सायली जोशी-पटवर्धन
उंची कमी असल्याने तिला लहानपणापासून कायमच हिणवले गेले. लग्नासाठी स्थळं शोधताना तर उंची आमच्याइतकी म्हणजे ५.७ वगैरे उंची हवी म्हणून कित्येक मुलांनी नकार दिला. उंचीमुळे लग्नात अडथळे येत असल्याने तीचं मन खट्टू झालं आणि ती निराश झाली. पण यावरच ती थांबली नाही. आपली उंची कमी आहे म्हणून काय झालं, ती आपण वाढवू शकत नाही पण आपल्या कतृत्त्वाची उंची नक्की वाढवू शकतो. त्या उंचीने आपली ओळख निर्माण करायची असा पण पुण्यातल्या एका तरुणीने केला. मग सुरु झाला तिच्या स्वप्नांचा प्रवास (Mountaineer Smita Ghuge from Pune Successfully climbed Mount Elbrus Highest Pick in Russia) .
जगातील ७ खंडातील ७ उंच शिखरे सर करायचा निश्चय स्मिता घुगे हिने केला आणि ऐन लॉकडाऊनमध्ये तिने या मोहिमांना सुरुवातही केली. नुकतेच स्मिताने रशिया येथील माउंट एल्ब्रूस शिखर सर केले. इतकेच नाही तर महाराष्ट्राची आणि भारताची शान दाखवण्यासाठी स्मिताने याठिकाणी १५ ऑगस्ट रोजी ७५ फूट तिरंगा फडकवून नवा विश्व विक्रम केला. माउंट एल्ब्रूसची उंची ५६४२ मीटर म्हणजेच १८,५१० फूट आहे. उणे २५ ते ३५ डिग्री तापमान आणि सोसाट्याचे वादळी वारे अशा प्रतिकूल परिस्थितीत स्मिताने केवळ जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर ही चढाई पूर्ण केली. इतकेच नाही तर तिने मराठमोळी नऊवारी साडी नेसून हा झेंडा फडकावला.
आपल्या जातीत हुंडा मागण्याची पद्धत आहे, मात्र आपण उच्च शिक्षण घेऊन, नोकरी करतो, अशावेळी हुंडा का द्यायचा असा प्रश्न स्मिता विचारते. हुंडाबंदी असताना हुंडा देणार नाही या निश्चयावर स्मिता ठाम आहे त्यामुळे लग्नाला उशीर झाला तरी चालेल पण हुंडा घेणाऱ्या मुलाशी लग्न करणार नाही असे स्मिताने ठरवले आहे. विशेष म्हणजे आपल्या मोहिमांतूनही स्मिता हुंडाबंदीचा संदेश देण्याचे अतिशय महत्त्वाचे काम करत आहे. याआधी स्मिताने माउंट किलीमांजारो या आफ्रिका खंडातील सगळ्यात उंच १९,३४१ फूट उंचीचे शिखर सर केले होते. सोबतच आशिया खंडातील माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्पवर देखील चढाई केली आहे.
आपल्या गिर्यारोहणाच्या प्रवासाबाबत सांगताना स्मिता सांगते, आनंद बनसोडे यांनी आपल्याला सुरुवातीपासून मार्गदर्शन केले असून त्यांच्याकडून प्रभावित होऊनच आपण या मोहिमा करण्याचे ठरवले. अगदी ३ वर्षांपूर्वी म्हणजे २०२० मध्ये पहिल्यांदा कळसूबाई शिखर सर केले आणि तिथून गिर्यारोहणाचा प्रवास सुरू झाला. लहानपणापासून योगा, रनिंग या सगळ्याची आवड होती त्यामुळे ते सगळे करतच होते, पण गिर्यारोहण असे ३ वर्षापूर्वीच सुरू केले. गिर्यारोहणासाठी तुम्हाला रोज १० ते १५ किलोमीटरचे चालणे, धावणे, १ तासाचे मेडीटेशन हे सगळे झालेच पाहिजे. आपल्या आहाराचीही यासाठी विशेष काळजी घ्यावी लागते. बाहेरचे न खाता जास्तीत जास्त पौष्टीक आणि घरचा आहार घेणे आवश्यक असते. ऑक्सिजनची क्षमता वाढण्यासाठी प्राणायम आणि विविध प्रकारचे व्यायामप्रकार करणे आवश्यक असते.
