- अनन्या भारद्वाज, (मुक्त पत्रकार)
महिलाफुटबॉल वर्ल्ड कप स्पेनने जिंकला. रविवारी (दि. २० ऑगस्ट) झालेल्या अंतिम सामन्यात स्पेनच्या संघाने इंग्लंडच्या संघावर मात केली. महिनाभर हा फुटबॉल वर्ल्ड कप चालला, गाजला. जगभरातील महिला संघ त्यात सहभागी झाले. आपण यंदा या विश्वचषकावर नाव कोरणारच, असा आत्मविश्वास घेऊन मैदानात उतरलेल्या इंग्लंड महिला संघाची निराशा झाली खरी मात्र तरीही त्यांच्या धाडसाचं, बदलासाठी त्यांनी दाखविलेल्या हिमतीचं जगभर कौतुक होत आहे. इंग्लंडचा महिला संघ हरूनही या विश्वचषकाची आठवण म्हणून एका वेगळ्या गोष्टीसाठी चर्चेत आजही आहे आणि भविष्यातही त्याची दखल घेतली जाईल.वरवर चर्चा करायला सोपी वाटते ती गोष्ट, कुणी असं म्हणेलही की त्यात काय मोठं आहे?मात्र, महिला खेळाडूंना किती वेगवेगळ्या पातळीवर संघर्ष करावा लागतो आणि त्यासाठी वाटेतल्या अडथळ्यांवर मात करत आपले क्रीडा नैपुण्यही पणाला लावावे लागते, याचे हे एक उदाहरण आहे.आणि ते उदाहरण जगभरासमोर आहे ते इंग्लंड महिला संघाच्या किटच्या रंगाच्या रूपात!
(Image :google)
इंग्लंडचा महिला संघ पांढरी शुभ्र किट अर्थात जर्सी अर्थात पोषाख घालून मैदानात उतरत असे. शॉर्ट्सही पांढरीच वापरायची असा नियम होताच.मात्र, जगभरात महिला खेळाडू साधारण २०१९ पासूनच मागणी करत आहेत की, पांढऱ्या रंगाचीच अण्डर शॉर्ट्स किंवा शॉर्ट पॅण्ट घालण्याची सक्ती चुकीची आहे. त्यामुळे आमची पिरिएड अन्झायटी वाढते. आधीच मैदानात खेळून जिंकण्याचा ताण त्यात मासिक पाळीत रक्ताचे डाग कपड्यांवर पडले तर जगभर चर्चेला विषय, आपली शोभा होईल, अशी त्यांना भीती वाटते. त्यामुळे जगभरातल्या खेळाडू व्हाइट शॉर्टची सक्ती बंद करा, अशी मागणी करत होत्याच.इंग्लंड महिला संघानेही तिच मागणी लावून धरली होती आणि बऱ्याच चर्चेअंती ही मागणी मान्यही करण्यात आली आणि या विश्वचषकात इंग्लंडचा महिला संघ निळ्या रंगाच्या शॉर्ट्स घालून मैदानात उतरला. केवळ इंग्लंडच नाही तर झांबिया, फिलिपिन्स या संघांनीही आपल्या शॉर्ट्सचा रंग बदलला. कॅनडा, फ्रान्स, नायजेरिया, दक्षिण कोरिया या संघांनीही पांढऱ्या शाॅर्ट्स वापरणं बंद करून रंगीत शॉर्टसह या विश्वचषकात सहभाग घेतला.सर्वात आधी या संदर्भात आवाज उठवला तो न्यूझिलंडच्या संघाने.
(Image : google)
त्यांनी स्पष्ट शब्दात मागणी केली होती की, आम्ही पांढऱ्या शाॅर्ट्स घालणार नाही. पिरिएड एन्झायटी हा विषय त्यांनी लावून धरला आणि त्यामुळे खेळावर होणारा परिणाम आपल्या असोसिएशनकडे मांडला. न्यूझिलंडची स्ट्रायकर हनाय विलकिन्सनने माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट सांगितलं होतं की, फक्त फुटबॉलच नाही तर सगळ्याच महिला खेळाडूंना या पिरिएड एन्झायटीचा सामना करावा लागतो. एकतर महत्त्वाचा सामना सुरू असतानाच पाळी आली तर आधीच तब्येत कुरकूर करते. हातपाय, पोट दुखते, एनर्जी कमी वाटते. त्यात दुसरं टेन्शन असतं रक्तस्त्रावाचं. खेळताना चुकून कपड्यांना डाग पडला तर सर्वत्र लागलेले कॅमेरे ते डाग दाखवणार आणि जगभर ते डाग व्हायरल होणार! म्हणून त्या काळात मासिक पाळी आली तर काय? याचंच मोठं भय असतं!ही जी भीती फुटबॉलपटूंना वाटते तिच भीती टेनिस खेळाडूंनाही वाटते. त्यांच्यासाठीचे ड्रेसकोड तर अजूनच स्ट्रिक्ट असतात. विशेषत: विम्बलडनचे.मात्र, तिथेही अंडरशॉर्ट्स पांढऱ्याच घालण्याची सक्ती नको, अशी मागणी टेनिस खेळाडू करत आहेत. हिथर वॉटसन नावाची टेनिस खेळाडू सांगते, ‘गेल्यावर्षी सामने सुरू असतानाच माझी मासिक पाळी सुरू झाली. रक्तस्त्राव थांबविण्यासाठी मी शेवटी गोळ्या घेतल्या. व्हाइट शॉर्ट घालून खेळताना जर एक बारीकसा जरी डाग दिसला तरी जगभर होणारी नामुष्की आम्ही कशी सहन करणार?’नामुष्कीचं भय एकीकडे, दुसरीकडे हातापायात गोळे येणं, पोटदुखी, उलट्या, पाय दुखणं, ताकद कमी वाटणं हे सारं जे सामान्य महिलांना मासिक पाळीच्या काळात होतं तेच या खेळाडूंनाही होतं. त्या तर औषधंही घेऊ शकत नाहीत. कारण ड्रग्ज संदर्भातले नियम अत्यंत कडक असतात. दुसरीकडे सामना जिंकण्याची ईर्षाही असते. मात्र, पिरिएड अन्झायटी अर्थात मासिक पाळीच्या दिवसात येणार ताण आपण कोणते कपडे घातले यानंही वाढतो.निदान महिलांचा हा ताण समजून घेऊन त्यादृष्टीने एक पाऊल तरी जग पुढे सरकलं याचाच आनंद आहे.पिरिएड अन्झायटीला बायकी विषय समजून त्यावर इतके दिवस चर्चाच होत नव्हती किंवा त्या मागणीकडे कानाडोळा केला जायचा ते तरी आता बंद झाले आणि महिलांना पांढऱ्या शॉर्ट्स घालण्याची सक्ती उरली नाही हे ही काही कमी नाही.हा महिला फुटबॉल विश्वचषक संपताना बसलेली ही किक म्हणून वेगळी आहे.