माधुरी पेठकर
शिक्षक व्हायचं असं कधी त्यांनी ठरवलं नव्हतं त्यामुळे बीए बीएड वगैरेही केलं नव्हतं. पण प्रयोगशील शिक्षिका म्हणून त्या आज फार उत्तम काम करत आहेत. कोल्हापूरच्या सृजन आनंद त्या शाळेत शिक्षिका आहे. सुचिता पडळकर त्यांचं नाव. त्या म्हणतात, ‘ माझं हे शिक्षकपण वेगळं आहे. कारण शाळा वेगळी आहे. सृजन आनंद विद्यालय ही समाजानं आणि पालकांनी चालवलेली शाळा आहे. शाळेतील सर्व शिक्षक म्हणजे समाजातली अशी माणसं आहोत ज्यांना शिक्षणात आस्था आहे, मुलांना समजून घेवून घडवण्याची इच्छा आहे. त्यामुळे आम्ही सतत अभ्यास करत असतो. आम्ही प्रशिक्षित शिक्षक नसलो तरी आम्ही सतत अभ्यास करणारे शिक्षक आहोत. आमचं शिक्षकपण वेगळं आहे. हे व्यावसायिक शिक्षकपण नसून समाजाचं घेतलेलं शिक्षकपण आहे. मी आमच्या शाळेतली माझ्या इतर सहकाऱ्यांप्रमाणे मानस सेवा देणारी शिक्षक आहे.’त्या बोलतात तेव्हा प्रश्न पडतो की शिक्षक तर शिक्षक असतो मग ही शाळा आणि शिक्षिका म्हणून काम करताना सुचिता पडळकर यांचे खास प्रयोग नेमके कसे आहेत?
त्या सांगतात..तसं बघितलं तर प्रत्येक माणूस हा शिक्षकच असतो. आपण सर्व पालक आपल्या मुलांचे शिक्षकच तर असतो. आपण समाजातल्या मुलांचेही शिक्षकपण घेतलेलंच असतं. प्रत्येक माणसामध्ये एक शिक्षक असतोच. आपण जेव्हा इतरांशी समजूतदारपणे वागतो, समजून घेतो, दुसऱ्याच्या उत्थानासाठी प्रयत्न करतो तेव्हा आपण शिक्षकच असतो. विवेकाने, डोळसपणे आपण कोणतीही कृती करतो तेव्हा आपण शिक्षकच असतो. आपल्या कुटुंबात जेव्हा आपण सल्लामसलत करत असतो तेव्हा शहाणपणाची शिक्षकाची भूमिका घेत असतो, असं मला वाटतं. त्यामुळे शिक्षक म्हणून काम करण्याआधीही मी शिक्षकच होते. आताही शिक्षक आहे आणि आयुष्यभर शिक्षकच राहीन. माझं लहानपण वर्ध्याच्या आश्रमात गेलं. माझे आजोबा शिक्षक असल्यामुळे माझं लहानपण तिथे गेलं. तिथल्या वातावरणाचा परिणाम आम्हा चौघा भावंडांच्या जडणघडणीवर झाला. एक नागरिक म्हणून आम्ही चौघेही उत्तम घडलो. १९८० सालापासून मी कोल्हापूरात राहातेय. १९८७ मध्ये माझी मुलगी जेव्हा सृजन आनंद विद्यालयात शिकायला जायला लागली तेव्हा माझा आणि लीलाताई पाटील यांचा परिचय झाला. आणि तेव्हापासून २०२० पर्यंत मी लीलाताईंबरोबर सहकारी, त्यांची शिष्य म्हणून काम केलं.’
कोणते उपक्रम केले जातात?
मुलांसोबत सतत नवीन उपक्रम घेत राहणं हे सृजन आनंद विद्यालयातील शिक्षक म्हणून मी सतत करत असते. पर्यावरण, निसर्ग, स्थानिक संस्कृती, समाज यांच्याशी मुलांना जे उपक्रम जोडून ठेवतात ते आम्ही करतो. मुलांमध्ये चांगल्या गोष्टी सतत आणि हळूहळू झिरपत जातील, मुरत जातील. आणि मुलांमध्ये हे झिरपलेलं, जिरलेलं, मुरलेलं असतं ते त्यांच्या भवताली असणाऱ्या माणसांच्या वागण्यातून दिसावं ही यामागची अपेक्षा असते.उदा. एरवी आपण कितीही मुलांना सांगितलं असतं की ज्वारी खा, नागली खा तर मुलांनी ऐकलं नसतं. पण पौष्टिक असतं म्हणजे काय असतं, नेमकं काय असतं या भरड धान्यात, काय फायदा होतो ही खाल्ल्याने हे मुलांना कृतीतून शिकवलं की लगेच पटतं. यासाठी यंदा शाळा सुरु झाल्यानंतर शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त आणि नंतर १ जुलैला येणा़ऱ्या कृषी दिना निमित्त २६ जून ते १ जुलै मुलांनी भरड धान्याचा अभ्यास केला. त्यांनी भरड धान्यांचा बाजार भरवला. या उपक्रमामुळे एक अभ्यास म्हणून नाही तर अनुभवातून मुलं भरड धान्यांचं महत्व शिकली. आता त्यांच्या मनावर या भरड धान्यांचं जे महत्व रुजलं आहे ते कधीही पुसलं जाणार नाही.