जयंत कुलकर्णी
ऐन उमेदीत एक पाय गमावला. आपला एक पाय नाही यावर दोन वर्षे विश्वासच नव्हता. होत्याचे नव्हते झाले. डोळ्यांसमोर अंधार होता. मात्र, जवळच्या सर्वांनीच धीर दिला. त्यानंतर मी अनेक दिव्यांगांना भेटले. त्यांना भेटून वाटलं आपली समस्या त्यांच्यापेक्षा छोटी आहे. नृत्यांगना सुधा चंद्रन यांच्याकडून प्रेरणा मिळाली आणि मी ठरवलं आपल्याला एक पाय नाही. पण, धावायचं. त्या धावण्याच्या जिद्दीनं जगण्याला कलाटणी मिळाली. माझा दुसरा जन्म झाला. मी एका पायावर फक्त उभीच नाही, तर धावतेही आहे.. - किरण कनोजिया सांगत होती.
किरण म्हणजे भारताची पहिली महिला ब्लेड रनर.
औरंगाबाद येथील एमजीएम संस्थेच्या फिजिओथेरपी महाविद्यालयातर्फे किरणचा नुकताच ॲबिलिटी अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आला. त्यावेळी किरणशी तिच्या प्रवासाबद्दल, जिद्दीबदल बोलणं झालं आणि उलगडली, जगण्याची अशी काही ताकद की, वाटावं खरंच मनात आणलं तर काय अशक्य आहे. फरीदाबादची किरण. ती सांगते, २०११ पर्यंत माझं जगणं सगळ्यांसारखं नॉर्मलच सुरू होतं. आई-वडिलांनी मेहनतीने आम्हाला शिकवलं. मी इन्फोसिसमध्ये नोकरीला होते. मात्र २४ डिसेंबर २०११ रोजी माझा अपघात झाला आणि त्यावेळी डॉक्टरांनी सांगितलं की, जीव वाचवायचा तर एक पाय कापावा लागेल . पर्यायच नव्हता काही. जे झालं त्यावर विश्वासच बसत नव्हता. दोन वर्षे लागले आहे ते वास्तव स्वीकारायला. शरीराचा एक भागच गमावला, तू अजूनही मनात आणशील ते करू शकतेस असं समजावत माझे पालक प्रसिद्ध नृत्यांगना सुधा चंद्रन यांचं उदाहरण द्यायचे.
‘जान बची ते लाखो पाये’ हे खरंच होतं. २४ ला माझा अपघात झाला. २५ डिसेंबर माझा वाढदिवस. आता वाटतं माझा नवा जन्मच झाला. मेन्टली आणि फिजिकली सर्वच कठीण होते. मात्र, अनेक दिव्यांगांना भेटले. समजून स्वीकार केला आणि टेक्नॉलॉजीच्या मदतीने आपण चालू शकतो, असा विश्वास निर्माण झाला. जवळच्या लोकांनीही मला पाठबळ दिले. आव्हानाला सामोरं जात पुन्हा स्वत:च्या पायावर उभं रहायचं ठरवलं. ‘डिस ॲडव्हाॅन्टेजचे ॲडव्हॉन्टेज’मध्ये रुपांतर करायचं, स्वत:साठी संघर्ष करायचा, असा निर्धार केला.’
किरण बोलत असते. तो निर्धार तिच्या डोळ्यात आजही दिसतो.
ती म्हणतेच मी फक्त पाय गमावला, स्वप्न नाही. कृत्रिम पायाच्या बळावर मी फक्त स्वत:च्या पायावर उभीच राहणार नाही तर, पळणारही असं ठरवलं. विश्वास ठेवला स्वत:वर आणि मॅरेथॉनसारखी स्पर्धा आपण पूर्ण करूच असं स्वत:ला बजावलं. सुरुवातीला एक किलोमीटर धावण्याचा सराव केला. नंतर अंतर वाढवत नेले. २०१४ मध्ये प्रथम हैदराबाद मॅरेथॉनमध्ये २१ कि. मी. अर्धमॅरेथॉन साडेतीन तासांत पूर्ण केली. त्यावेळेस स्वप्न साकार होत असल्याचा विश्वास निर्माण झाला. २०१५ मध्ये मुंबई मॅरेथॉन २ तास ४५ मिनिटांत पूर्ण केले. आतापर्यंत विविध अंतराच्या ६ मॅरेथॉनमध्ये यशस्वी सहभाग नोंदवला. आता नाॅर्मल धावपटूंसारखे पळतेय. अपघातानंतरच मला माझ्या खऱ्या क्षमतेची ओळख झाली.’ किरणच्या बोलण्यातच एक दुर्दम्य इच्छा दिसते. वाटतंच, ठरवलं तर काय अशक्य आहे..
स्वप्न देशाचं प्रतिनिधित्व करण्याचं..
आता किरणने ४२ कि. मी. पूर्ण मॅरेथॉन पळायचं ध्येय स्वत:समोर ठेवलं आहे. त्यासाठी ती मेहनतही करतेय. मुख्य लक्ष्य पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याचे आहे. मात्र, प्रायोजक व प्रशिक्षक मिळणे, पोषक आहाराचा खर्च, या सर्व बाबी जुळून येणे आवश्यक आहे असंही ती सांगतेच.
किरणच्या कृत्रिम पायाची एकूण किंमत अडीच लाख रुपये आहे. त्याच्या सिलिकॉन लायनरला प्रतिवर्षे मेन्टेनन्ससाठी ६० हजार रुपये लागतात, तसेच कृत्रिम पायासाठी स्वत:चे वजनही आहे तितकेच ठेवायची कसरत करावी लागते. मॅरेथॉनमध्ये धावताना शरीराच्या एका बाजूने वजन जास्त असते, त्यानं वेदनाही होते असं किरण सांगते. मात्र देशासाठी पळणं हे आता तिचं ध्येय बनलं आहे.
(लेखक लोकमतच्या मराठवाडा आवृत्तीत क्रीडा वार्ताहर आहेत.)