Join us  

न घाबरता आपलं जगणं साऱ्या जगासमोर मांडत आता अफगाणी महिलाही झाल्या यूट्यूबर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2024 5:21 PM

अफगाणी महिलांनी स्वत:चं जगणं सांगण्याचा शोधला मार्ग

ठळक मुद्देलिबान लवकरच आपले यूट्यूब चॅनेल बंद करून टाकेल, अशी भीतीही येथील महिलांना वाटते आहे.

माधुरी पेठकरतालिबानच्या जुलमी राजवटीत अफगाणिस्तानातील महिलांची होणारी मुस्कटदाबी जगजाहीर आहे. २०२१ मध्ये तालिबाननेअफगाणिस्तानची सत्ता पुन्हा काबीज करण्याआधी अफगाणिस्तानमधील महिला वेगवेगळ्या क्षेत्रांत नोकरी करून पैसे कमावत होत्या. पण तालिबानने ब्यूटी पार्लरसारख्या अनेक सेवा बंद करून हजारो महिलांच्या कमाईचे साधन हिसकावून घेतले. माध्यमांमध्ये काम करणाऱ्या महिलांवर अनेक निर्बंध लादले गेले. टीव्हीवरच्या न्यूज अँकर्सना हिजाब घालणं अनिवार्य केलं. मुलींना शाळा, काॅलेजमध्ये जाण्यावर बंदी घातली गेली. अशा वातावरणात अफगाणिस्तानमधल्या महिला घरात बसल्या. जीव वाचवायचा, तर दुसरा पर्याय तरी काय?पण या परिस्थितीतही काही महिलांनी काम करण्याचा आणि स्वत:च्या कुटुंबासाठी चार पैसे कमावण्याचा मार्ग शोधून काढला आहे.अफगाणिस्तानमधल्या अनेक महिला आज घरात बसून स्वत:चं यूट्यूब चॅनेल चालवत आहेत.हयात ही २१ वर्षांची तरुणी. टीव्हीवरची होतकरू कलाकार होती. आता ती यूट्यूबर झाली आहे. स्वयंपाक, फॅशन, मेकअप या विषयांवर हयात व्हिडीओ तयार करते. रोज १ असे महिनाभरात ती किमान ३० व्हिडीओ तरी करते. सप्टेंबर २०२३ मध्ये हयातने यूट्यूब चॅनेल सुरू केलं.

आज अफगाणिस्तानातही प्रत्येक महिलेकडे मोबाइल आहे. आपल्याला जे वाटतं ते जगापर्यंत पोहोचवण्याची त्यांचीही इच्छा आहे. त्यामुळेच आज अफगाणिस्तानातल्या अनेक महिलांनी पैसे कमावण्यासाठी आणि व्यक्त होण्यासाठी यूट्यूब चॅनेल सुरू करण्याचा मार्ग निवडला आहे.पण आता तालिबानने यूट्यूब चॅनेल चालवण्यासाठी ब्राॅड कास्टिंग लायसन्स (प्रसारण परवाना) अनिवार्य केलं आहे. हा परवाना मिळविण्यासाठी पत्रकारितेची पदवी आणि तीन वर्षे कामाचा अनुभव, असा निकष ठेवला आहे. हा निकष पूर्ण करणं यूट्यूबर असल्या अनेक महिलांना शक्य नाही. त्यामुळे तालिबान लवकरच आपले यूट्यूब चॅनेल बंद करून टाकेल, अशी भीतीही येथील महिलांना वाटते आहे.

आयेशा नियाझी.पूर्वी टीव्हीवर बातम्या सादर करायची. पण तिच्यावर आणि तिच्या नवऱ्यावर पत्रकारिता बंद करण्याचा दबाव आणला गेला. कमाईचे साधन बंद झाले. घरात जुळी मुलं. पण तिने धोका पत्करून स्वत:चं यूट्यूब चॅनेल सुरू केलं. आता आयेशा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक विषयावर व्हिडीओ बनवते. त्यातून तिला किमान पोट भरण्यापुरते पैसे तरी मिळतात. 

टॅग्स :अफगाणिस्तानतालिबान