मुलं वाचत नाही असं मोठी माणसं म्हणतात, पण मुलांमध्ये वाचन संस्कार रुजवण्यासाठी आपण काय करतो हेही महत्वाचं. कोविडनंतर जेव्हा मुलांचा आणि एका जागी बसून शिकण्याचा, लिहिण्याचा, वाचण्याचा सराव सुटला होता. अशा परिस्थितीत मुलांना रागवून, शिक्षा करुन बळजबरीने अभ्यासाला लावणं हे चुकीचं ठरलं असतं. त्याचा पुढे वाईटच परिणाम झाला असता. म्हणून शाळेत एक नाविन्यपूर्ण उपक्रम घेतला. तेव्हा नाशिकला साहित्य संमेलन होतं. म्हणून आमच्या शाळेत मुलांचं साहित्य संमेलन भरवलं. मुलांनी कविता लिहिल्या, वाचन केलं, पुस्तकं वाचली. त्यामुळे पुस्तकाशी मुलांचा संपर्क जोडला गेला. याचा परिणाम म्हणजे मुलं नंतर पुन्हा आनंदाने अभ्यासाला लागलीमुलांना देण्यातला आनंद कळावा म्हणून नाताळच्या निमित्ताने मुलांना आपण कोणाचा सांताक्लाॅज होवू शकतो का? हे विचारलं. आपण कोणाला मदत करु शकतो का? हा प्रश्न विचारल्यावर मुलं अंतर्मुख झाली. आणि त्यांनीच कोरोनामुळे ज्यांचे आई बाबा गेले त्या मुलांची मदत करायची हे मुलांकडूनच आलं. ही चौथीची मुलं होती. मग त्यांनी चारही वर्गात जावून आपण काय करणार, काय मदत करणार हे सांगितलं आणि तुम्ही येणार का आमच्याबरोबर असा प्रश्न विचारला तेव्हा सर्व मुलं तयार झाली. २५ डिसेंबर ते १ जानेवारी पर्यंत मुलांनी निर्मितीचा उत्सव केला. बांधणीचे रुमाल, वर्तमानपत्रापासून चटया, बसकनं बनवली. दुसरीच्या मुलांनी आलेपाक आणि चटण्या तयार केल्या. पहिलीच्या मुलांनी छोट्या छोट्या डायऱ्या बनवल्या. पण नंतर पुन्हा लाॅकडाउन सुरु झाला. पण माल तर तयार झाला होता. मग मुलांना तो घरोघरी जावून विकायला लावला. मुलांनी तो सर्व विकून १८ हजार रुपये उभे केले. नंतर त्यात शिक्षकांनी भर घातली. लीलाताईंच्या ट्रस्टने काही मदत केली. असे आम्ही १ लाख रुपये उभे केले. कोरोनामुळे ज्यांचे आई किंवा बाबा गेले होते अशा मुलांचा शोध घेतला तेव्हा १० मुलं मिळाली. अशा मुलांना त्यांच्या पालकांसोबत २६ जानेवारीला शाळेत बोलावलं आणि त्या मुलांच्या नावानं केलेली १० हजार रुपयांची एफडी त्यांच्या पालकांकडे सुपूर्द केली. मुलांना हे काम करुन खूप आनंद मिळाला. मुलांना असं अनुभवातून शिकवण्यातला आनंद मिळत गेला. जितका मुलांना मिळाला तितकाच एक शिक्षक म्हणून मलाही मिळाला. प्रयोगशील शाळेतील एक शिक्षक म्हणून मी उपक्रम घेते म्हणजे काय तर ही जी समाजाबद्दलची कृतज्ञता आहे, करुणा आहे त्याचे पाझर सतत प्रवाहित ठेवणं म्हणजे उपक्रम आणि त्यातून शिकणं होय. मुलांना प्रत्यक्ष कृतीतून शिकण्यातला अनुभव मिळावा यासाठी सतत प्रयत्न करत राहायचे, तशी संधी शोधायची हे माझं शिक्षक म्हणून काम आहे, जे मी आनंदाने करते.सृजन आनंद विद्यालयात मुलांना शिकवताना मी स्वत: जे शिकले ते मी माझं व्यावसायिक शिक्षण मानते. इतक्या वर्षं मुलांसोबत राहताना मीही मुलांसोबत वाढत गेले. ही मुलं मला एक फार महत्त्वाची आणि मोठी गोष्ट शिकवतात ती म्हणजे क्षमाशिलता. ही मुलं इतरांना सहज क्षमा करुन टाकतात. ते झालेल्या गोष्टींबद्दल कधीच मनात राग धरत नाही. थोडी रुसतात-फुगतात पण लगेच सर्व विसरतातही. ही खूप मोठी गोष्ट आहे जी त्यांना जमते, ती मलाही जमायला हवी हे मला रोज माझी शाळेतली मुलं शिकवत असतात. आमच्या शाळेत सर्व स्तरातील मुलं येतात. त्या सर्व मुलांचं बालपण आनंदात जावं, कृतीशीलतेत जावं, मुलांचं अनुभवविश्व समृध्द व्हावं यासाठी एक शिक्षक म्हणून मी कायमच प्रयत्न करत राहीन. खरं सांगू यासारखा दुसरा आनंद दुसरा नाही!
(सुचिता पडळकर कोल्हापूरच्या सृजन आनंद शाळेत शिक्षिका आहेत.)