Lokmat Sakhi >Inspirational > Plastic Bag Free Day :तुमच्या घरात प्लास्टिकच्या पिशव्या नक्की किती आहेत? प्लास्टिक पिशव्यांचं करता काय?

Plastic Bag Free Day :तुमच्या घरात प्लास्टिकच्या पिशव्या नक्की किती आहेत? प्लास्टिक पिशव्यांचं करता काय?

plastic bag free day : ३ जुलै ‘प्लास्टिक पिशवी मुक्त दिन’ म्हणून साजरा होतो, प्लास्टिकची पिशवी वापरणं आपण बंद करू शकतो का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2024 06:43 PM2024-07-03T18:43:57+5:302024-07-03T18:54:50+5:30

plastic bag free day : ३ जुलै ‘प्लास्टिक पिशवी मुक्त दिन’ म्हणून साजरा होतो, प्लास्टिकची पिशवी वापरणं आपण बंद करू शकतो का?

plastic bag free day: How many plastic bags are there in your house? how to avoid use of plastic bags at home | Plastic Bag Free Day :तुमच्या घरात प्लास्टिकच्या पिशव्या नक्की किती आहेत? प्लास्टिक पिशव्यांचं करता काय?

Plastic Bag Free Day :तुमच्या घरात प्लास्टिकच्या पिशव्या नक्की किती आहेत? प्लास्टिक पिशव्यांचं करता काय?

Highlights. प्लास्टिक पिशवी मुक्त चळवळ समाजपातळीवर आणि वैयक्तिक पातळीवर आपण अंगीकारायला हवी.

अश्विनी बर्वे, मुक्त पत्रकार

आपल्या घरात प्लास्टिकच्या लहान-मोठ्या पिशव्या किती येतात? किती आपण साचवल्या असं कधी मोजलं आहे? ते मोजायला एक चांगला मुहूर्त आहे. ३ जुलै हा दिवस ‘जागतिक प्लास्टिक पिशवी मुक्त दिवस’ म्हणून पाळला जातो. किमान या दिवशी तरी माणसाने प्लास्टिकच्या पिशवीपासून स्वतःची सुटका करून घ्यावी, अशी अपेक्षा आहे. जागोजागी साठलेल्या कचऱ्याच्या ढिगात, रस्त्यावर, कोणत्याही गावात प्रवेश करतेवेळी गावाच्या बाहेर दिसणाऱ्या कचऱ्यात प्लास्टिकच्या पातळ पिशव्यांचा समावेश अधिक असतो. सगळं गाव स्वच्छ असतं; पण कुठेतरी गटारात आपल्याला प्लास्टिकच्या पिशव्या अडकलेल्या दिसतात.

या पिशव्याच कधीतरी एखाद्या गायीच्या, कुत्र्याच्या, डुकराच्या तोंडात दिसतात. समुद्रातील मासे, आकाशात उडणारे पक्षी आणि रस्त्यावर भटकणारी मुले यांच्याही भोवती प्लास्टिकच्या पिशव्यांचा वेढा दिसतो. हे सगळे फोटो वर्तमानपत्रात बघितले की मग आपल्याला जाणीव होते की, आपण किती मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पिशव्या वापरत आहोत. त्यावेळी आपण कदाचित काही पर्यायांचा विचार करायला लागतो तोच आपलं मन म्हणतं आपण एकटेच नाहीतर अनेकजण प्लास्टिकच्या पिशव्यांचा उपयोग करत आहेत. हा कचरा मी एकट्याने केलेला नाही त्यामुळे त्याच्या पर्यायाचा विचार करण्याची जबाबदारी माझी नाही. त्यामुळे प्लास्टिक पिशव्यांचा खच अधिकाधिक होत राहतो. खरंतर प्लास्टिक पृथ्वीच्या आणि आपल्या आरोग्यासाठी घातक आहे; पण तरी ते वेगवेगळ्या रूपात आणि आकारात माणसाच्या उपयोगी पडत असतं.

यावर खरंच काही उपाय नाही का? आपल्या स्वयंपाकघरात रोज लहानसहान वस्तू येताना किती प्लास्टिकच्या पिशव्यांसह येता? ऑनलाइन ऑर्डर केलेल्या पॅकिंगचा पसारा किती मोठा असतो.

