Join us  

बँकेत तुमचे एकटीचे स्वतंत्र बचतखाते आहे का? - अर्थमंत्री निर्मला सीतारामन सगळ्या बायकांना विचारतात एक महत्त्वाचा प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2023 3:34 PM

Nirmala Sitaraman about Financial Independency of Women : आर्थिक निर्णय घेताना व्यवहार करताना महिला का कचरतात? बँकेत साधे अकाऊण्ट काढत नाही लवकर असं का?

तुमचे एकटीचे सेव्हिंग अकाऊण्ट आहे का? नवऱ्यासोबत जॉइण्ट अकाऊण्ट असेलही पण एकटीचे आहे का बँकेत स्वतंत्र खाते असा प्रश्न दस्तूरखुद्द अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनीच महिलांना विचारला आहे. त्यांचा तो व्हिडिओ व्हायरलही होतो आहे. नोकरी करणाऱ्या महिलांचे असतेही सॅलरी अकाऊण्ट एकटीचे, पण गृहिणींचे काय? अनेक गृहिणींचे तर एकटीचे बँकेत खातेही नसते. बँकेचे व्यवहार आपल्याला जमणारच नाही असं वाटून त्या कधी चुकून बँकेत जात नाही. अनेक नोकरदार महिलाही आपले डेबिट कार्ड नवऱ्याला देऊन टाकतात. नको आपल्याकडून पैशाचा काही घोळ झाला तर काय अशी भीती त्यांना वाटते. अर्थमंत्री सीतारामन नेमका हाच प्रश्न महिलांना विचारत आहेत. तुमचे एकटीचे स्वतंत्र बँकेत खाते आहे का (Nirmala Sitaraman about Financial Independency of Women)?

(Image : Google)

निर्मला सीतारामन म्हणतात..

महिलांचे स्वत:चे एकटीचे स्वतंत्र बँक अकाऊंट हवेच. तशी मागणी करण्यात किंवा स्वतंत्र खाते असण्यात काहीच गैर नाही. त्यात कसंसं वाटण्याची, कोण काय म्हणेल असा विचार करण्याची काय गरज? आपले बँक खाते हे फक्त आपले एकटीचे असावे. त्यात आपले पैसे हवे मुख्य म्हणजे ते पैसे आपण कसे खर्च करणार, कधी, कशावर करणार हे निर्णयस्वातंत्र्यही आपलेच हवे. नवराबायकोचे जॉईंट अकाऊंट असणे चांगले आहे, त्यातून अनेकदा घरखर्च केला जातो. आणि मग अनेकींना वाटतं जॉइण्ट अकाऊण्ट आहे ना मग आपले वेगळे कशाला? 

कुणाला काय वाटेल की कुटूंबाचा पैसा ही स्वत:च्या खात्यात भरते की काय? पण महिला मुळात तारतम्यानं वागतात, पैसा जपून हाताळतात त्यामुळे कोण काय म्हणेल असा विचार तर अजिबात करु नका. कुटुंबाची आर्थिक स्थिती कशीही असो बाईचे एकटीचे खाते असणे महत्त्वाचे. त्या खात्यात पैसा किती तो कमी आहे का जास्त याचा विचार करु नका. आपले स्वतंत्र खाते, आपली स्वत:ची आर्थिक क्षमता आणि आपला आर्थिक निर्णय या तिन्ही गोष्टी बायकांसाठी फार महत्त्वाच्या!

-निर्मला सीतारामन म्हणतात तसे आपले आर्थिक निर्णय आणि आपले आर्थिक स्वातंत्र्य आपण आपल्या हाती घेणार का?

टॅग्स :प्रेरणादायक गोष्टीनिर्मला सीतारामनबँक