Join us  

‘पैशाच्या मागे लागले, कामावरचा फोकस हलला आणि..’ परिणीती चोप्रा सांगते करिअरची चुकलेली वाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2021 6:41 PM

परिणीती चोप्राचं बॉलिवूडमधलं करिअर ग्लॅमरस असलं तरी ती जे सांगते, ते करिअर म्हणून सर्वच क्षेत्रात लागू होण्यासारखं आहे. (parineeti chopra)

ठळक मुद्देपरिणीतीला हे जे समजलं, ते करिअरच्या वाटेवर अनेकांना समजत नाही. आणि समजलं तरी मान्य करण्याची धमक नसते.

आपल्या करिअरसंदर्भात अनेक सल्ले आपण आपल्या जवळच्या माणसांचे, मित्रमैत्रिणींचेच घेतो. ते सांगतात, अमूक तुझ्या पुढे चालली, तमूकने ही स्ट्रॅटेजी वापरली, ढमूक नेटवर्किंग आहे म्हणून यशस्वी आहे, त्याचं तर ते स्किल महत्त्वाचं आहे, काही गोष्टी करिअरसाठी कराव्या लागतात. आणि स्पर्धेच्या जगात आपण मागे पडू नये म्हणून ते सल्ले ऐकून तसं वागतातही अनेकजण. मात्र आपल्याला चुकीचे सल्ले मिळाले, आपले निर्णय चुकले-फसले. आपल्या अपयशाला आपले चुकीचे निर्णय, कामावरचा हललेला फोकस, पैशाच्या मागे पळणंच जबाबदार आहे हे मान्य करण्याची तयारी आणि हिंमत फार कमीजणांमध्ये असते. त्यातही जगजाहीर आपली चूक मान्य करुन, आता आपण जरा बारकाईने आपल्या करिअरचा विचार करु असं म्हणणं तर फारच दूर. पण हे सारं परिणीती चोप्राने (parineeti chopra) जाहीरपणे केलं म्हणून तिच्या हिमतीची दाद द्यायला पाहिजे.

(Image : Google)

तिने नुकत्याच केलेल्या हॉट फोटो शूटची, तडकफडक लूक्स आणि फोटोंची चर्चा आहे. व्हायरलच्या जगात अशा गोष्टी हॉट म्हणून फिरतातही. मात्र नुकतीच फिल्मफेअरला परिणीतीने जी मुलाखत दिली त्यावरुन काही करिअरचे धडे सगळ्यांनीच घ्यायला हरकत नाही. परिणीतीचं कौतूक हे की, एवढ्या स्पर्धेच्या जगात तिनं हे जाहीरपणे कबूल केलं की लवकर यश मिळालं आणि मी हुरळून गेले, काही गोष्टी गृहित धरल्या, माझा फोकस हलला.या मुलाखतीत परिणीती चोप्रा सांगते, मी काही चुकीचे निर्णय घेतले. माझ्या आसपासच्या माणसांनी मला ‘रिग्रेसिव्ह’ सल्ले दिले, जे मी स्वीकारले. ही माणसं काळासोबत बदलली नाहीत. त्यांनी मला सांगितलं की, तू ‘हिरॉईन’सारखी दिसली पाहिजे. तू सेक्सी दिसली पाहिजेस, सिनेमात गाणं तरी करच, हिरोबरोबर रोमान्सपुरता असेल रोल तरी कर, हे सगळं करायला हवं. ते मी ऐकलं, लवकर यश मिळालं, माझ्या पोझिशनचा गैरफायदा घेतल्यासारखी मी पैशाचा मागे लागले. खरं सांगायचं तर मी ‘आत्मसंतुष्ट’ झाले. काम जेमतेम केलं, माझा कामावरचा फोकस हलला आणि त्याचा परिणाम म्हणून हे सारं घडलं. नशीब एकच मी ओव्हर कॉन्फिडन्ट कधीच नव्हते. पण हे सारं ५ सिनेमे फ्लॉप झाल्यावर माझ्या लक्षात आलं की ५ वाईट निर्णय घेतले त्याचे हे परिणाम आहेत.’

(Image : Google)

परिणीतीला हे जे समजलं, ते करिअरच्या वाटेवर अनेकांना समजत नाही. आणि समजलं तरी मान्य करण्याची धमक नसते.परिणीतीचे हे रिअलायझेशन आणि तिनं सांगणं हे खरंतर तिच्या फोटोंपेक्षा जास्त हॉट आणि पुढच्याच ठेस मागचा शहाणा असं आहे.

टॅग्स :परिणीती चोप्राकरिअर मार्गदर्शन