आज वेगवेगळ्या क्षेत्रांत ट्रान्सजेंडर व्यक्ती अतिशय उत्कृष्ट कामगिरी बजावत आहेत, पद्मा लक्ष्मी हे त्यापैकीच एक खास उदाहरण.... एखाद्या गोष्टीची जिद्द असली, की व्यक्ती त्या गोष्टीसाठी मेहनत करते, चिकाटी ठेवते आणि यश मिळवूनच दाखवते. अशाच जिद्दीची एक खास गोष्ट आहे, केरळच्या पद्मा लक्ष्मी.(Padma Lakshmi) त्यांनी केरळची पहिली ट्रान्सजेंडर वकील होण्याचा बहुमान मिळविला आहे. पद्मा लक्ष्मी या 'बार कौन्सिल ऑफ केरळ' (Bar Council Of Kerala) मध्ये नोंदणी केलेल्या पहिल्या ट्रान्सजेंडर वकील ठरल्या आहेत. भारताच्या पहिल्या ट्रान्सजेंडर जज जोयिता मंडलनंतर पद्मा लक्ष्मीचा या यादीत समावेश झाला आहे. रविवारी झालेल्या नामांकन समारंभात राज्याच्या बार कौन्सिलमध्ये नावनोंदणी झालेल्या १५०० हून अधिक पदवीधरांपैकी त्या एक आहेत. त्यांना वकिलीची सनदही प्रदान करण्यात आली.
पद्मा यांनी एर्नाकुलम शासकीय विधी महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली आहे. ट्रान्सजेंडर किंवा तृतीयपंथी लोकांनी मुख्य प्रवाहांत यावे यासाठी गेल्या काही वर्षांपासून अनेक प्रयत्न सुरु आहेत. आपल्या समाजात तृतीयपंथीयांकडे तुच्छतेने पाहिले जाते. परंतु हे आव्हान अनेक ट्रान्सजेंडर व्यक्तींनी स्वीकारुन आज वेगवेगळ्या क्षेत्रांत ट्रान्सजेंडर व्यक्ती अतिशय उत्कृष्ट कामगिरी बजावत आहेत. पद्मा लक्ष्मी हे त्यापैकीच एक खास उदाहरण आहे(Padma Lakshmi Becomes Kerala's First Transgender Lawyer).
केरळचे कायदा मंत्री पी. राजीव यांनी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवरुन केरळच्या पहिल्या ट्रान्सजेंडर वकिल पद्मा लक्ष्मी यांचे अभिनंदन केले आहे. पद्मा लक्ष्मी यांचा फोटो शेअर करत त्यांनी म्हटले आहे की एक ट्रान्सजेंडर वकिल म्हणून स्वतःसाठी वेगळा मार्ग शोधण्याचा प्रयत्न करणाऱ्या पद्माच्या प्रयत्नांचे कौतुक, तिचा हा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आणि प्रोत्साहन देणारा आहे. केरळमधील आणखी एक नेते राघव म्हणाले की, कोणत्याही क्षेत्रात प्रथम क्रमांक मिळवणे खूप कठीण आहे. पद्मा यांनी आयुष्यातील सर्व अडचणींवर मात करून हे यश संपादन केले आहे. पद्मा लक्ष्मीने कायदेशीर इतिहासात आपले नाव नोंदवले आहे.