Lokmat Sakhi >Inspirational > आमचा बळकावलेला भूभाग परत द्या; असं पाकिस्तानला ठणकावणाऱ्या स्नेहा दुबे; सलाम..

आमचा बळकावलेला भूभाग परत द्या; असं पाकिस्तानला ठणकावणाऱ्या स्नेहा दुबे; सलाम..

संयुक्त राष्ट्रसंघ महासभेत पाकिस्तानला कडक भाषेत उत्तर देणाऱ्या आणि माध्यमांना मुलाखतीलाही नाही म्हणणाऱ्या स्नेहा दुबे यांचा जबरदस्त आत्मविश्वास.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 06:06 PM2021-09-26T18:06:54+5:302021-09-26T18:16:16+5:30

संयुक्त राष्ट्रसंघ महासभेत पाकिस्तानला कडक भाषेत उत्तर देणाऱ्या आणि माध्यमांना मुलाखतीलाही नाही म्हणणाऱ्या स्नेहा दुबे यांचा जबरदस्त आत्मविश्वास.

meet sneha dubey, IFS Officer, who gave fiery reply to Pakistan | आमचा बळकावलेला भूभाग परत द्या; असं पाकिस्तानला ठणकावणाऱ्या स्नेहा दुबे; सलाम..

आमचा बळकावलेला भूभाग परत द्या; असं पाकिस्तानला ठणकावणाऱ्या स्नेहा दुबे; सलाम..

Highlightsपरराष्ट्र खात्यात काम करणाऱ्या एका तरुण महिला अधिकाऱ्याचं हे कर्तृत्व भारतीयांनी याद राखावं, सलाम ठोकावं असंच आहे.

स्नेहा दुबे. (sneha dubey) हे नाव कालपासून चर्चेत आहे. सोशल मीडियात या तरुण ऑफिसरची चर्चा आहे. पाकिस्तानला कडक भाषेत, निक्षून उत्तर देत भारताची भूमिका जागतिक स्तरावर मांडणारी ही महिला आॉफिसर. अनेकांच्या मोबाइलवर एव्हाना तिच्या ‘फायरी’ भाषणाचे व्हीडीओही पोहोचले असतील आणि कुठल्याही प्रकारच्या मीडिया मोहाला बळी न पडता, तिनं मुलाखत न देणंही ‘व्हायरल’ झालेलं दिसलं असेल! अत्युच्च प्रोफेशनल स्किल्स, प्रचंड अभ्यास, शांत आत्मविश्वास हे सारं या तरुण ऑफिसरच्या चेहऱ्यावर दिसतं. प्रचंड प्रमाणात जगभरचं मीडिया अटेंशन अगदी एका भाषणातून मिळालं, देशभर सोशल मीडियात अनेकांनी तिचे कौतुक केले. पण तिच्या चेहऱ्यावरची प्रोफेशनल शांतता कणभर कमी झाली नाही. अत्युच्च टोकाचा प्रोफेशनॅलिझम आणि आपण आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचं प्रतिनिधित्व करतो आहोत हे भान तिनं क्षणभरही सुटू दिलं नाही.
त्या स्नेहा दुबे नावाच्या परराष्ट्र अधिकाऱ्याची ही गोष्ट.

Image : Google

व्हायरलच्या नादात आपण या तरुण अधिकाऱ्याचा संयम, अभ्यास, भाषेवर असलेली कमांड आणि आत्मविश्वास हे सारं अजिबात नजरेआड करु नये.
स्नेहा दुबेंचं एव्हाना पुणे आणि फर्ग्युसन कॉलेजशी असलेलं कनेक्शनही अनेकांनी शोधून काढलं. जे खरंही आहे. गोव्यात शिकलेली स्नेहा, तिनं पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमधून भूगोलात बीए केलं. एमएची पदवी घेतली आणि पुढे दिल्लीत जेएनयूमध्ये जाऊन एमफीलही केलं. दरम्यान तिची स्पर्धा परीक्षा, युपीएससीची तयारी सुरुच होती. पहिल्याच प्रयत्नात २०११ साली ती युपीएससी उत्तीर्ण झाली आणि थेट परराष्ट्र सेवेत, आयएएफएसमध्ये जॉइन झाली. लहानपणापासून म्हणजे अगदी वयाच्या बाराव्या वर्षापासून तिनं ठरवलं होतं की आपण आयएफएसच करायचं. त्यावरचा फोकस तिचा हलला नाही कारण तिला परराष्ट्र धोरण, आंतरराष्ट्रीय संबंध, आणि प्रवास या तिन्ही गोष्टींचं आकर्षणही होतं आणि त्यासाठी अभ्यास करायची तयारीही होती.

