"छान किती दिसते फुलपाखरु" या बालगीताच्या ओळी आपण सगळ्यांनी लहानपणी ऐकल्याचं असतील. आकाराने लहान, नाजूक, रंगीबेरंगी फुलपाखरु पाहायला खूपच छान वाटत. ही रंगीबेरंगी फुलपाखरं या फुलावरून त्या फुलावर बागडतांना खूपच शोभून दिसतात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच नाजूक फुलपाखरु अलगद हातात पकडण्याचा मोह आवरत नाही. या रंगीबेरंगी फुलपाखरूंना अलगद हातात पकडणे, त्यांना एखाद्या बरणीत जपून ठेवणे, त्यांची देखभाल करणे, यांसारख्या अनेक गोष्टी आपल्यापैकी बऱ्याचजणांनी बालपणी केल्या असतील.
फुलपाखरु पकडून त्यांचे पालनपोषण तसेच जतन व संवर्धन करण्याचा छंद मुंबईच्या 'प्रियंका सिंह' यांनी जोपासला आहे. मूळची वाराणसीची रहिवासी असलेल्या प्रियंका हिने चक्क मुंबईतील आपल्या राहत्या घरात १३ व्या मजल्यावर फुलपाखरूंचे जतन केले आहे. लोक घरांत कुत्रा, मांजर असे पाळीव प्राणी पाळतात. परंतु प्रियंकाने आपल्या घरात फुलपाखरु पाळून त्यांचे जतन, पालनपोषण करुन आपल्या समोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे. प्रियंकाने कधीच विचार केला नव्हता की एक दिवस ती निसर्गाची रक्षक म्हणून काम करेल आणि लोक तिच्याकडून फुलपाखरांची काळजी घ्यायला शिकतील(Mumbai’s Priyanka has reared 5000 butterflies on the 13th floor, would like to know how?).
अशी झाली सुरुवात...
प्रियंकाने आपल्या राहत्या घराच्या बाल्कनीत भरपूर झाडे व छोटी छोटी रोप लावली. प्रियंका घरातील जैविक कचऱ्यापासून या झाडांसाठी व रोपांसाठी खत तयार करायची. असेच एक दिवस एक छोटा सुरवंट रोपाच्या पानांना खात असताना तिने पाहिले. सुरुवातीला तो किडा कोणता आहे हे तिच्या लक्षात आले नाही. तिने तो किडा तसाच तिथे राहू दिला. काही दिवसांनी तिने पाहिले तर त्या किड्याचे रूपांतर एका छान, रंगीबेरंगी फुलपाखरामध्ये झाले होते.
या घटनेनंतर, प्रियंकाला फुलपाखरांविषयीचे प्रेम आणि त्यांच्याविषयीचा अभ्यास करण्याची प्रेरणा मनात निर्माण झाली. त्यानंतर प्रियंकाने फुलपाखरांविषयीचाअभ्यास करण्यास सुरुवात केली. तिने "बॉम्बे नॅच्युरल हिस्ट्री सोसायटी'' (Bombay Natural History Society) या संस्थेतून फुलपाखरांविषयीचा एक सर्टिफिकेट कोर्स देखील केला. फुलपाखरांची प्रजनन प्रक्रिया, फुलपाखरांच्या प्रजाती, त्यांचे खानपान, त्यांची अंडी देण्याची प्रक्रिया या सगळ्या गोष्टींचा तिने सविस्तर अभ्यास केला. इतकेच नव्हे तर फुलपाखरु एका विशिष्ट प्रकारच्या झाडावरच आपली प्रजनन प्रक्रिया करते म्हणून अशाप्रकारच्या झाडांची लागवड करुन तिने आपली बाल्कनी संपूर्ण भरुन टाकली.
त्यांच्या या कामांत त्यांची ११ वर्षांची छोटी मुलगी देखील त्यांना खूप मदत करते. प्रियंकाने केवळ आपल्या बाल्कनीतच नाही तर आपल्या सोसायटी व आजूबाजूच्या परिसरांत देखील अशा झाडांची लागवड केली. प्रियंका व तिची लहान मुलगी आपल्या आसपास असणाऱ्या झाडांचे सतत निरीक्षण करत असतात. कुठल्या झाडांवर कोणी फुलपाखराला जन्म दिला आहे का? या सगळ्याच्या नोंदी त्या ठेवतात.
मिळाली नवी ओळख...
प्रियंकाने २०१२ साली, एका किचन गार्डन इव्हेंटमध्ये आपला हा अनुभव शेअर केल्यानंतर तिला एक ओळख मिळाली. आत ती 'बटरफ्लाई मॉम' या नावाने सर्वत्र ओळखली जाते. फुलपाखरांचे जतन संवर्धन कसे करावे या विषयांवर पुढच्या पिढीला माहिती देण्यासाठी आता ती शाळा - कॉलेजमध्ये वर्कशॉप्स आयोजित करते. प्रियंकाने आतापर्यंत एकूण ५००० फुलपाखरांचे पालनपोषण केले आहे. तिच्या म्हणण्यानुसार, "फुलपाखरं कधीच एका जागेवर स्थिर राहू शकत नाही. त्यांचे योग्य ते पालनपोषण करुन ती मोठी झाल्यावर उडून जातात."