Join us  

खूप अप-डाऊन आयुष्यात, तर.. ? असं विचारणाऱ्या विद्यार्थिनीला निर्मला सीतारामन यांनी दिलेलं उत्तर ऐकाच..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2023 4:54 PM

Nirmala Seetharaman Life Lesson To Students : कोटा येथे विद्यार्थ्यांशी संवाद साधताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीताराम यांनी दिला ‘आत्मविश्वासाचा’ मंत्र

ठळक मुद्देअप डाऊन सगळ्यांच्या आयुष्यात येतात. ते दडवू नका.. त्यावर मात करा..स्वत:च स्वत:ची सोबत करत, आत्मविश्वासानं चालण्याचा..

आपण मेहनत खूप करतो पण मनासारखं यश मिळेल की नाही अशी भीती सतत वाटते. सतत आत्मविश्वास दगा देतो, पोटात गोळा येतो. हा अनुभव कुणासाठीच नवा नाही. पण जाहीरपणे तसा प्रश्न केंद्रीय मंत्र्यांसमोर मांडण्याची धमक कितीजणांत असते? तशी धमक असलेली ही एक तरुणी. अपाला मिश्रा तिचं नाव. कोट्यात तिनं थेट केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासमोरच मांडली आपली व्यथा. सोबतची मुलं तिला हसत होती, डोळ्यात पाणी आलं तिच्या पण तिनं विचारलंच, मी मेडिकलची तयारी करतेय पण कभी कॉन्फिडन्स एकदम कम हो जाता है, अप्स ॲण्ड डाऊन चलता है, बहौत प्रॉब्लम हो जाती है, होगा की नहीं होगा.. काय करायचं अशावेळी? निर्मल सीतारामन शांतपणे ऐकत होत्या, काही मुलंमुली हसत होते. मग मात्र त्यांनी उत्तर देताना अपालाला जे सांगितलं ते फक्त विद्यार्थीच नाही तर कुणाही व्यक्तीसाठी लाख मोलाचं होतं (Nirmala Seetharaman Life Lesson To Students).. 

(Image : Google)

निमित्त होतं कोटा शहरात आयोजित एका युवा शक्ती संवादाचं. तरुण मुलामुलींशी,विद्यार्थ्यांशी निर्मला सीतारामन गप्पा मारत होत्या. त्यांच्या प्रश्नांना अगदी मोकळी उत्तरं देत होत्या. त्यात एका मुलीनं विचारलेला हा प्रश्न आणि उत्तर त्यांनी स्वत:ही ट्विट केलं आहे. अपालानं विचारलेला प्रश्न ऐकून निर्मला सीतारामन म्हणाल्या, बघ तू किती हिमतीची आहे. इथं बसलेल्या प्रत्येकाच्या वाट्याला हा प्रश्न आहे. अप्स ॲण्ड डाऊन आहेत. आत्मविश्वास मोडून पडतो त्यांचाही, पण किती जणांनी हा प्रश्न विचारण्याची हिंमत केली. अनेकांना तर वाटलं बरं झालं हिनं विचारलं, मी नसतं विचारलं. ज्याक्षणी तू ही हिंमत केलीस, स्वत:तले अप्स ॲण्ड डाऊन ओळखले त्याक्षणी तू जिंकलीस. मी जवळ असते तुझ्या तर या धैर्यासाठी तुला घट्ट मीठी मारली असती. हिंमत लागते आपले अप्स-डाऊन ओळखायला. जे सर्वांच्या वाट्याला येतात. पण ज्याक्षणी समजतं की आपण डाऊन होतोय त्याक्षणी स्वत:च स्वत:ला मोटिव्हेट करत पुढे न्यायचं बळ मिळतं. हे तू बोललीस, जिंकलीस. आता आतून येणारी ताकदच तुला साथ देईन. इतरांनी दिलेले मोटिव्हेशनल सल्ले काही पुरत नाहीत, टिकत नाहीत. आपलं आंतरिक बळ आपली ताकद बनतं..’

निर्मला सीतारामन हे सांगतच होत्या, तेवढ्यात तरुण मुलांनी पुढच्या प्रश्नासाठी गलका सुरु केला. त्यावर सीतारामन त्यांना दटावत म्हणाल्या की हे मुलांना हे महत्त्वाचं वाटतं नाही का? की ही टिपिकल बॉइज मेण्टॅलिटी, चाललंय काहीतरी मुलीमुलींचं. आपला काही संबंध नाही. आपल्याला तसं काही होत नाही. हिंमत मोडून पडलेली असतानाही कुणाला ते न सांगणं हे टिपिकल ‘बॉइज’ वागणं झालं. तुम्ही नुसतं वरवर दाखवता की सगळं बरं आहे. पण अप डाऊन सगळ्यांच्या आयुष्यात येतात. ते दडवू नका.. त्यावर मात करा..’ निर्मला सीतारामन सांगत होत्या आणि मुलंमुली आपलंच आपल्याला काहीतरी गवसलं असतं ऐकत होते.. कुणी डोळ्यात पाणी आणून, कुणी दडवून, कुणी हसत.. पण प्रेशरची ओझी आणि ताणाचे डोंगर घेऊन आपली कष्टाची वाट चालणाऱ्या मुलामुलींना निर्मला सीतारामन मंत्र देत होत्या.. स्वत:च स्वत:ची सोबत करत, आत्मविश्वासानं चालण्याचा.. 

 

टॅग्स :प्रेरणादायक गोष्टीनिर्मला सीतारामननिर्मला सीतारामन