व्हायरलच्या जगात कशाची चर्चा होईल आणि जे व्हायरल तेच खरे असे मानून त्यावर प्रतिक्रियाही दिल्या जातील, हे काही सांगता येत नाही. अशीच एक चर्चा मेस्सीच्या संघानं फुटबॉल विश्वचषक जिंकल्यानंतरची. त्यादरम्यानच एक व्हिडिओ व्हायरल झाला, ज्यात एक प्रौढ महिला मेस्सीला मिठी मारत रडत असल्याचे दिसते. मेस्सीही भावूक झालेला आहेच. तर अनेकांनी हा व्हिडिओ मेस्सीच्या आईचा म्हणून फिरवला. इतक्या अत्युच्च यशाच्या क्षणीही कसा मेस्सी आईला विसरला नाही, अशा इमोशनल टेपाही लावण्यात आल्या. मात्र एक-दोन दिवसांत फॅक्ट चेकर्सनी सांगितलंच की, तो व्हिडिओ मेस्सीच्या आईचा नव्हता. तर पन्नाशीच्या आतबाहेरच्या दिसणाऱ्या त्या बाई होत्या अर्जेण्टिना संघाच्या कूक, अर्थात स्वयंपाकी. गेली १० वर्षे त्या संघासोबतच प्रवास करतात. संघ काय खाणार-पिणार, पौष्टिक आहार या सगळ्याचं नियोजन करतात. वय वर्षे ४२ आणि नाव अँटोनिया फारिस. अर्जेण्टिअन टीम जगात जिथे जिथे प्रवास करते, तिथं तिथं संघासोबत त्या असतातच.
(Image : Google)
आता त्यांच्या हाताखाली तरुण कूकही काम करतात. मात्र अँटोनिया मानतात की, खाण्याचा आणि आपल्या मूडचा थेट संबंध असतो. मॅच चांगली झाल्यावर अधिक आनंदासाठी आणि मॅच हातातून गेल्यावर पुन्हा संघात ऊर्जा भरण्यासाठी विविध पदार्थ केले जातात. त्यांच्या हातची संघात सर्वांना आवडणारी डिश म्हणजे अर्जेण्टिनाची पारंपरिक डिश ‘नेपोलिटन मिलानझे’ आणि फ्रेंच फ्राइज.
अँटोनियाबाई रातोरात वर्ल्ड फेमस झाल्या, त्या मॅचनंतरच्या मेस्सी मिठीने. मात्र गेलं दशकभर संघासोबत काम करताना त्या सकस गोष्टींवर भर देत टीमचं भरणपोषण करत होत्याच. मेस्सीसोबतच या बाईपण २०२२ संपता संपता जगभर व्हायरल आणि फेमस झाल्या.
खरंखोटं क्रॉसचेक न करता लोकांनी इमोशनल होत त्यांच्या फोटो व्हिडिओची ढकलगाडी पुढे ढकलली. रातोरात स्टारडम कूकबाईंच्या वाट्याला आलं.
नशिब कुणाचं केव्हा उघडेल सांगता येत नाही.