"नन्हीं चींटी जब दाना लेकर चलती है,चढ़ती दीवारों पर, सौ बार फिसलती है । मन का विश्वास रगों में साहस भरता है,चढ़कर गिरना, गिरकर चढ़ना न अखरता है ।आख़िर उसकी मेहनत बेकार नहीं होती,कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती ...
या ओळी मराठवाड्याच्या एव्हरेस्ट वीर मनीषा वाघमारे यांच्या जिद्द, चिकाटी आणि हिमतीचं वर्णन करण्यासाठी अगदी समर्पक आहेत. कारण निसर्गाने एकदा त्यांना असंच नमविण्याचा, हरविण्याचा प्रयत्न केला हाेता. तेव्हा निसर्गाच्या त्या रौद्र रुपासमोर त्यांना थोडी माघार घ्यावी लागली होती. पण असं म्हणतात ना की परिस्थिती ओळखून जर तुम्ही दोन पाऊलं मागे झालात तर तुम्हाला आणखी मोठी झेप घ्यायला अजून जास्त बळ मिळतं. तसंच काहीसं मनीषा यांच्याबाबतीत झालं. पण अखेर त्यांनी त्याचं ध्येय म्हणजेच भल्या भल्या गिर्यारोहकांना खुणावणारं एव्हरेस्ट गाठलंच...
मनीषा वाघमारे या औरंगाबाद शहरातल्या. बालपण सगळं मराठवाड्यातच गेलं. गिर्यारोहण वगैरे करायचं असेल तर मराठवाड्यात राहून जमत नाही, असं त्यांनाही ऐकवलं गेलंच होतं. पण ते त्यांनी सपशेल खोटं ठरवलं. पेशाने त्या औरंगाबाद येथील महिला महाविद्यालयात खेळाच्या प्राध्यापिका आहेत. लहानपणापासूनच त्यांना पर्यटनाची आणि गिर्याराेहणाची आवड. त्यामुळे मग आयुष्यात एकदा तरी एव्हरेस्ट सर करायचंच हे स्वप्न अगदी लहानपणापासूनच उराशी जपलेलं. त्यासाठीचा योग अखेर जुळून आला आणि २०१७ साली त्यांनी एव्हरेस्ट मोहिम फत्ते करण्याची पुरेपूर तयारी केली. अगदी अखेरच्या टप्प्यावर त्या पोहोचल्या होत्या. पण ऐनवेळी तिथे आलेल्या वादळामुळे त्यांना पुढे जाणे शक्य झाले नाही. निसर्गाने त्यांना हुलकावणी दिल्याने त्या पुन्हा मागे फिरल्या.
या प्रसंगामुळे थोडेसे नैराश्य जरूर आले. पण पुन्हा एकदा सगळा उत्साह एकवटून त्यांनी पहिल्यापासून सगळी तयारी सुरू केली आणि आणखी जिद्दीने आणखी मेहनतीने त्यांनी २०१८ साली पुन्हा एकदा मिशन एव्हरेस्ट सुरू केले. हा प्रवासही सोपा नव्हताच. रक्त गोठविणाऱ्या, डाेकं सुन्न करणाऱ्या थंडीत त्यांचा प्रवास सुरू होता. यावेळी निसर्गाने आणि शरीरानेही त्यांना साथ दिली आणि अखेर मराठवाड्याचा झेंडा त्यांनी थेट एव्हरेस्टवर फडकविलाच.. औरंगाबादकरांसाठी तर तो खऱ्या अर्थाने सुवर्णक्षण होता. आज अनेक मुलींसाठी त्या प्रेरणास्थान ठरल्या आहेत. आपणही एव्हरेस्ट सर करू शकतो, हा विश्वास त्यांच्यामुळेच मराठवाड्यातल्या तरुणींच्या मनात निर्माण झाला आहे. वेगळी वाट निवडून त्यावर यशस्वी चाल करणाऱ्या या हिरकणीला सलाम...