक्षा चालवायची आवड असल्याने पैसे साठवून रिक्षा घेतली. परवानाही मिळवला. याआधी कुणाचे फोन आले तर ती तेवढी ट्रीप करून द्यायची. इतर वेळी घरकाम आणि मुलांची जबाबदारी सांभाळून शिवणकाम चालू असायचं. आता मात्र ती पूर्णवेळ रिक्षा चालवण्याचं काम करते आहे. तिला पाहताच लोक भरभरून शुभेच्छा देतात. आमचा प्रवास सुरक्षित हाती आहे अशी भावनाही व्यक्त करतात. यामुळेच कामाला आणखी हुरूप येतो असं अश्विनी सांगते. एक ट्रीप झाली की अश्विनी घरी जाऊन मुलांची चौकशी करते. त्यांना हवंनको बघते आणि पुन्हा दुसऱ्या ट्रीपला सज्ज होते. अश्विनी रडत नाही बसली आणि उभी राहिली कष्टानं, त्या जिद्दीला सलाम.
( लेखिका मुक्त पत्रकार आहेत.)