- मेघना ढोके
बिरुबाला राभा. ७२ वर्षांच्या या आजी. बुटक्याशा. शरीरानं कृश. त्यांच्याकडे पाहिलं तर एरव्ही कुणाला वाटणारही नाही की, बिरुबाला आजी बोलायला लागल्या की त्यांच्या करारी आवाजानं हाती कोयते घेतलेलेही चार पावलं मागे सरतात.आसाममधल्या गोलापारा जिल्ह्यात राहणाऱ्या बिरुबाला राभा सध्या राष्ट्रीय माध्यमांमध्ये एकदम चर्चेत आहेत. त्यांना नुकताच अत्यंत सन्मानाचा ‘पद्मश्री पुरस्कार’ नुकताच प्रदान करण्यात आला. मात्र, तो सारा आनंद साजरा करताना, आंतरराष्ट्रीय माध्यमांच्या वार्ताहरांना मुलाखती देताना बिरुबाला आजींचं काम सुरुच आहे. त्या आपल्या लहानशा घरात राहतात, कोंबड्यांचं दाणापाणी पाहतात. हातानं एका बाजूला राभा पद्धतीचे स्कार्फ, शाली विणण्याचं काम सुरुच असतं. मुलाखत घेणाऱ्यालाही त्या सांगतात, बोलू आपण काम करता करता, पण मधूनच मला एखाद्या गावातून फोन आला तर मला जावं लागेल.
(Image : Google)
अर्थात त्यांना जे ओळखतात त्यांना हे माहितीच आहे की, बिरु बायदेव कुणी थांब म्हंटलं तरी थांबणाऱ्यातल्या नाहीत. कारण त्यांनी आपल्या सर्व सहकाऱ्यांनाच एक मंत्र कायमस्वरुपी शिकवलेला आहे. त्या म्हणतात, ‘काटीले काट, मारीले मार, मोय ना रोकू!’ म्हणजे काय मला मारायचं असेल तर मारा, कापून काढायचं तर कापून काढा, पण मी माझं काम थांबवणार नाही!बिरु बायदेवचा हा मंत्र ऐकणं-वाचणं सोपं आहे. मात्र, ज्या समाजात त्या राहतात तिथं हे सारं बोलणंही सोपं नाही. मात्र, बिरु बायदेवनं ते करुन दाखवलं म्हणून त्यांना मिळालेल्या ‘पद्मश्री’चं मोल मोठं आहे.बिरु बायदेव लढल्या त्या आसाममधल्या ‘डाइन‘ प्रथेशी. ज्याला हिंदीत डायन, आपल्याकडे हडळी, भुताळीण असं ओळखलं जातं. गावागावात तिकडे अजूनही असा समज आहे की, काही बायका आणि पुरुषही काळी जादू करतात. त्यांना कुणाचं चांगलं झालेलं पचत नाही. म्हणून मग जादूटोणा करुन कुणाला आजारी कर, पीक नासव, कुणाच्या मागे पैशाच्या भानगडी लाव, कुणाच्या घरात कलह लाव, असे सारे उद्योग त्या करतात. अशा ‘डाइन’ ठरवलेल्या बायकांना गावच्या पंचायतीसमोर उभं केलं जातं. त्यांचा गुन्हा सिध्द झाला तर ‘गावच्या भल्यासाठी’ त्यांची हत्या केली जाते. आसाम सरकारनेच उपलब्ध करुन दिलेल्या आकडेवारीनुसार २०११ ते २०१९ या वर्षांत १०७ स्त्री-पुरुष, त्यातही बायकांची संख्या जास्त ‘डाइन’ ठरवले गेले आणि त्यांची हत्या करण्यात आली. अगदी अलिकडे म्हणजे ऑक्टोबर २०१९मध्येही कार्बी अंगलाँग या आसाममधल्या आदिवासीबहुल जिल्ह्यात एक ५० वर्षीय महिला आणि २८ वर्षाचा पुरुष यांना जादूटोणा करतात म्हणून त्यांची हत्या करण्यात आली. अगदी गेल्या दशकापर्यंत आसाममध्ये वर्षाला १२ ते १५ बायका ‘डाइन’ ठरवून मारल्या जात होत्या, असं आसाम सरकारचीच आकडेवारी सांगते.
