प्रियांका निर्गुण - जाधव.
"देवाचं करतेस, बाई सगळं नीट कर... काळजीपूर्वक कर"... असं कित्येकदा घरातील मोठी मंडळी आपल्यासारख्या लहानग्यांना बजावून सांगतात. पण काहीवेळा त्याच्यावर आपला हक्क दाखवताना काही गोष्टी विसरतो. आपण ज्यांना देव मानतो, ज्याची मनोभावे पूजा करतो त्या मुर्ती,फोटो यांची अवस्था काहीवेळा पाहवत नाही. मूर्ती भंग पावतात किंवा धातूच्या असतील तर झिजतात, फोटोफ्रेम्स खराब होतात. कित्येकदा रस्त्याने जाताना किंवा एखाद्या पारावर किंवा, झाडाखाली देवदेवतांच्या मुर्ती व फोटो ठेवलेले दिसतात. पण कधी तुम्हांला प्रश्न पडला आहे का की या फोटो आणि मुर्तींचं नक्की काय होत असेल ? असाच प्रश्न पडला आणि मूळच्या येवल्याच्या पण नाशिक येथे स्थित असलेल्या ॲडव्होकेट तृप्ती गायकवाड यांनी एक अनोखा उपक्रम हाती घेतला. तृप्ती गायकवाड या मूळच्या येवल्याच्या पेशाने वकील असणाऱ्या तृप्ती यांनी २०१९ साली 'संपूर्णम' या नावाने एक अभिनव उपक्रम सुरु केला. या उपक्रमांतर्गत, भग्नावस्थेतील देवी देवतांच्या मुर्ती, फ्रेम्स किंवा जुन्या पोथ्या किंवा ग्रंथ, अध्यात्मिक पुस्तके किंवा इतर धार्मिक साहित्य यांचे संकलन केले जाते. तृप्ती (Trupti Gaikwad) व त्यांची सगळी टीम ठिकठिकाणच्या मुर्ती गोळा करुन त्याचे योग्य पद्धतीने विघटन करतात(Don’t Know What To Do With Old God Idols And Frames? Sampurnam Seva Foundation Will Recycle Them Into Pretty Things).
अशी केली सुरुवात...
२०१९ साली गंगेला आलेला पूर व प्रत्यक्ष पूर परिस्थिती बघण्यासाठी म्हणून त्या गेल्या होत्या. तिथे गेले असताना त्यांना तिथे एक माणूस भेटला ज्याच्याकडे बऱ्याचशा देवीदेवतांच्या फ्रेम्स व भग्न अवस्थेतील मुर्ती होत्या. तो पाण्यांत विसर्जन करण्यासाठी आला होता. परंतु तृप्ती यांनी त्यावेळी त्या व्यक्तीस पाण्यात विसर्जित न करण्याचा सल्ला देणार. तेव्हा एवढ्या मुर्ती व फ्रेम्सचे मी काय करणार असा प्रश्न त्या व्यक्तीने केला. तेव्हा तृप्ती यांनी त्यांना सांगितले, या फ्रेम्स मध्ये कागद, पुठ्ठा तसेच, मुर्ती मातीच्या माती आहेत. पाणी दुषित होते. तिथून या नव्या संकल्पनेचा जन्म झाला. घरचे, काही नातेवाईक, मित्रमंडळी, शेजारपाजार यांच्याशी बोलून तृप्ती यांनी ही संकल्पना सत्यात उतरविली.
'संपुर्णम' चे अनोखे कार्य...
या उपक्रमाद्वारे त्या देवदेवतांच्या जुन्या फ्रेम्स, प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या लहान - मोठ्या भग्नावस्थेतील मुर्ती, झाडाखाली, मंदिरात ठेवलेला मुर्ती त्या संकलन करतात. संकलन केल्यानंतर या मुर्त्यांची विधिवत उत्तरपूजा करुन मग या सर्व फ्रेम्स आणि मुर्तींची पर्यावरण पूरक पद्धतीने 'संपुर्णम' या उपक्रमाद्वारे विघटन केले जाते. विघटन केलेल्या या वस्तूंपासून मग अनेक प्रकारच्या वस्तू बनवल्या जातात. काहीवेळा याचा वापर खत म्हणून झाडांना घालण्यासाठी देखील केला जातो. त्याचबरोबर चिमणीचे घरटे, प्राणी व पक्ष्यांना दाणा - पाणी देण्यासाठी मातीची भांडी, खेळणी, विटा यांची निर्मिती केली जाते. त्यांनी महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, मुंबई, सोलापूर, संगमनेर यासारख्या महाराष्ट्रभरातील वेगवेगळ्या शहरात हा उपक्रम राबविला. आता राज्याबाहेर त्यांचं काम सुरु होत आहे.
तृप्ती म्हणतात...
आजकाल मुर्ती बनवताना त्यात भरपूर प्रकारचे केमिकल्स, रासायनिक घटक वापरले जातात या अशा मूर्तींचे आपण पाण्यांत विसर्जन करुन आपण पर्यावरणाचा ऱ्हास करतो. मुर्तींची विटंबनाही थांबली पाहिजे. योग्य पद्धतीनेच विघटन होणं म्हणून गरजेचं आहे.