देशाच्या दूर कोपऱ्या ईशान्य भारतात किती सुंदर काम चालतं याची माहिती अनेकदा आपल्यापर्यंत येतही नाही. दुर्गम भागात, अनेक अडचणींचा सामना करत लोक तिथं प्रश्नांना भिडतात, आपल्या प्रश्नांची उत्तरं आपल्यासाठी शोधतात. त्यातल्याच नागालॅण्डमधल्या शिक्षिका मीमी योशू. त्यांना नुकताच शिक्षक दिनाला राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार मिळाला. सकारी माध्यमिक शाळेत मीमी योशू ( Mimi Yhoshü) मुख्याध्यापिका आहेत. त्यांनी अतिशय कमी साधनं असताना, पैसे नसताना त्यांच्या शाळेत उत्कृष्ट काम केलं. प्रयोग इतके की एकेक प्रयोग वाचून खरोखरच थक्क व्हावं.
(Image : Google)
योशू यांच्या शाळेत फार वर्ग नव्हते, पक्के छतही नव्हते. राज्यपालांच्या मदतीने कच्चे बांधकाम करुन वर्ग सुरु झाले. पण योशू सांगतात, मुळात आव्हान होतं पालक आणि शिक्षकांना सोबत घेऊन वर्गात मुलांचं मन रमेल त्यांना स्वत:ला काही करुन पाहता येईल असे प्रयोग करणं. मग त्यांनी प्लास्टिकच्या इतस्त: फेकण्यात आलेल्या बाटल्यांमधून शाळेला कंपाऊंड भिंत बांधली. शाळेच्या आवारातच भाज्या लावून मुलं तिथं काम करु लागली. दुपारच्या जेवणात त्याच बागेतल्या भाज्या वापरण्यात येऊ लागल्या. चौथी ते आठवीच्या मुलांना त्यांनी डिग्रेडेबल आणि नाॅन डिग्रेडेबल वस्तू ओळखून त्यांचा पुर्नवापर करुन नवीन वस्तू बनवण्याचे उपक्रम सुरु केले. एकच वस्तू पुन्हा पुन्हा नीट वापरली तर आपण किती प्लास्टिक कमी करु शकतो हे मुलांनं शिकवले.त्याच उपक्रमाचा भाग म्हणून त्यांनी प्लास्टिक बाटल्या गोळा करुन त्यापासून पायपुसणी बनवली, बॅगा बनवल्या. कचऱ्यात जाणारा एकेक कागद वापरुन त्यापासून टोकऱ्या बनवल्या. त्या वस्तू मुलांनी विकल्या त्यातून पैसा शाळेला मिळू लागला. मुलं या उपक्रमात रंगली. मुलांसाठी हा अनुभव अत्यंत वेगळा होता. स्थानिक वृत्तपत्रांना दिलेल्या मुलाखतीत योशू सांगतात, ‘शिक्षण म्हणजे चार भिंतीत पुस्तकं वाचून होतं असं नाही. ते महत्त्वाचंच. पण आपल्या भवतालाशी आपलं नातं निर्माण करणं, त्यातून नवीन काहीतरी घडवणं, आनंदी व्हायला शिकणं हे खरं शिक्षण. मी शिक्षिका झाले, हा पुरस्कार मिळाला यासाऱ्याचा फायदा माझ्या विद्यार्थ्यांना मिळायला हवा त्यासाठी हे उपक्रम करणं माझं कर्तव्यच आहे.’असे शिक्षक आहेत म्हणून विद्यार्थी घडतात..