-साहेबराव नरसाळे
‘पूर्वी मातीच्या मडक्यांमध्ये राख लावून बियाणं साठवलं जायचं. या बियाणांची उतरंड घरोघर असायची़ लोक घरीच बियाणं तयार करायच़े मात्र, तंत्रज्ञान बदललं, शेती आधुनिक झाली़ हायब्रीडची बियाणं आलं आणि घराघरात असलेल्या उतरंडी एकदम नाहीशा झाल्या़आता कुठल्यातरी कंपनीत बियाणे तयार होतात़ आकर्षक पॅकिंगमधून ते शेतकऱ्यांच्या शेतात उतरतात़ झकपक दिसणारं ते बियाणं शेतकरीही मोठी किंमत मोजून आनंदानं घेतात़ पण त्यातली किती बियाणं रुजतं? आणि रुजलेल्या बियाणातून फुललेलं पीक किती पोषक असतं? ते किती आरोग्यदायी असतं? हायब्रीड धान्य खावून माणूस ताजातवाना दिसतो खरा, पण तो ताकदवान असतो का? शहरातल्या माणसापेक्षा डोंगरातला माणूस धाकट असतो की नाही?’- राहीबाई पोपेरे. या मावशी माझ्यावरच प्रश्नांची सरबत्ती करतात़ उत्तराची वाट न पाहता पुढचा प्रश्न टाकत राहतात़ मी ऐकत राहतो़त्या बोलत राहतात़राहीबाई सोमा पोपेरे कधीही शाळेची पायरी चढलेल्या नाहीत़ बाराखडीतला ‘अ’ देखील त्यांना लिहिता येत नाही़ वनस्पतीशास्त्र, शेतीशास्त्रचा अभ्यास तर त्यांच्या खिजगणतीतही नाही़ मात्र त्या शिकवतात उच्च शिक्षण घेणा:या विद्याथ्र्याना, शेतीशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या तज्ज्ञांना आणि त्यांच्याकडे शेती शिकायला येतात मोठे मोठे बागायतदाऱ त्या मोठमोठाल्या शहरांमध्ये जातात़ लोकांना, महिलांना मार्गदर्शन करतात़ लोकं त्यांच्यासोबत सेल्फी काढतात, फोटो घेतात़ काहीजण सही मागतात, पण राहीबाई अडाणी आहेत हे कळलं की नाकंही मुरडतात़ मग या अडाणी राहीबाई सेलिब्रिटी कशा झाल्या? शेतीच्या मार्गदर्शक कशा झाल्या? असं काय केलं त्यांनी की त्यांच्याकडे तज्ज्ञ सल्ला घ्यायला येतात. हे सारं सविस्तर जाणून घ्यायला मी पोहोचलो होतो, अकोले तालुक्यातील दुर्गम कोंभाळणे नावाच्या गावात़शाळेजवळ काही महिला दिसल्या़ त्यांना पोपेरेवस्ती विचारली़ त्यांनी हात केलेल्या दिशेने गाडी पळवली़
पोपेरेवस्तीच्या अलीकडेच एक तलाव आह़े या तलावाच्या वरच्या बाजूलाच राहीबाई सोमा पोपेरे यांचं झोपडीवजा घऱ घराच्या बाहेर ‘स्थानिक बियाणे कोष’ अशी पाटी लावलेली़ घराच्या भिंती दगडाच्या़ त्या पांढऱ्या मातीने सारवलेल्या़ गाईच्या शेणाने सारवलेला परस़ मला थोडय़ावेळ चुकल्यासारखेच झालं.मी राहीबाईंनाच विचारलं, ‘राहीबाई पोपेरे यांचं घर कोठे आहे?’तर त्या म्हणाल्या, ‘मीच आह़े’विश्वास बसत नव्हता़त्याचवेळी तेथे औरंगाबादहून एका बडय़ा शेतकऱ्याचा नोकर राहीबाईंकडे आला होता़ सोमा पोपेरे हे त्याला बियाणो दाखवत होत़े मीही थेट आत घुसलो़ घराच्या दोन्ही भिंतीच्या बाजूनं आणि भिंतींवर लटकवलेलं बियाणो पहायचं सोडून थेट समोरच्या भिंतीवर असलेल्या पुरस्कारांच्या फ्रेम पाहू लागलो़ बऱ्याच फ्रेम्स. आणि बरेच पुरस्कार. त्यात एक लोकमत सखी मंचने केलेल्या गौरवाची फ्रेमही होतीच. मग वाटलं याच त्या राहीबाई, ज्यांना भेटायला आपण पावणोदोनशे किलोमीटरचे अंतर तुडवून आलोय़एकदम साधी राहणी़ घरासमोर छोटंसं शेत़ शेताच्या