अन्नू राणी. (Annu Rani) २९ वर्षांच्या या तरुणीनं इतिहास घडवला आहे. अमेरिकेत ओरेगाॅन राज्यातील युजीन शहरात सुरु असलेल्या जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पिअनशिपची (World Athletics Championships 2022) अंतिम फेरी गाठली. खरंतर जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पिअनशिपमध्ये अन्नू राणी तिसऱ्यांदा सहभागी झाली आहे. मात्र यंदा सलग दुसऱ्यांदा तिने जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पिअनशिपची अंतिम फेरी गाठली आहे. तिच्या भाल्यानं (javelin) अजून लांब जात तिच्या संघर्षाला नवीन झळाळी प्राप्त करुन दिली. एक काळ होता अन्नू राणीकडे सराव करण्यासाठी भाला देखील उपलब्ध नव्हता ती अन्नू राणी आता जागतिक विक्रमापर्यंत पोहोचली आहे.
Image: Google
अन्नू राणीचा जन्म उत्तर प्रदेशातील मीरत येथील बहादुरपूर गावात एका शेतकरी कुटुंबात झाला. पाच बहिणी आणि एक भाऊ.अन्नू राणी सर्वात लहान. घरची परिस्थिती अतिशय बेताची. अन्नू राणीचा भाऊ उपेंद्र धावण्याचा सराव करायचा. आपल्य भावाप्रमाणे आपणही खेळाडू व्हावं असं लहानपणापासूनच अन्नू राणीला वाटायचं. तिचं स्वप्न आणि तिच्यातलं कौशल्य तिच्या भावानं ओळखलं. ती क्रिकेट खेळायची. फिल्डींग करणाऱ्या अन्नू राणीचे थ्रो जबरदस्त असायचे. हे थ्रो बघून आपल्या बहिणीच्या मनगटातली ताकद भावानं ओळखली. उपेंद्रने अन्नू राणीला भाला फेकीचा सराव करण्यास प्रोत्साहन दिलं. तिचं प्राथमिक प्रशिक्षण तोच घेऊ लागला. घरच्या बेताच्या आर्थिक परिस्थितीमुळे अन्नू राणीला भाला फेक शिकण्यासाठी भालाही मिळणं शक्यच नव्हतं. तेव्हा भावानं तिला ऊस हाती घेऊन भालाफेक शिकवली. भाल्याच्या ऐवजी ही मुलं ऊस फेकायची. पुढे बांबू तासून या मुलांनी भाला बनवला आणि त्यावर ती प्रॅक्टीस करायची. अन्नू राणीचं खेळणं सुरुवातीला वडिलांना पसंत नव्हतं. त्यांनी विरोध केला. अन्नू राणीनं खेळाडू बनू नये असंच त्यांना वाटत होतं. पण भावाच्या मदतीमुळे अन्नू राणीचा खेळाडू बनण्याचा निर्धार आणखी पक्का झाला होता.
Image: Google
अन्नू राणी भावाच्या मदतीनं स्वत: सराव करत भालाफेक शिकली. नंतर ती जिल्हा आणि राज्य पातळीवरील स्पर्धात भाग घेऊ लागली. २०१० मधील काॅमनवेल्थ स्पर्धेत ब्राॅंझ पदक विजेते भालाफेक पटू काशिनाथ नाईक यांचं लक्ष अन्नू राणीकडे गेलं. तिच्यातलं कौशल्य आणि ताकद बघून त्यांनी अन्नू राणीला प्रशिक्षण द्यायचं ठरवलं. २०१३ पासून अन्नू रणी काशिनाथ नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करु लागली. अन्नू राणीने २०१४ मध्ये ५८.८३ मीटर भाला फेक करुन स्वत:चा राष्ट्रीय विक्रम मोडत काॅमनवेल्थ गेम्ससाठी पात्र ठरली. २०१४ च्या एशियन गेम्समध्ये ब्राॅंझ पदक जिंकलं.२०१६ मध्ये ५६ व्या नॅशनल ओपन ॲथलेटिक्स चॅम्पिअनशिपमध्ये ६०.०१ मीटर लांब भाला फेक करुन पुन्हा स्वत:चा रेकाॅर्ड मोडला. २०१९ च्या जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पिअनशिपमध्ये ६२.४३ मीटर लांब भाला फेक करुन तिनं आपली स्पर्धा स्वत:शीच असल्याचं दाखवू दिलं.
Image: Google
सध्या अमेरिकेतल्या सुरु असलेल्या जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेत खेळताना पहिल्या तीन प्रयत्नामध्ये पहिला प्रयत्न फाउल गेला. दुसऱ्या प्रयत्नात ५५.३५ मीटर लांब भाला फेक केली तर शेवटच्या प्रयत्नात ५९.६० मीटर लांब भाला फेक करुन अन्नू राणीनं अंतिम फेरी गाठली. २३ जुलैला होणाऱ्या अंतिम फेरीत अन्नू राणीने सुवर्णपदक जिंकलं तर तो फक्त तिच्याचसाठी नाही तर साऱ्या देशासाठी अभिमानाचा क्षण ठरेल. तोच क्षण कशाला, आजवरची तिची झेपही कौतुकास्पदच आहे.