माऊंट एल्ब्रूस सर करताना काय आव्हानं आली आणि त्यावर कशी मात केली?
हे शिखर पूर्णपणे बर्फात असल्याने त्या वातावरणाशी जुळवून घेणे हे सर्वात महत्त्वाचे आव्हान असते. या वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी काही दिवस जावे लागतात. अनेकदा या वातावरणात जेवण जात नाही, जेवलो तरी पचत नाही. श्वसनाच्या अडचणी येण्याची शक्यता असते. प्रतिकारशक्ती चांगली असेल आणि तुम्हा चांगला व्यायाम करुन तयार झालेले असाल तर तुम्ही या वातावरणाशी कमी कालावधीत जुळवून घेऊ शकता. आपल्या डोक्यात ट्रेकींग किंवा हायकींगची संकल्पना खूप वेगळी असते. आपण इथे नेहमीचे स्पोर्टस शूज घालून गड-किल्ले चढत असतो. पण त्याठिकाणी एक बूट किमान ३ ते ४ किलो वजनाचा असतो, त्याला खाली बर्फासाठी क्रॅम्पॉन्स असतात. तसेच बर्फ असल्याने अंगात २ ते ३ लेअर कपडे, सामान, पाणी असे सगळे घेऊन चढाई करायची असते, हे सगळेच आव्हानात्मक असते. वातावरणाने आपल्याला याठीकाणी चांगली साथ देणे गरजेचे असते. एकाएकी वादळी परिस्थिती आली तर त्या स्थितीतही आपल्याला त्या वातावणाशी जुळवून घ्यावे लागते. अशावेळी मनस्थिती स्थिर ठेवणे अतिशय गरजेचे असते. तसेच याठिकाणी सतत बर्फ असल्याने पांढरा रंग पाहून आपल्या डोळ्यांना त्रास होतो. मला हाईटचा फोबिया असल्याने उतरताना किती अंतर आहे हे आपण पाहतोच. त्यामुळे मला शेवटच्या टप्प्यावर आल्यावर एका ठिकाणी चक्कर आल्यासारखे झाले होते.
गिर्यारोहणाकडे इतर देशांमध्ये आंतरराष्ट्रीय खेळ मानला जातो. मात्र आपल्याकडे आजही त्याला म्हणावे तितके महत्त्व नाही. आपल्याकडे गिर्यारोहणात उत्तम कामगिरी करणारे असंख्य जण असताना शासनाच्या स्तरावरुन या खेळासाठी आर्थिक हातभार म्हणावा तितका मिळत नाही. गिर्यारोहण ही खर्चिक गोष्ट आहे, त्यामुळे तुम्हाला एखादी चढाई करायची असेल तर तुमच्या खिशातून खर्च करुनच करावी लागते. पण प्रत्येकाला ते शक्य होते असे नाही. त्यामुळे जर या खेळाला शासन स्तरावर दर्जा मिळाला तर आर्थिक हातभार मिळण्यास निश्चितच मदत होऊ शकते यामुळे बरेच गिर्यारोहक आपल्यातील क्षमतेला वाव देऊ शकतील.
आपल्याला ज्या लोकांनी उंचीमुळे रिजेक्ट केले त्यांना मला हेच सांगायचे आहे की मी लवकरच ७ खंडातील ७ शिखरं सर करायची आहेत. मुलींना काहीवेळा अशाप्रकारच्या गिर्यारोहणासाठी सोडताना आईवडील विचार करतात. कारण काही वेळा एकटीने प्रवास करावा लागतो. गिर्यारोहण करतानाही काही वेळा आपण एकटेच असण्याची शक्यता असते. मात्र मुलगी म्हणून आपण खंबीर असायला हवे. म्हणजे आपोआपच घरच्यांनाही आपल्या क्षमतेचा आणि ठामपणाचा अंदाज येतो आणि ते पाठिंबा देण्यास तयार होतात. मी कायमच एखादी गोष्ट करताना बराच विचार करते. आपल्यासमोरचे पर्याय काय आहेत याचा पूर्ण विचार करायला हवा. माझी स्वप्नं मी स्वत:च्या हिमतीवर पूर्ण करत आहे. नेहमीच सगळ्यांपेक्षा वेगळं काहीतरी करायचं अशी जिद्द असल्याने मी या क्षेत्रात आले.