मेघना ढोके
‘पूरात अडकलेल्या माणसांना मदतीचा हात देणं ही एकमेव गोष्ट डोळ्यासमोर ठेवून मी कामाला लागले, पाणी कुठं जास्त भरलंय, पूरात जमीनीची धूप होत जमीनच वाहून गेली तिथल्या माणसांना बाहेर काढणं आव्हान होतं. फिल्ड में जायेंगे तो समझेंगे.. एवढंच मनाशी धरुन मी कामाला लागले..’ कीर्ती जल्ली सांगत असतात. आयएएस. आसामच्या काचार जिल्ह्याच्या उपायुक्त. साडी नेसून चिखलात अनवाणी चालत, बोटीतून लोकांना भेटायला जातानाचे त्यांचे फोटो देशभर व्हायरल झाले. ‘लोकमत’शी फोनवर बोलतानाही त्या म्हणत होत्या, पुरात अडकलेल्या माणसांचे जीव वाचवण्यापेक्षा महत्त्वाचं दुसरं काय आहे?
प्रचंड पुरानं आसाममध्ये हाकाकार उडाळा आहे. पुराचा सर्वाधिक फटका काचार जिल्ह्याला बसला आहे. कचर जिल्ह्यात बराक नदी उधाणलेली असताना कीर्ती यांच्या नेतृत्त्वात प्रशासनाने ३५० हून जास्त सहाय शिबीरं, ६०० हून अधिक मदत वाटप केंद्र सुरु करण्यात केली. प्रत्येक माणसाचा जीव महत्त्वाचा आहे म्हणत जेवण-पाणी-निवारा यांची व्यवस्था उभारली. राजधानी गुवाहाटीशीच नाहीतर शेजारी मेघालयाशीही संपर्क तुटलेला असताना कीर्ती यांनी अत्यंत हिमतीने नियोजन केलं हे महत्त्वाचं.
(Image : google)
कीर्ती सांगतात, गेली अनेक वर्षे इथं माणसांना पुराचा फटका बसतो आहे, प्रत्यक्ष परिस्थिती समजून घेत मदत योग्य वेळेत पोहचवायची एवढंच ठरवून मी बाहेर पडले. ’ चैत्रा नावाच्या गावात त्या गेलेल्या असतानाचे त्यांचे फोटो व्हायरल झाले. ज्या गावांनी कधी इतक्या मोठ्या अधिकाऱ्याचा चेहरा पाहिला नव्हता त्या गावात कीर्ती प्रत्यक्ष पोहचल्या यानंच स्थानिक माणसं सुखावली.
(Image : google)
कोरोनातलं लग्न आणि मराठी सासर
कोरोनाकाळशत कीर्ती यांचं लग्न झालं. ते ही सार्वजनिक सुटीच्या दिवशी. त्यांचं सासरचं आडनाव जगताप. हे कुटुंब मुळचं सासवडचं, सध्या पुण्यात स्थायिक. लग्नासाठी त्यांनी सुटी घेतली नाही, शासकीय निवासात छोटेखानी लग्न केलं. हैद्राबादहून पालकही येऊ शकले नाहीत. लग्नानंतर दुसऱ्या दिवशी त्या नोकरीवर हजर झाल्या. मात्र त्यातही त्यांना काही मोठेपणा वाटत नाही. त्या सांगतात, कुटुंबाची साथ आहे, माझी माणसं माझ्या पाठीशी आहेत म्हणून जमतं. माणसांचा जीव वाचवण्यासाठी यंत्रणा उभारणं हे माझं काम होतं तेच मी तेव्हा केलं, आताही करतेय.’