वृषाली गुजराथी- शेख
बाळ झाल्यानंतर त्याला बघून जो आनंद होतो तो खरंतर शब्दात नाहीच सांगता येत! पण मला बाळ झालं तेव्हा मी तिला पाहिलं ते डोळ्यांनी नाही तर स्पर्शाने. या स्पर्शानेही मला बघण्याइतकाच आनंद दिला. माझा स्पर्श, माझं बोलणं या दोन गोष्टींनी मी आणि माझी मुलगी रायमा हिच्यामधलं नातं घट्ट होत गेलं. आपल्या आईला दिसत नाही आणि रायमाला मी बघू शकत नाही या दोन गोष्टी आम्ही एकमेकींनी स्वीकारल्या आहेत. त्यामुळे जे नाही त्याबद्दल विचार आणि खंत करत बसण्यापेक्षा जे आहे त्यात आनंद कसा निर्माण करायचा असाच माझा, माझ्या नवऱ्याचा आणि माझ्या मुलीचा प्रयत्न असतो.आपल्या बाळाला आपल्यासारखं दिसलं नाही तर असा विचार माझ्या मनात चुकूनही आला नाही. कारण मातृत्वाने मला सकारात्मक विचार करायला शिकवलं. जे होईल ते छान होईल. आपलं बाळ छान असेल, ते छान शिकेल, मोठं होईल असाच विचार रायमा पोटात असताना केला. मला बळ मिळत गेलं. पुढच्या आव्हानांसाठी मी आपोआपच स्वत:ला तयार करत गेले.
रायमा झाल्यानंतर सुरुवातीला मला इतरांची मदत घ्यावी लागली. नणंद येवून रायमाला तेल लावून मालिश करायची, आंघोळ घालायची. हेच काम कधी बिल्डिंगमध्ये असणाऱ्या आजींनी केलं. पण हे मलाही जमायला हवं, आपल्या बाळाची काळजी आपल्याला घेता यायला हवी, त्यासाठी इतरांवर अवलंबून राहायला नको असं माझं मन म्हणायला लागलं. रायमा पाच महिन्यांची असतांनाच मग मी तिला तेल लावून मालिश करायला, आंघोळ घालायला सुरुवात केली. यात माझं ॲक्युप्रेशरचं, नॅचरोपॅथीचं शिक्षण उपयोगी पडलं. रायमा अगदी लहान होती तेव्हा मला फार सावध राहावं लागायचं. आपल्यामुळे आपल्या बाळाला त्रास व्हायला नको, तिच्या अंगावर चुकून पाय पडायला नको याची काळजी मला सतत घ्यावी लागायची. ती रांगायला लागल्यावर तर फारच. मग मी तिच्या पायात छुमछुम घातली. त्याच्या आवाजाने मला रायमा घरात कुठे रांगते आहे, हे कळायचं. या वयातली मुलं तोंडात काहीही घालतात, याकडे लक्ष देणं माझ्यासाठी आव्हानात्मक होतं. त्यासाठी मला घर खूप स्वच्छ ठेवावं लागायचं. रायमाच्या आजूबाजूला काहीच ठेवायचं नाही, तिच्या खेळण्या तुटलेल्या नको याची काळजी घेत होते. सतत तिच्या तोंडात बोट घालून तिने तोंडात काही टाकलं तर नाही ना हे बघावं लागायचं.
