प्रगती जाधव- पाटील
कष्टाची तयारी आणि अंगी जिद्द असेल तर दगडालाही पाझर फुटतो, असं म्हणतात. माण तालुक्यातील गोंदवले खुर्दच्या रक्षितानाने जिद्द आणि चिकाटीच्या जोरावरच ओसाड माळरानाला पाझर फोडला. जिथं कुसळांशिवाय काही दिसत नव्हतं त्या ओसाड माळरानावर आज हिरवाई नांदताना पहायला मिळत आहे. रक्षिताने ओसाड माळावर वनराई फुलवली असून शंभर-दोनशे नव्हे तर हजारो वृक्षांचे रोपण आणि संगोपन तीने मोठ्या जिद्दीने केले आहे (Navratri Special Rakshita Bansode Inspirational Story).
माणदेश म्हणजे दुष्काळी भाग. पावसाळ्यात पडणाऱ्या पावसाचे पाणी माणदेशच्या माळावरुन खळाळा वाहून जाते. त्यामुळे पाऊस उघडताच या भाग पुन्हा फुफाट्याने गुदमरतो. मात्र, याच माळरानावर वनराई फुलविण्याचे काम गोंदवले खुर्द येथील रक्षिता शंकर बनसोडे या युवतीने केले आहे. राज्यात २०१७-१८ या कालावधीत तीव्र दुष्काळ पडला होता. माणदेशला या दुष्काळाच्या तिव्र झळा सोसाव्या लागल्या. मात्र, याचवेळी अवघ्या तेरा वर्ष वयाच्या रक्षिताने थोरला भाऊ रोहित याच्या दुष्काळ मुक्तीसाठी पहिले पाऊल उचलले. गोंदवले खुर्द या स्वत:च्या गावात वन विभागाच्या पडिक जमिनीवर डोंगर उतारावरून वाहून जाणारे पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्यासाठी रक्षिता व तीच्या भावाने टिकाव, खोरं, घमेलं घेऊन ओसाड माळरानावर सत्तर समतोल चारी खोदल्या. त्याद्वारे पाणी अडवून मुरवण्यात त्यांना यश मिळाले. त्यानंतर वड, पिंपळ, उंबर, कडूलिंब, आवळा, बेहडा आशा झाडांचे रोपण केले. या रोपांना डोक्यावरून हंडा, कळशीच्या साह्याने पाणी आणून रोपे जगवली.
याच काळात झाडांचे संगोपन करताना रक्षिताला पर्यावरण संवर्धनाचा ध्यास लागला आणि त्याच ध्येयाने तीने वृक्षारोपण आणि संवर्धनाचा वसा घेतला. गत सात वर्षांपासून त्यासाठी ती खडतर संघर्ष करीत आहे. रक्षिताने गोंदवलेतून सुरू केलेला वृक्षारोपणाचा प्रवास सध्या तीन जिल्ह्यातील तेरा गावात पोहोचला आहे. माणदेशी भागातील वेगवेगळ्या तेरा गावात हजारो झाडांची तेरा रक्षिता वने साकारण्यात आली आहेत. गत सात वर्षांपासून करीत असलेले रक्षिताचे कार्य साता समुद्रापार पोहोचले असून महाराष्ट्रातील अनेक संस्था, फौंडेशन, दानशूर व्यक्ती या कामात तीला मदत करत आहेत.
रक्षिताचा सन्मान
वृक्षारोपण आणि संवर्धनाच्या रक्षिताच्या कामाची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने ‘छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्काराने’ तीला गौरविले आहे. तसेच ‘अनन्य पुरस्काराने’ही तीचा सन्मान करण्यात आला आहे. तीला राज्यभरातून तब्बल दीडशे तर परदेशातून चार पुरस्कार मिळाले आहेत. हे पुरस्कार तीच्या कामाची पोचपावती तसेच तीच्या कार्याला आणखी ऊर्जा आणि बळ देणारे आहेत.
रक्षिता म्हणते...
सध्याच्या काळात माणदेशी भागात अत्यंत कमी प्रमाणात पाऊस पडत आहे. दुष्काळ पडण्याची चिन्हे दिसत आहेत. ही परिस्थिती बदलण्यासाठी जास्तीत जास्त वृक्षारोपण होणे गरजेचे आहे. त्यामुळे प्रत्येकाने वृक्षारोपण आणि वृक्ष संगोपनात योगदान द्यावे. प्रत्येकाने पर्यावरण रक्षणासाठी योग्य पाऊल उचलले तरच माझा गेल्या सात वर्षांपासूनचा संघर्ष यशस्वी झाला, असे वाटेल.