‘लापता लेडीज’ नावाचा सिनेमा गाजला. नुकत्याच झालेल्या आयफा पुरस्कार सोहळ्यात या सिनेमाने १० पुरस्कार पटकावले; पण चर्चा आहे ती नितांशी गोयलची. तिला उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. नितांशी सोशल मीडियात कायमच चर्चेत असते. तिचे लाखो फॉलोअर्स आहेत ते तर झालंच; पण तिच्या फॅशन ट्रेंडची चर्चा त्याहून जास्त असते. आयफा पुरस्कार साेहळ्यात तिने घातलेले कानातलेही व्हायरल झाले. जेमतेम १७ वर्षांची ही मुलगी. तिने लापता लेडीजमध्ये काम केलं तर शूटिंगमुळे तिला दहावीची परीक्षा देता आली नव्हती.
नितांशी गोयल मूळची उत्तर प्रदेशातला नोएडात राहणारी! शालेय शिक्षण नोएडाच्या खेतान शाळेत पूर्ण केलं.
तिला कमी वयात प्रसिद्धीही मिळाली; कारण वयाच्या नवव्या वर्षांपासून ती सीरिअलमध्ये काम करतेय. ‘मन मै हे विश्वास’ या मालिकेत तिनं पहिल्यांदा काम केलं होतं. त्यानंतर मालिका, वेबसिरीजमध्ये काम केलं. तासन् तास काम, दिग्दर्शकांची बोलणी खाल्ली. रडली असेल अनेकदा; पण अभिनय तिला करायचाच होता. २०१५ साली, पँटलून ज्युनिअर फॅशन आयकॉनची ती मानकरी ठरली. तर, २०१६ साली इंडिया किड्स फॅशन वीकमध्ये सहभागी झाली होती. तिला नृत्याचीदेखील आवड आहे. तिने अनेक डान्स स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे. अखंड ती मुलगी काम करते आहे.
तिच्या वडिलांनी आपला व्यवसाय थांबवून वेगळं काम स्वीकारलं, आईनं सरकारी नोकरी सोडली कारण त्यांना मुलीसोबत मुंबई राहणं भाग होतं. त्यांनी इकडे नवी कामं शोधली.
नितांशीने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, ‘माझी आई हीच माझी प्रेरणा. ती कायम माझ्यासोबत असते. प्रत्येक टप्प्यावर तिनं मला साथ दिली. अभिनय करतानाच अभ्यासही करवला. आई म्हणते, बाकी काहीही असो तुझं शिक्षण तर पूर्ण झालंच पाहिजे. माझी आई माझी ताकद झाली!’
वयाच्या सतराव्या वर्षी म्हणूनच ही मुलगी यशाचे नवनवे टप्पे सर करते आहे.