Join us  

लंडन ऑलिम्पिकची टॉर्च बेअरर पिंकी, राबतेय आसामच्या चहाच्या मळ्यात, मोलमजुरीत काढतेय दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2021 4:09 PM

२०१२ साली झालेल्या लंडन ऑलिम्पिकमध्ये मशाल वाहक म्हणजेच टॉर्च बेअरर म्हणून मानाने सहभागी  झालेली आसामची पिंकी कर्माकर आज अत्यंत हालाखीची परिस्थितीत आयुष्य कंठत आहे.

ठळक मुद्देसरकार आणि युनिसेफ दोघांनीही मदतीचे आश्वासन दिले होते.पण आजवर ना कुठली  रक्कम मिळाली ना शासनाकडून आणि युनिसेफकडून कोणती मदत मिळाली.

आसामच्या डिब्रूगढ जिल्ह्यातील बोरबोरूआ गावात राहणारी पिंकी कर्माकर नऊ वर्षांपुर्वी पहिल्यांदा  विमानात बसली आणि तिने थेट लंडन गाठले. एवढ्याशा लहान घरात राहणारी, गरीब घरची लेक असणारी पिंकी अशी झेप घेईल, २०१२ साली झालेल्या लंडन ऑलिम्पिकमध्ये टॉर्च बेअरर म्हणून सहभागी होईल,  असे तेव्हा कोणालाही वाटले नव्हते. पण जे झाले ते अचंबित आणि खूप आगळेवेगळे असल्याने आता पिंकीचा प्रवास असाच भव्यदिव्य होणार, असे मनमनोरेही अनेकांनी रचले होते. पण सगळे विपरित घडले आणि आज तिच ऑलिम्पिकचा दैदिप्यमान सोहळा अनुभवणारी पिंकी, पोटाची खळगी भरण्यासाठी आसाममध्ये चहाच्या मळ्यात मोलमजुरी करते आहे.

 

नऊ वर्षांपुर्वी दहावीमध्ये शिकत असताना पिंकीला ही संधी मिळाली होती. त्यावेळी पिंकी युनिसेफतर्फे राबविण्यात येणारा 'स्पोर्ट्स फॉर डेव्हलपमेंट' (S4D) हा उपक्रम चालवायची. या उपक्रमांतर्गत पिंकी ४० पेक्षाही अधिक महिलांना शिकवत असे. महिलांच्या सामाजिक समस्या आणि फिटनेसविषयी त्यांना जागरूक करत असे. तिच्या या कामाची दखल युनिसेफने घेतली आणि तिला लंडन ऑलिम्पिकमध्ये मशाल वाहक म्हणून सहभागी होण्याची संधी दिली. 

ही संधी मिळताच तिचे खूप कौतूक झाले. अगदी आसामचे मुख्यमंत्रीदेखील तिचे कौतूक करायला आहे. ती जेव्हा ऑलिम्पिक सोहळ्यात सहभाग नोंदवून परतली, तेव्हाही तिच्या स्वागताचा सोहळा बघण्याजोगा होता. खुल्या जीपमधून तिची काढण्यात आलेली भव्य मिरवणूक आजही अनेकांना आठवते. पण नव्याची नवलाई संपली आणि पिंकीच्या आयुष्यात दुर्दैवाचे दशावतार सुरू झाले. 

 

तेव्हा कौतूक करण्यासाठी आलेल्या सगळ्यांनी आज तिच्याकडे पाठ फिरवली. ना ती धड शिकू शकली, ना या संधीचा तिला फायदा मिळू शकला. आज तीच पिंकी कुटूंबाचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी आसामच्या चहाच्या मळ्यांमध्ये शेतमजूर म्हणून राबते आहे. आईचे निधन झाल्यानंतर कुटूंबाचा गाडा चालविण्यासाठी वडीलांना मदत व्हावी म्हणून ती चहाच्या मळ्यात जाऊन काम करू लागली. आज पिंकी आणि तिचे सगळेच भावंड मोलमजूरी करून आयुष्य काढत आहेत. 

सरकार आणि युनिसेफ दोघांनीही मदतीचे आश्वासन दिले होते. ऑलिम्पिकमध्ये मशाल वाहक म्हणून सहभागी झाल्यावर मोठी रक्कम देण्यात येईल, असेही सांगितले होते. पण आजवर ना कुठली  रक्कम मिळाली ना शासनाकडून आणि युनिसेफकडून कोणती मदत मिळाली, असे दु:ख आज पिंकी व्यक्त करत आहे. 

 

टॅग्स :प्रेरणादायक गोष्टीआसाममहिला