माधुरी पेठकर
लिशा डाकोर १९ वर्षांची तरुणी. या वयातल्या तरुण मुलींचं जगणं म्हणजे फुलपाखरासारखं रंगबिरंगी. डोळ्यात अनेक स्वप्नं आणि समोर ध्येय असतात. पण लिशाच्या समोर मात्र या वयात अनेक प्रश्न आणि आव्हानं आहेत. एवढ्या लहान वयात मूल पदरात. एकल माता असलेली लिशा राहते नायजेरियात. येथील प्लाटेयू राज्यात. ती नेल स्टायलिस्ट आहे. नखं रंगवणं हे तिचं काम. फक्त व्यवसाय म्हणून नाही तर झपाटल्यासारखं हे काम करणाऱ्या लिशाने या कामाद्वारे अख्ख्या जगाचं लक्ष वेधलं. तीन दिवस लिशाने न थांबता सलग नेल आर्ट करत विक्रम केला, ज्याची गिनिज वर्ल्ड रेकाॅर्डमध्ये नोंद होण्याची शक्यता आहे.
गिनीज वर्ल्ड रेकाॅर्डच्या नियमानुसार रेकाॅर्ड करण्यासाठी एका तासात ६० नखं रंगवणं आवश्यक होतं. हा नियम पाळूनच लिशाने सलग तीन दिवस म्हणजे ७२ तासात ४,००० नखांवर नेल आर्ट केलं.
लिशाने नखं रंगवण्याचं रेकार्ड स्वत:चं कर्तृत्व सिध्द करण्यासाठी केलं नाही तर नायजेरिया या आपल्या देशाकडे जगाचं लक्ष वेधण्यासाठी केलं. लिशा ज्या प्लाटेयू राज्यात राहाते ते राज्य म्हणजे निसर्गसौंदर्याची खाण आहे. पण हा कायम अभावग्रस्त आणि विविध समस्यांनी वेढलेला. वांशिक आणि धार्मिक गटांमध्ये उसळणाऱ्या वादांमुळे कायम अशांत. या भागात किशोरवयीन माता, एकल माता यांचे प्रमाणही खूप आहे. या मुलींमध्ये काहीच करण्याची धमक नाही असं खुद्द या देशातल्या लोकांनाच वाटतं.
लिशाला नायजेरियातील किशोरवयीन माता काय करू शकतात हे जगाला दाखवून द्यायचं होतं.
आणि जे आपल्याला उत्तम जमतं, ते करत तिनं जगाचं लक्ष आपल्या देशाकडे वेधलंच!