आपण लहानसहान गोष्टीवरुन अनेकदा खचतो आणि विनाकारण नाही त्या गोष्टींचा विचार करुन आपल्याच मार्गातील अडथळा ठरतो. पण काही लोक मात्र आपल्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आपले ध्येय गाठतात आणि इतरांसाठी प्रेरणाही होतात. याचेच उदाहरण म्हणजे अवघ्या ३३ वर्षांची राधिका गुप्ता ही तरुणी. जन्मत: मानेमध्ये व्यंग असल्याने राधिकाची मान थोडी वाकडी होती. यामुळे शाळेतील मुलं तिची चेष्टा करायचे. तिला वेगवेगळ्या नावानी हाक मारायचे. यावेळी राधिकाला खूप वाईट वाटायचे पण ती कोणालाच काही बोलायची नाही. राधिकाचे वडील नोकरीनिमित्त वेगवेगळ्या देशांत फिरतीवर असल्याने तिचे शिक्षण भारत, पाकिस्तान,अमेरिका आणि नायजेरिया अशा वेगवेगळ्या ठिकाणी झाले. परदेशात तिला शाळेतील मुले तिच्या भारतीय टोनिंगवरुन आणि मानेत व्यंग असण्यावरुन कायम बोलायचे. ती शिकत असलेल्या शाळेतच तिची आई शिक्षिका होती, त्यामुळे तिच्यात आणि तिच्या आईमध्ये कायम तुलना होत असायची.
राधिका अभ्यासात हुशार असल्याने तिने अभ्यासात चांगले यश मिळवले. वयाच्या बावीसाव्या वर्षी ती अमेरिकेत नोकरी शोधत असताना तिला सतत अपयश येत होते. तिने एक दोन नाही तर तब्बल ७ कंपन्यांमध्ये मुलाखती दिल्या. मात्र कोणत्याच कंपनीकडून तिची निवडी होऊ शकली नाही. त्यावेळी तिच्या डोक्यात आत्महत्या करण्याचा विचार आला आणि तिच्या मित्रमंडळींना हे समजल्यावर त्यांनी तिला मानसोपचारतज्ज्ञांकडे नेले. त्याठिकाणी तिच्यावर उपचार बरेच दिवस उपचार सुरू होते. त्याचवेळी तिला एका कंपनीकडून बोलावणे आले. या मुलाखतीसाठी ती गेली आणि तिला नोकरी मिळाली. मात्र अवघ्या ३ वर्षांत ही नोकरी सोडून ती भारतात परतली.
वयाच्या २५ व्या वर्षी भारतात परतल्यावर तिला आपला मित्र आणि पतीसोबत मॅनेजमेंट फर्म सुरू करायची होती. काही वर्षांतच त्यांनी सुरू केलेली ही फर्म एडलवाईड एमएफ या नामांकित कंपनीने टेक ओव्हर केली. यशाच्या वाटेवरुन चालत असतानाच आणखी एक संधी तिच्याकडे नकळत चालून आली. ती म्हणजे कंपनीने सीईओ पदासाठी शोधाशोध सुरू केली. त्यावेळी पतीने दिलेल्या प्रेरणेमुळे राधिका यांनी या पदासाठी अर्ज केला आणि काही महिन्यांतच कंपनीने त्यांची सीईओ पदी नियुक्ती केली. याविषयी सांगताना राधिका म्हणतात, प्रत्येकाकडे काही ना काही खास असतेच. त्यामुळे थोड्या अपयशाने कधीच निराश न होता आपण स्वत:वर आणि आपल्या क्षमतांवर कायम विश्वास ठेवायला हवा. हरुन न जाता नवनवीन मार्ग शोधून त्या मार्गानी जायला हवे.