कडेला विविध फळझाडं लावलेली़ घराच्या वरच्या बाजूला गांडूळखत तयार करण्यासाठी घरीच तयार केलेला छोटासा खड्डा़. राहीबाईंच्या सांगत होत्या, आता ‘खाण्यासाठी नाही बेण्यासाठी’ असं ब्रीद घेऊन मी काम करत़े आता जसं बियाणं साठवते आणि विकते, तसं पूर्वी नव्हत़े तयार केलेलं बियाणं घरच्याच शेतीत रुजवायचं. उरलेलं साठवून ठेवायचं. स्वत:च्या पलिकडे असं काहीच नव्हतं. जुन्या वाणांची घरात उतरंड लागली होती़ मात्र, बाहेर ते कोणालाच माहितीही नव्हतं. तो 1996-97 चा काळ असेल़ बायफने आदिवासी विकास कार्यक्रम हाती घेतला होता़ त्यातलीच मीही एक लाभार्थी महिला़ एक दिवस बायफचे नाशिक विभाग प्रमुख जतीन साठे आमच्या घरी आले आणि त्यांनी ही दुर्मीळ वाणांची बियाणो बँक पाहिली़ ते आश्चर्यचकित झाल़े त्यांच्यामुळेच आज मी जगभर पोहोचते आह़ेजतीन साठे सांगतात, मी राही मावशींच्या घरी गेलो तेव्हा मडक्यात, शेणात, फडक्यात बांधून साठवलेलं 17 पिकांचे ओरिजनल 48 वाण साठे तिथे सापडल़े मी त्याचं डॉक्युमेंटेशन केलं. ते विविध विद्यापीठांना पाठविलं. हे मूळ वाण असल्याचं सिद्ध झालं़ त्याचवेळी महाराष्ट्र जनुक कोष प्रकल्प सुरु झाला होता़ यात राही मावशींना काम करण्यास उद्युक्त केलं. बायफच्या माध्यमातून आम्ही राही मावशींची बियाणो बँक जगाच्या पटलावर आणली़’
वालवड, वाटाणो, कारले, वांगे, हादगा, घेवडा, वाल, श्रवणी घेवडा, डांगर, चक्का, गवार, भेंडी, तांबडा माठ, म्हैसवेल, चंदनबटवा, आंबटवेल, करटोली, भोकर, सुरण, कुरडु, काटेमाठ, हिरवामाठ, लालमाठ, आंबाडी, गुळवेल, चाईची बोंडे, भुई आवळी, बांबुचा कोंब, आंबटचुका, फांदभाजी, रानतोंडली, रानओवा, कोंदुरसा, कडूशेरणी, कडू वाळुक अशा सुमारे अडीचशे बियाण्यांची समृद्ध बँक राहीबाईंनी तयार केली आह़े त्यात सुमारे २०० पालेभाज्या, भाताचे १० प्रकार आणि वालाचे १८ प्रकार तर काही औषधी वनस्पतींची बियाणोही राहीबाईंच्या बँकेत मिळतात़ राहीबाईंना लिहिता वाचता येत नाही़ पण हे सर्व बियाणं राहीबाईंना तोंडपाठ आहेत़ त्यांच्या घरात बियाणं साठविण्यासाठी मटक्यांची उतरंड आहे, रॅकमध्ये आधुनिक पद्धतीनेही अगदी लेबल लावून बियाणं साठवलं आह़े तर भाताचं बियाणे पिंपात साठवले आह़ेराज्यभरातून कृषी अभ्यासाचे विद्यार्थी, शेतीशास्त्रचे अभ्यासक राहीबाईंच्या घरी येतात़ माहिती विचारतात़ फोटो काढतात़ कार्यक्रमाला बोलावतात़ मुंबईतील एका कार्यक्रमात तर चक्क केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी राहीबाईंना एक फोटो घेऊ द्या, अशी विनंती केली़ तर पुण्यातील एका कार्यक्रमात डॉ़ रघुनाथ माशेलकर यांनी राहीबाईंचा ‘मदर ऑफ सीड’ असा गौरवोद्गार केला़ अमेरिका, इंग्लंड, जर्मनी, फ्रान्स या देशांतील काही विद्यार्थी व शेती अभ्यासकही राहीबाईंची बियाणे बँक पाहण्यासाठी थेट कोंभाळणोत आल़े. राहीबाईंसोबत फोटोसेशन केल़े. एखाद्या सेलिब्रिटीसारखे राहीबाईंसोबत सेल्फी घेतले जातात, फोटो काढले जातात़ राहीबाईंना हे आता सरावाचं झालं आह़े.
(लेखक लोकमतच्या अहमदनगर आवृत्तीत उपसंपादक आहेत.)