या सगळ्या काळात मला वाटायचं की एक आई म्हणून मीच फक्त रायमाची काळजी घेते, पण तसं नव्हतं. ती पूर्ण वर्षाचीही झाली नव्हती, पण एव्हाना तिलाच कळायला लागलं होतं की आपण आपल्या आईची काळजी घ्यावी. घरात डास होवू नये म्हणून आम्ही घरात कापूर जाळायचो. एकदा असाच कापूर जाळला. मी जळत्या कापराच्या जवळ जायला नको म्हणून रायमा लांबूनच मला 'हा हा' असं मोठ्यानं ओरडून सावध करत होती. कुठून आली तिला ही जाण. एकमेकींच्या सोबतीनं. सोबत राहिल्यानेच तर माणसं एकमेकांची ताकद, कमतरता ओळखतात. आपल्या आईला दिसत नाही तर आपणही तिला सांगायला हवं, हे तिला खूप लवकर समजलं होतं.मला रायमाला बघता येत नाही ही उणीव मी स्पर्शानं, तिच्याशी गप्पा मारुन, तिला सतत गोष्टी सांगून, गाणी म्हणून पूर्ण करत होते. यामुळे रायमाची ऐकून घेण्याची, ऐकून गोष्टी आत्मसात करण्याची ताकद वाढली. मी लता मंगेशकर यांची त्यांनी वेगवेगळ्या भाषेत गायलेली गाणी ऐकायचे. गुणगुणायचे. माझ्यासोबत रायमाही गाणे गुणगुणायची. तिला भाषेची अडचण जाणवत नव्हती, हे मला लक्षात आल्यानंतर मी तिला वेगवेगळ्या भाषेतील गाणी म्हणायला शिकवले. आज रायमा पंधरा भाषांमधली गाणी म्हणू शकते. तिच्या या कौशल्याची नोंद 'इंडिया बुक ऑफ रेकाॅर्ड', 'चिल्ड्रन बुक ऑफ रेकाॅर्ड'ने घेतली आहे.आपल्या आईला दिसत नाही ही गोष्ट रायमाने खूप वेगवेगळ्या टप्प्यावर नीट समजून घेतली आहे. स्वीकारली आहे. तिला कळायला लागलं, ती जशी बाहेरच्या लोकांमध्ये, मित्र मैत्रिणींमध्ये मिसळू लागली तशी आपल्या आईला दिसत नाही, याची जाणीव तिला व्हायला लागली. सुरुवातीच्या काळात थोडा तक्रारीचा सूर होता. 'तुला का इतर आयांसारखं दिसत नाही?' ' तुला दिसत असतं, तर आपण किती मज्जा केली असते', 'तू गाडीवर मला फिरायला घेवून गेली असते',' आपण दोघीच बाहेर फिरलो असतो,' , असं तिला वाटायचं. ते ती माझ्याशी बोलायची. तिला ही तक्रार वाटण्यात गैर नव्हतं. पण ही खंत तिने किती करावी? हा ही प्रश्न होता. म्हणून तिच्याशी बोलत राहिले. नाही दिसत मला पण आपण तरीही काय काय गंमती करतो किंवा खूप जणांच्या आईला किंवा बाबांना दिसत नाही, पण त्यांची मुलं ते स्वीकारतात आणि आनंदाने जगतात हे सांगत राहिले आणि मग रायमाची मला दिसत नसल्याची तक्रार नाहिशी झाली. तिला आता माझ्यातली उणीव नाही तर ताकद दिसायला लागली आहे, याचा मला एक आई म्हणून खूप आनंद होतो. एकदा शाळेतून रायमा फुगा होवून आली होती. का रागावली आहे? हे विचारल्यावर तिने शाळेत काय घडलं ते सांगितलं. मला पाहून काही मुलांनी, ' ये तेरी मम्मी है क्या? तेरी मम्मी अंधी है!' असं म्हटलं. ते रायमाला अजिबात आवडलेलं नव्हतं. मी तिला विचारलं, यावर तू काय म्हणालीस , तर रायमा म्हणाली की , 'मी त्यांना सांगितलं, की मेरी मम्मी अंधी है तो क्या हुवा वो बहोत होशियार है!' हे ऐकून रायमाला आपण कळलो याचा खूप आनंद झाला होता.
आता रायमा सव्वा सहा वर्षांची झाली आहे. आपल्या आईला कुठे मदत करायला हवी हे तिचं तिलाच समजलं आहे. मी न सांगताही ती पटापट मला लागतात त्या वस्तू हातात आणून देते. तिच्या या शहाण्या वागण्याने माझी आव्हानं तिने सोपी करुन टाकली आहे.आई होणं म्हणजे आपण बाळाला जन्म देणं, त्याला वाढवणं, घडवणं एवढंच नसतं, तर आपल्याला आपलं मूलही घडवत असतं. आपल्या कमतरतांवर मात करायला तेही आपल्याला शिकवतं, ताकद देतं, आत्मविश्वास देतं याची जाणीव मला आता होते आहे. आम्ही दोघीही आता एकमेकींना एकमेकींच्या सोबतीने घडवतो आहोत, एकमेकींना आधार आणि ताकद देत आहोत. रायमा माझ्या आयुष्यातली परी आहे. पण ही परी कधी माझी आई झाली, माझी मैत्रिण झाली हे माझं मलाच समजलं नाही. आईपणाचा आनंद आणि समाधान यापेक्षा काही वेगळं असतं का?
(वृषाली आकाशवाणीवर निवेदिका आहेत.)(शब्दांकन : माधुरी पेठकर)