गेल्या काही दिवसात माऊण्ट एव्हरेस्ट सर करणाऱ्यांच्या अनेक बातम्या तुम्हीही वाचल्या असतील. मे महिन्यात एव्हरेस्ट चढणाऱ्यांचा आकडा यंदा विक्रमी होता. मात्र पियाली बसकची गोष्ट वेगळी आहे. पियाली साधी प्राथमिक शिक्षिका. तिच्या डोक्यात मात्र पर्वतारोहणाचं वेड. गणिताचं ग्रॅज्युएट, डोक्यात मात्र कायम पर्वत चढायचं गणित. या बंगाली मुलीनं आर्थिक परिस्थिती जेमतेम असताना माऊण्ट एव्हरेस्ट नुसतं सरच नाही केलं तर विना ऑक्सिजन सपोर्ट ती एव्हरेस्टवर पोहचणारी पहिली भारतीय महिला ठरली आहे. एव्हरेस्टनंतर दोनच दिवसांनी तिनं ल्होत्से हे दुसरं शिखरही सर केलं.
(Image : Google)
ती सांगतेच, ‘आशावाद हा एकमेव विश्वास आहे, ज्याच्या जोरावर यश खेचून आणता येतं.’ तिच्याकडे तरी आत्मविश्वास आणि उमेद, स्वप्न यापलिकडे काय होतं? पश्चिम बंगालमधल्या हुगली जिल्ह्यातल्या चंदोरनगर गावची ही तरुणी. प्राथमिक शिक्षिका, आपला पगार आणि घरच्यांची साथ. एव्हरेस्ट मोहिमेसाठी पियालीनं शारीरिक फिटनेससाठी सराव तर केलाच पण मोहिमेसाठी पैसेही जमवले. पगारातून किती पैसे साचणार? मग तिनं आपलं घर गहाण ठेवलं. त्यातून १८ लाख रुपये उभे राहिले. मात्र ते ही पुरेसे नव्हते. मोहिमेसाठी ३५ लाख रुपये हवे होते. नेपाळ सरकारने सांगितले होते की पूर्ण पैसे भरा, तरच मोहिमेला परवानगी देऊ. मग पियालीने क्राऊड फंडिगचा पर्याय स्वीकारला. फेसबूकवर तसे आवाहनही केले. लोकांनी तिला साथ दिली. त्यातून ५ लाख जमले. तरी १२ लाख हवे होते. मग टोक्योच्या एका जपानी एजन्सीने तिला स्पॉन्सर केले आणि पियालीच्या पैशांची तजबीज झाली.
आता मोहीम सर केलीच.
(Image : Google)
केवळ एव्हरेस्ट सर करुन ती थांबली नाही तर ल्होत्सेही तिनं दोनच दिवसात सर केलं.
पियाली विविध वृत्तपत्रांना दिलेल्या मुलाखतीत सांगते, ‘सहावीत असताना तेनसिंग नोर्गे यांच्याविषयी वाचलं ते वाचूनच मला थरार जाणवला. वाटलं हे असं काम आपणल्याला जमलं पाहिजे. तिनं ट्रेकिंग सुरु केलं. दार्जिलिंगच्या संस्थेत प्रशिक्षण पूर्ण केलं. अमरनात्र यात्रेला जाऊन आली. २०१३ ला उत्तराखंडमध्ये झालेल्या प्रलयात ती बालंबाल वाचली. मात्र त्याही काळात तिनं रेस्क्यू कामात मोठी मदत केली. सतत स्वत:च्या प्रशिक्षणावरही काम करत तिनं आपल्या आयुष्यातलं एक मोठं ध्येय पूर्ण केलं.