रायटिंग विथ फायर ( Writing with Fire) नावाच्या बेस्ट डॉक्युमेण्ट्रीला ऑस्करचे बेस्ट डॉक्युमेण्टरी फिचर कॅटेगरीत नाॅमिनेशन मिळाले. रिंतू थॉमस आणि सुश्मीत घोष या दोघांनी दिग्दर्शित केलेली ही ९३ मिनिटांची डॉक्युमेण्ट्री. तिचे ट्रेलर्स आणि डॉक्युमेण्ट्रीही यू ट्यूबवर उपलब्ध आहे. भारतीय डॉक्युमेण्ट्रीला नामांकन मिळालं ही तर यातली आनंदाची गोष्ट आहेच, मात्र ज्या ग्रामीण -आदिवासी महिलांच्या, त्यांच्या पत्रकार होण्याच्या कहाणीच्या आणि खबर लहरिया या वृत्तपत्राच्या प्रवासावर ही डॉक्युमेण्ट्री आहे. त्या महिलांचा पत्रकार होण्याचा प्रवास मात्र अतिशय खडतर आणि तितकाच हिमतीचा आहे. देशातले दलित महिला चालवत असलेले पहिले वृत्तपत्र ते डिजिटल मिडिया होण्यापर्यंतचा या महिलांचा प्रवास आणि त्यांची कहाणी ही अतिशय उमदीची गोष्ट आहे.
(Image : Google)
ज्या महिलांनी हातात कधी मोबाइलही घेतले नव्हते, त्या डिजिटल पत्रकारिता शिकून आपल्या भाषेत आपल्या अवतीभोवतीचं जगणं मांडू लागल्या. आणि खबर लहरिया म्हणत त्यांच्यातली आग, जिद्द नव्या लेखनाला आयाम देऊ लागली.रायटिंग विथ फायर यासाऱ्या प्रवासाची गोष्ट मांडतो. आणि त्या गोष्टीतच नाही तर खबर लहरियाच्या कहाणीतही भेटते एक जिद्दी महिला. त्यांचं नाव कविता बुंदलेखंडी. त्या कविता देवी म्हणून ओळखल्या जातात. शाहरुख खानच्या टेडटॉकमध्ये ही साधीशी दिसणारी महिला पहिल्यांदा आली तेव्हा तिने एवढं मोठं काम उभं केलेलं असेल असं कुणालाही वाटलं नसेल. पण तिनं तिची गोष्ट सांगायला सुरुवात केली आणि तिची कहाणी.
(Image : Google)
तीच कहाणी खबर लहरियाची.खबर लहरिया आपकी खबर, आपकी भाषा में.. असं सूत्र घेऊन हे स्थानिक महिलांनी घेऊन सुरु झालेलं बुंदेली भाषेतलं वृत्तपत्र. या महिला ग्रामीण-आदिवासी, काही अल्पशिक्षित. उत्तर प्रदेश आणि मध्यप्रदेशच्या सीमेवर चित्रकुट भागात हे काम सुरु झालं. काही नवसाक्षर तरुणींनाही त्यात सहभागी करुन घेण्यात आलं. निरंतर या दिल्लीस्थित स्वयंसेवी संस्थेनं हे काम सुरु केलं. आणि त्याच्या संपादक झाल्या कवितादेवी.
(Image : Google)
कवितादेवी सांगतात, ‘ही माझी कहाणी म्हणजे एका दलित, नवसाक्षर जिद्दी मुलीची कहाणी आहे. वो जिद्दी लडकी आज जानी पहचानी एडिटर बनने की कहानी है!दलित, आदिवासी, मुस्लिम, ओबीसी, अशिक्षित किंवा नवसाक्षर तरुणींचं त्यांनी प्रशिक्षण सुरु केलं. त्या आसपासच्या बातम्या, प्रश्न, समस्या आपल्या भाषेत लिहू लागल्या. प्रश्न विचारु लागल्या. ते प्रश्न विचारणं, त्यातही बाईने प्रश्न विचारणं रुचणारं नव्हतंच कुणाला. पण तरी त्यांनी आपलं काम सोडलं नाही. बुंदेली, अवधी आणि बजीका भाषांत त्यांचं ‘खबर लहरिया’ वृत्तपत्र प्रसिद्ध होवू लागलं. २००२ ला हा प्रवास सुरु झाला. २०१५ उजाडता उजाडता वेबसाइट्स आल्या. आणि या महिला पत्रकार डिजिटल माध्यमात काम करणं शिकू लागल्या. त्यासाठी त्यांच्या हातात मोबाइल आले. त्या शूट करु लागल्या, वेबमिडीयावर बातम्या प्रसिध्द होऊ लागल्या. वृत्तपत्र ते डिजिटल हा प्रवास त्यांनी केला. त्या प्रवासचीच गोष्ट ही डॉक्युमेण्ट्री सांगते.
या डॉक्युमेण्ट्रीचे दिग्दर्शक घोष यांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणतात, आमच्यासाठी हा आनंद अवर्णनीय आहे. आमच्यासाठी आणि भारतीय सिनेमासाठीही हा मोठा क्षण आहे. ही डॉक्युमेण्ट्री आधुनिक भारतीय स्त्रीची गोष्ट सांगते.