आपल्याकडे काय नाही याचाच विचार करत रडत बसलं तर आयुष्यात काहीच शक्य नाही. पण आपल्याकडे जे आहे, त्याच्याच जोरावर जीवतोड मेहनत केली तर मात्र इतिहास घडवता येतो. तेच सांगणारी ही प्राची यादवची गोष्ट. मध्यप्रदेशातली ही खेळाडू. पॅराऑलिम्पिक स्पर्धेत तिनं कयाकिंग आणि कॅनोइंगमध्ये नुकंतच कांस्य पदक जिंकलं. या क्रीडाप्रकारांत पदक जिंकणारी ती पहिली भारतीय खेळाडू. २०२०मध्ये ती टोक्यो पॅराऑलिम्पिकमध्येही क्वालिफाय झाली होती आणि आता तर पोलंडच्या पोजनन येथे झालेल्या स्पर्धेत २०० मीटा व्हीएल -२ इव्हेण्टमध्ये तिनं पदक जिंकलं. या क्रीडाप्रकारात पदकपात्र श्रेणीत जाणारीही ती पहिली भारतीय खेळाडू. पण केवळ पदक जिंकण्यापुरती तिची गोष्ट नाही. तिची गोष्ट आहे स्वत:च्या हिमतीवर उभं राहण्याची. आणि ती हिंमत असली तर तुम्हाला पाय असो नसो काही फरक पडत नाही.
(Image : Google)
प्राची यादव. जन्मत: दिव्यांग. जन्मत:च तिच्या पायात बळ नव्हतं. मोठं होतानाही पाय मात्र कायमचे अधूच राहिले. मात्र तिचे हात लांब लांब. मात्र दुर्देव तिची पाठ सोडत नव्हतं. ती ७ वर्षांची असतानाच आई गेली. मानसिक धक्का प्रचंड होता. ती ९ वर्षांची झाली तेव्हा व्यायाम म्हणून तिला पोहण्याच्या क्लासला घालण्यात आलं. लहानशी प्राची. पोहता यायला लागलं यात आनंद मानत होती. आपली काळजी कोण घेणार इथपासून सुरु झालेला प्रवास स्वत:ला इंडिपेंडट करत खेळावर फोकस करण्यापर्यंत नेणं सोपं नव्हतं. भोपाळच्या छोट्या तळ्यात ती पोहायला जायची. तिथंच भेटले प्रशिक्षक मयंकसिंह ठाकूर. त्यांनी कॅनॉइंग आणि कयाकिंग शिकण्याचा सल्ला दिला. प्राचीचं ट्रेनिंग सुरु झालं. २००७ मध्ये तिनं एक स्पर्धा जिंकली. आत्मविश्वास वाढला आणि आपण हे शिकू असं तिला वाटू लागलं. हात लांब असल्याचा फायदा होत होता, ट्रेनिंग सुरु झालं. त्यानंतर ती अनेक स्पर्धा जिंकतच गेली.
(Image : Google)
म्हणता म्हणता टोक्या पॅराऑलिम्पिकसाठी पात्र ठरली. पण कोरोनाकाळ खडतर होता. तलाव बंद. सराव कुठं करणार. मग विशेष परवानगी काढून भोपाळच्या एका तलावात तिचा सराव सुरु झाला. डोळ्यासमोर एकच लक्ष्य होतं. ऑलिम्पिक पदक. आणि तो सराव, ती मेहनत वाया गेली नाही. आता पोजननमध्ये झालेल्या पॅराऑलिम्पिक स्पर्धेत तिनं पदक जिंकलंच. पहिली भारतीय खेळाडू जिनं या क्रीडा प्रकारात पदक जिंकलं. आत्मविश्वास असेल तर असं हिमतीनं जगता येतं, आणि कर्तृत्वही गाजवता येतं. प्राची यादवची गोष्ट हेच तर सांगतेय.