मृण्मयी रानडे
साइखोम मीराबाई चानू या वेटलिफ्टरने टोकयो ऑलम्पिक स्पर्धांमध्ये रजतपदक मिळवल्याचा आनंद भारतभरात साजरा होत असतानाच, ‘ती एक बाई आहे, आणि तिने खरं तर मुलं जन्माला घालायला हवीत, ती तिची सृजनाची अमूल्य वर्षं वाया घालवते आहे,’ असं मतदेखील एखाद्या कोपऱ्यातून का होईना व्यक्त होताना दिसतंय. मीराबाई देशातल्या ज्या कोपऱ्यातल्या राज्यात जन्मली आहे ते राज्यही कदाचित या टीकाकारांना नकाशात दाखवता येणार नाही. पण मुद्दा तो नाहीच. जागतिक पातळीवरच्या खेळांच्या स्पर्धेत रजतपदक मिळवण्याची कामगिरी करूनही मीराबाईने तिची बाई म्हणून कर्तव्यं पार पाडायलाच हवीत असं मत असणाऱ्या व्यक्ती, स्त्रिया आणि पुरुष दोन्ही, आपल्या या पुरुषसत्ताक ‘संस्कारी’ देशात कमी असतील, पण आहेत नक्की. यातलं मुख्य कर्तव्य अर्थात मुलं जन्माला घालणं. (तरी या टीकाकाराने लग्नाचा मुद्दा यात अंतर्भूत केलेला नाही, पण मुलं जन्माला घालण्यापूर्वी तिने लग्न करावं, असंच त्याला म्हणायचं असणार यात शंका नाही.)
खेळाडूंच्या शरीरांवर त्यांच्या सरावामुळे, पथ्यामुळे, आणि प्रत्यक्ष खेळामुळे अनेक परिणाम होत असतात, स्त्री, पुरुष आणि या दोघांपेक्षा वेगळे जे आहेत त्या सगळ्याच खेळाडूंचा हा अनुभव आहे. अनेक महिला खेळाडूंच्या मासिक पाळीचे चक्र यामुळे बिघडलेले असते. खेळातली कारकीर्द संपल्यानंतर त्यांनी लग्न केलंच, आणि त्यांना मूल हवंच असेल तर त्यात यामुळे अडथळे येत असतीलही काही जणींच्या आयुष्यात तरी. परंतु पुरुष खेळाडूंच्या शरीरावरही असाच परिणाम होतो, त्यांच्या शुक्राणूंच्या निर्मितीत घट होऊ शकते, असे दाखवणारे संशोधनही झालेले आहे. बहुतेक सर्वच खेळांमध्ये शारीरिक इजा हा तर न टाळता येण्याजोगा घटक असतोच, पण म्हणून हे खेळाडू खेळायचं थांबवत नाहीत. रस्त्यावरून चालताना अपघात होतो म्हणून आपण घराबाहेर पडणं थांबवत नाही, तसंच हे. एखादं ध्येय स्वीकारलं की त्यासाठी जीवापाड मेहनत करणं, आवश्यक असेल ते ते सगळं करणं याचं माेल या खेळाडूंना माहीत असतं. घरात सोफ्यावर लोळत रिमोटची बटणं दाबण्यापलिकडे काही हालचाल न करणारे आपण प्रेक्षकही आपल्या देशाच्या संघाने एखादा सामना जिंकला किंवा आपल्या देशाच्या एखाद्या क्रीडापटूने एखादं पदक कमावलं की आनंदाने नाचतो, बेभान होतो. मग प्रत्यक्ष तिथे मैदानावर असणाऱ्या खेळाडूसाठी ते किती महत्त्वाचं असेल याची कल्पना आपण करूच शकतो की.