Image : Google

तिचे वडील एका मल्टिनॅशनल कंपनीत काम करतात, आई शिक्षिका आहे.
आयएफएस अर्थात इंडियन फॉरिन सर्व्हीसेसमध्ये दाखल झाल्यावर तिची परराष्ट्र मंत्रालयात नियुक्ती झाली.
त्यानंतर २०१४मध्ये माद्रिदच्या भारतीय दुतावासात नियुक्ती करण्यात आली आणि आता स्नेहा संयुक्त राष्ट्रसंघात भारताचं प्रतिनिधित्व करते आहे.
स्नेहानं संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेत भारताची बाजू मांडली. ज्या भाषेत, ज्या आत्मविश्वासाने या तरुण डिप्लोमॅटने भारताची भूमिका स्पष्ट शब्दात मांडली ते कौतुकास्पद आहे. बोलताना स्नेहाचा चेहरा, तिचं पॉज घेणं, ‘माय कण्ट्री’ असं म्हणताना योग्य शब्दावर जोर देणं हे सारं जगानं पाहिलं.
पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी संयुक्त राष्ट्रसंघात काश्मिर आणि कलम ३७०चा मुद्दा मांडला. भारत सरकारवर ताशेरे ओढले.
पाकिस्तानच्या या भूमिकेला भारताच्या वतीने डिप्लोमॅट स्नेहा दुबे यांनी उत्तर दिलं.
स्नेहानं स्पष्ट शब्दात जगाला, संंयुक्त राष्ट्रसंघाला ठणकावून सांगितलं की, पाकिस्नान दहशतवाद्यांना आश्रय देतो, पोसतो. लादेन पाकिस्तानाच होता. तिथं अल्पसंख्यांकावर अत्याचार होता. साऱ्या जगालाच पाकिस्तानच्या दहशतवादाला पाठीशी घालण्याच्या धोरणाचा त्रास होतो आहे.
एवढंच बोलून ती थांबली नाही. तर तिनं ठणकावून सांगितलं की, काश्मिर हा भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि कायम राहील. उलट पाकिस्ताननेच भारताचा काही भाग बेकायदा बळकावला आहे. त्यांनी तातडीने तो भूभाग भारताच्या ताब्यात द्यावा.


इतक्या स्पष्ट शब्दात भारतीय डिप्लोमॅट भारताची बाजू मांडतात ही आनंदाचीच बाब आहे. भारताच्या परराष्ट्र धोरण आणि सरकारी भूमिकेचा भाग असतात ही निवेदनं हे मान्य केलं तरी स्नेहानं ज्या पध्दतीनं भारतीय बाजू मांडली ते कौतुकास्पदच आहे.
हे सारं झाल्यावर सोशल मीडियात कौतुकाचा पूर आला.
एका वाहिनीची पत्रकार मुलाखत घ्यायला स्नेहाच्या केबिनमध्ये गेल्यावर त्यांनी नकार दिला मुलाखत द्यायला, जे बोलायचं ते माझं बोलून झालं आहे म्हणाली.
परराष्ट्र खात्यात काम करणाऱ्या एका तरुण महिला अधिकाऱ्याचं हे कर्तृत्व भारतीयांनी याद राखावं, सलाम ठोकावं असंच आहे.


 

Web Title: meet sneha dubey, IFS Officer, who gave fiery reply to Pakistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.