Join us  

पायाला बँण्डेज बांधून शर्यतीत धावली ११ वर्षांची फिलिपिनो मुलगी; अनवाणी पायांची जिद्द नेमकी काय सांगते?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2021 3:49 PM

फिलिपिन्सची रेहा बुलोस या ११ वर्षांच्या मुलीचे फोटो सध्या व्हायरल झाले आहेत. पण गरीबी नाही तिचे पाय वेगळीच कहाणी सांगतात. (philippines girl rhea bullos run barefoot viral)

रेहा बुलोस. ११ वर्षांची ही मुलगी. फिलिपिन्स देशात राहते. शाळेत शिकते, कोरोनाकाळाने तिथं आर्थिक तंगी आहेच. तर तशीच ही एक रेहा. तिच्या शाळेत रनिंग रेस होती. रेहाला स्पर्धेत धावायचं तर होतं, पण पायात बूट नाही. हे नाही म्हणून ते नाही, अमूक नाही म्हणून मी मागे, ते मी करुच शकत नाही असं म्हणत ही एवढीशी मुलगी रडत बसली नाही. तिथं स्पर्धेत भाग घेतला. पायात बूट नव्हतेच, तर पायाला चक्क बँण्डेज बांधलं. त्यावर तेलखडूने एक राइट टिक करत खूण केली. स्वत:लाच जणू सांगितलं, की आपल्या पायात बूट आहेत. ते ही नायकेचे आहेत. आणि त्या बळावर ही जिद्दी मुलगी धावली. ४००, ८००, १००० मिटरच्या शालेय स्पर्धेत तिनं सुवर्णपदक जिंकलं. आणि तिचे ते मातीने माखलेले पाय, त्यावरचं धुळ भरलं टिक मार्क आणि शांत बसलेली रेहा यांचे फोटो म्हणता म्हणता जगभर व्हायरल झाले. इतके प्रचंड व्हायरल की या मुलीची जिद्द जगभरातल्या सगळ्या माणसांना बरंच काही सांगू लागली. काहींना तिची गरीबी दिसली तर काहींना तिचे जिद्दी पाय.

(Photo : Google)

कुणी म्हणाले की, आपल्या मनात बळ असलं, काहीतरी करण्याची प्रचंड इच्छाशक्ती असली तर माणूस जिंकतो, त्या जिंकण्याच्या जिद्दीचं प्रतीक आहे ही रेहा.एका देशात घडलेली ही रेहाची गोष्ट मग सोशल मीडीयाच्या काळात फक्त तिच्यापुरती उरली नाही. एरव्ही सोशल मीडीयात टाइमपास आणि विघातक गोेष्टी पसरतात म्हणून नावं ठेवली जातात. पण रेहाच्या जिद्दीची गोष्ट मात्र अनेकांना प्ररेरणादायी वाटली. तिच्याच देशातल्या अलासा एस बास्केटबॉल टीमचे सीईओ असलेले जेफ कॅरीसो यांनी ट्विटरला विनंती केली की मला या मुलीशी संपर्क करुन द्या.

तसं त्यांनी ट्विटही केलं. त्यांनीच नाही तर अनेकांनी मग रेहाला शोधलं. कुणी कुणी सांगितली की मी तिला ओळखतो. जेफ यांचाही पुढे तिच्याशी संपर्क झाला, त्यांनी तिला काही मदतही केली. 

रेहाच्या जवळच्या एका मोठ्या मॉलने तिला खास बोलावून घेतलं आणि उत्तम बूट भेट दिले.रेहाचे प्रशिक्षक सांगतात, तिचे फाेटो व्हायरल झाले पण तिला कसली पर्वा नाही. तिला फक्त पळायचं होतं, पळायचं आहे. आपल्या पायात बूट आहेत नाहीत यानं तिला काहीही फरक पडत नाही. तिची जिद्द अशी विलक्षण की, ती आपल्याला विचार करायला लावते की आपल्यासाठी महत्त्वाचं काय आहे.रेहानं हाच प्रश्न पुन्हा जगासमोर ठेवला आहे की, महत्त्वाचं काय आहे पायात बूट असणं की पळण्याची इच्छा? आनंद नेमका कशात आहे आपला?त्याचं उत्तर तिला सापडलं आहे, पण बाकी मोठ्यांनाही सापडो लवकर.