आपली जीवनपद्धती बदल्याने प्लास्टिक आपल्या जीवनात अधिक वावरू लागले आहे. वाण सामान सुट्टे मिळत नाही. ते विशिष्ट ब्रँडचे असते आणि ते प्लास्टिकमध्ये पॅक केलेले असते. मुलांसाठी, मोठ्यांसाठी मिळणारा कोरडा खाऊ हा सुद्धा प्लास्टिकच्या आवरणात मिळतो. प्लास्टिकमुळे कोणतेही सामान सहजपणे इकडून तिकडे नेणे सोपे जाते. आणि त्याचा हाच गुण माणसाला अतिशय भावतो त्यामुळे त्याचा वापर जास्तीत जास्त होतो; पण त्या पिशव्यांची योग्य विल्हेवाट लावणं अशक्य आहे आणि त्याचा निसर्गावर वाईट परिणाम होत आहे.

पण आपल्याला ठरवून आणि निश्चय करून प्लास्टिकच्या पिशव्यांना योग्य आणि सहज उपलब्ध होणारा पर्याय शोधणे गरजेचे आहे. आपण पूर्वीपासून कापडाची पिशवी वापरत होतो, आजही अनेकजण ती वापरतात; पण ही पिशवी सर्वच पदार्थांसाठी वापरता येत नाही. पण काही गावांमध्ये प्लास्टिकचा पुनर्वापर केला आहे. काही व्यक्ती त्या पातळ पिशव्यांचा वापर करूनच अनेक काळ उपयोगी पडतील, अशा वस्तू तयार करत आहेत. काही ठिकाणी रस्त्याच्या बांधकामासाठी त्याचा वापर केला आहे. पण अजून आपण प्लास्टिक वापरत राहिलो आणि त्याचा कचरा होत राहिला तर आपण त्याचे किती आणि काय पुनर्वापर करणार आहोत, याचाही विचार व्हायला हवा. आणि त्याचबरोबर प्लास्टिकच्या पिशव्या वापरण्यावर स्वतःच बंधन घालायला हवे.

‘प्लास्टिक मुक्त दिवस’ या चळवळीमुळे प्लास्टिक प्रदूषणाला आळा घालता येईल. आपल्याला स्वच्छ रस्ते, स्वच्छ समुद्र किनारे आणि स्वच्छ समुद्र आणि सुंदर गावांचा अनुभव घेता येईल. आपले पर्यावरण चांगले राहण्यास त्यामुळे मदत होईल. प्लास्टिकला एखादा चांगला पर्याय जो सहज आणि स्वस्त असेल तो आपणच शोधून काढायला हवा. प्लास्टिक पिशवी मुक्त चळवळ समाजपातळीवर आणि वैयक्तिक पातळीवर आपण अंगीकारायला हवी. त्यातून पर्यावरणाला मदत होईल आणि आपण चांगल्या वातावरणात श्वास घेऊ. आणि आता ठरवून आपल्या घरातला प्लास्टिक पिशव्यांचा वापर तरी कमी करू.

गादीखाली किती पिशव्या साचल्या?

प्लास्टिक आणि माणसाची दोस्ती, ही घट्ट आहे. स्त्रियांची तर प्लास्टिकच्या पिशव्यांची दोस्ती तर अधिकच. त्या अनेक वेळा अनेक कारणांनी, अनेक पद्धतींनी पिशव्या जपून ठेवत असतात. घरात या पिशव्या अनेक ठिकाणी त्यांच्या पतवारीप्रमाणे जपून ठेवल्या जातात. केरासाठी वेगळ्या, कोणाला काही घालून द्यायचं असेल तर वेगळ्या. जाड, फॅशनेबल पिशव्यांची जागा विशेष असते. त्या अनेक काळ आवडल्या म्हणून विशेष जागी ठेवल्या जातात. त्यामुळेच त्याची साथ सहजासहजी सुटत नाही. त्याला पर्याय म्हणून कापडी पिशव्या, पेपरच्या पिशव्या या असल्यातरी त्याचा वापर फारसा होताना दिसत नाही. कारण, प्लास्टिक पिशवी मिळते तितक्या सहज या पिशव्या मिळत नाहीत.

ashwinibarve2001@gmail.com

Web Title: plastic bag free day: How many plastic bags are there in your house? how to avoid use of plastic bags at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.