(Image : google)
या साऱ्या विरोधात बिरु बायदेव उभ्या राहिलेल्या. इयत्ता पाचवीत शाळेची दारं बंद झालेली ही म्हातारी. वडील अकाली गेले. वयाच्या १५ व्या वर्षी लग्न झालं. पदरात चार मुलं. थोडी शेती आणि राभा पध्दतीच्या शाली, स्कार्फ विकून आजी आपली गुजराण करत. त्यांच्या मुलाला एकदा ताप आला, तो लहान असतानाची गोष्ट. त्यात ते मूल थोडं मानसिक आजारी. गावचा भगत म्हणाला की, हे मूल जगणार नाही. पण सुदैवानं ते मूल औषध उपचारानं जगलं. तिथून बिरु बायदेवचा भगतांवरचा विश्वास उडाला. आपल्याच गावात कुणी जादूटाेणा करते, कुणी डाइन आहे, असं म्हणून एकट्या राहणाऱ्या विधवा, परित्यक्ता बायकांना लोक छळतात, हे त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी मग शाळांमध्ये जावून मुलांना सांगायला सुरुवात केली की, जादूटोणा, काळीजादू असं काही नसतं. कुठलीच बाई भुताळीण, डायन नसते.बिरु बायदेव सांगतात, ‘कुणाला भुताळीण, डायन ठरवणं हाच माणुसकीला काळीमा आहे. ते सारं आपण का होऊ द्यायचं?’या एका सूत्रानं त्या कामाला लागल्या. कुणा बाईला डायन ठरवून पंचायतीसमोर उभं केलं असं कळलं की, त्या तिथं जाऊन गावाला समजावतात. पंचायतीला विरोध करतात. कधी एक बाई, कधी पाच बायका पंचायतीसमोर उभ्या असतात. बिरु बायदेव त्यांच्या जीवासाठी सारे प्रयत्न करत त्यांना सोडवतात. आजवर त्यांनी ४२हून अधिक बायकांचा जीव वाचवला आहे. जनजागृतीच्या कामाला तर वाहून घेतलं आहे. हे सारं सोपं नव्हतं, अनेकांनी त्यांनाच डायन ठरवलं. गावच्या गाव त्यांच्या घरावर कोयते घेऊन चालत आलं. मात्र, तरी त्यांनी हिंमत सोडली नाही. आता आसामभर त्यांच्या ‘मिशन बिरुबाला’ या मोहिमेशी ६०० लोक जोडले गेले आहेत. ते गावागावात जाऊन जादूटोणा, अंधश्रध्दा जनजागृतीसाठी काम करतात. त्यांच्या या लढ्यालाही यश आलं. २०१५मध्ये आसाम सरकारने डायन हत्या कायदा मंजूर केला. (मात्र त्याची अंमलबजावणी सुरु झाली २०१८ पासून!) तेव्हापासून बिरु बायदेवच्या कामाला प्रसिध्दी मिळाली, त्यांच्या पाठीशी लोक उभे राहू लागले.बिरुबालांसोबत काम करणारे नाट्यवीर दास, जे डॉक्टर आहेत. मात्र, बिरुबाला मिशनचे खंदे कार्यकर्ते. ते सांगतात, ‘बिरु बायदेवच्या हे लक्षात आलं की, या साऱ्या जादूटोणा समजुतींमागे विकासाचा, शिक्षणाचा अभाव आहे. लोक अंधश्रध्दांना भूलतात, त्यातून मग असे भ्रम पसरतात. त्यामुळे सन २०००पासून त्यांनी जे जनजागृतीचं काम सुरु केलं, ते आता आम्ही अधिक जोमानं ‘मिशन बिरुबाला’ म्हणून पुढे नेत आहोत.’बिरु बायदेव तर सांगतातच, हे पुरस्कार, ही प्रसिध्दी हे सारं माझं नाही तर माझ्यासोबत काम करणाऱ्यांचं, जीवाची पर्वा न करता डाइन प्रथेविरुध्द लढणाऱ्यांचं आहे. त्यांनाच ते मी समर्पित करते.- आसामच्या दुर्गम भागात काम करणाऱ्या बिरु बायदेवना पद्मश्री मिळण्याचं मोल म्हणून मोठं आहे, त्यांनी अतिशय शांतपणे मोठं परिवर्तन करणारं काम नेटानं सुरु ठेवलं आहे.( लेखिका लोकमत वृत्त समूहात मुख्य उपसंपादक आहेत.)meghana.dhoke@lokmat.com