ट्विटरवर जेव्हा हे ट्वीट पाहिलं तेव्हा राग तर आलाच, पण खरं सांगायचं तर अपार करुणा दाटून आली त्या व्यक्तीबद्दल. (या व्यक्तीने स्वत:चं खरं नाव जाहीर केलेलं नाही, छायाचित्रही अर्थातच लावलेलं नाही.) आपल्या देशातल्या एका खेळाडूनं इतकं झळझळीत यश मिळाल्यानंतरही एखाद्या व्यक्तीच्या मनात जर असा विचार येत असेल त्या व्यक्तीच्या मानसिक आरोग्याची काळजी वाटणं साहजिक नाही का? आणि हा विचार समाजातला मोठा वर्ग करत नसणार हेही ठाऊक होतं कारण मीराबाईने रजतपदक जिंकल्यानंतर सगळीकडे प्रचंड आनंदच व्यक्त होत हाेता. व्हाॅट्सॲप ग्रूप्स, फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, आणि प्रत्यक्ष भेटींमध्येही सगळ्यांच्या तोंडी तिच्याबद्दल कौतुकच दिसत होतं. म्हणून या ट्वीटकडे दुर्लक्ष केलेलं बरं, असं वाटत होतं.
परंतु, नंतर असंही वाटलं की, ज्या अर्थी एका व्यक्तीला असा विचार ट्विटरवर मांडावासा वाटतोय, त्याअर्थी अशा आणखीही व्यक्ती असू शकतात. आणि हे मत प्रातिनिधीक झालं की मीराबाईने मुलं जन्माला घालायला हवीत खेळ सोडून, अमुक वयात लग्न व्हायला हवं, मग अमुक काळात मूल व्हायला हवं, याचा सामाजिक तणाव सर्वच स्तरांतल्या, सर्व व्यवसायांमधल्या पुरुष व स्त्रियांवर किती असतो, ते आपण आपल्या आजूबाजूला पाहतोच. त्यामुळे मीराबाई नाही तर आणखी कोणी, इतकाच फरक. म्हणून हे मुद्दाम लिहावंसं वाटलं.
स्त्रीला आणि पुरुषांना आणि यापलिकडचा ज्यांचा लिंगभाव आहे त्या सगळ्यांनाच स्वत:ला हवं तसं जगण्याचा अधिकार आहे, त्यात लग्न, मुलं, व्यवसाय, घर, जेवणखाण यांसंबंधीचे निर्णय अंतर्भूत आहेत. अन्य कोणीही ते ठरवता कामा नये. यातला आणखी एक बारकावा म्हणजे स्त्रियांनी कसं वागलं पाहिजे, कोणते कपडे घातले पाहिजेत, कुठे गेलं पाहिजे, आदि पुरुष ठरवताना दिसतात. ट्विटरवरच एका लेखक मैत्रिणीला एका पुरुषाने म्हटलं होतं, तुला काय माहीत बाळंतपणाच्या वेदना काय असतात ते, मी माझ्या बायकाेच्या डिलिव्हरीच्या वेळी तिथे हजर होतो! मीराबाईने मुलं जन्माला घालायला हवीत, असं सांगणारी व्यक्ती इतर पुरुष खेळाडूंनाही असंच म्हणायला धजावेल का?
यापुढचा मुद्दा आहे की खेळ आणि मातृत्व यातलं एकच काहीतरी निवडावं लागतं का खरंच? बाॅक्सर मेरी कोमने तीन मुलांना जन्म दिला आहे आणि ती सध्या टोकयो ऑलिम्पिकमध्ये खेळते आहेच ना! ती पदक जिंकेल तेव्हा ही व्यक्ती काय मौक्तिकं उधळेल?
या सगळ्यात दिलासा हाच आहे की या ट्वीटवर शेकडो लोकांनी निषेध नोंदवला आहे. कित्येकांचा विश्वास बसला नाहीये की एकविसाव्या शतकात कोणीतरी असं म्हणतंय. बहुतेकांनी या व्यक्तीची टिंगलच उडवली आहे.
लेखाचा उद्देश इतकाच की, ही मानसिकता काही वाटते तितकी दुर्मीळ नाही, आणि वरवरची तर नक्कीच नाही. म्हणूनच तिच्याबद्दल बोलत राहणं, लिहीत राहणं, चर्चा करणं अत्यावश्यक आहे.
(लेखिका लिंगभाव आणि माध्यमे (gender and media) या विषयावर काम करणाऱ्या Population First या संस्थेत कार्यरत आहेत.)
cm.popfirst@gmail.com