Join us  

 वेलडन! पोलिस दलातील नोकरी सांभाळून नाशिकच्या अश्विनी देवरे यांनी मिळवला आयर्नमॅनचा किताब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2022 8:14 AM

पोलिस दलातील नोकरी, दोन मुलं, घरातली जबाबदारी सांभाळत आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कामगिरी करणं सोपी गोष्ट नाही. पण स्पर्धा जिंकण्याची जिद्द ठेवणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातल्या अश्विनी देवरे (Ashwini Devare) यांनी ती करुन दाखवली . कझाकिस्तानात झालेल्या स्पर्धेत त्यांनी आयर्नमॅन (Ironman) होण्याचा विक्रम केला.

ठळक मुद्दे अश्विनी देवरे यांनी देश परदेशात झालेल्या मॅरेथाॅन स्पर्धेत भाग घेऊन 40 सुवर्ण पदकं मिळवली आहेत. आयर्नमॅनसाठी सलग दोन वर्ष त्यांनी अथक परिश्रम घेतले.आयर्नमॅन स्पर्धेतील तीन टप्पे अश्विनी देवरे यांनी विक्रमी वेळेत पूर्ण केले. 

देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असतांना, घराघरावर तिरंगा फडकवला जात असताना कझाकिस्तानमध्ये नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातल्या जावखेडा गावातल्या अश्विनी देवरे (Ashwini Devare)  यांनी आपल्या कर्तबगारीनं भारताची मान अभिमानानं उंचावली.  शहर पोलिस आयुक्तालयाच्या नाशिकरोड पोलिस ठाण्यात पोलिस नाईक (police naik) असणाऱ्या अश्विनी देवरे यांनी कझाकिस्तानमध्ये झालेल्या स्पर्धेत आयर्नमॅन (Ironman) होण्याचा बहुमान मिळवला. महाराष्ट्राच्या पोलिस दलात आयर्नमॅन हा किताब मिळवणाऱ्या अश्विनी देवरे या पहिल्या महिला ठरल्या आहेत. 

Image: Google

कझाकिस्तान येथे झालेल्या आयर्नमॅनसाठीच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत अश्विनी देवरे यांनी 40 ते 45 वयोगटात सहभाग घेतला होता. अत्यंत खडतर समजल्या जाणाऱ्या या स्पर्धेत शारीरिक आणि मानसिक क्षमतेचा अक्षरश: कस लागतो.  या स्पर्धेत 3.8 किमी पोहोणे, 180 किमी सायकलिंग आणि 42.2 किमी धावणे असे टप्पे 17 तासात पार करावे लागतात. अश्विनी देवरे यांनी हे टप्पे केवळ 14 तास 24 मिनिटं 46 सेकंद या विक्रमी वेळेत पार केले .

मुळातच खेळाची आवड असणाऱ्या अश्विनी देवरे यांनी पोलिस दलातील नोकरी, दोन मुलं आणि घर सांभाळून सलग दोन वर्ष अथक प्रयत्न केले. धावण्यासोबतच त्या नियमित सायकलिंगचा सराव करत होत्या. रोज पहाटे उठून नाशिक ते मालेगाव तर कधी नाशिकरोड ते त्र्यंबक त्या सायकलिंग करायच्या. सायकलिंगच्या या सरावाचा आपल्याला आयर्नमॅन स्पर्धेत उपयोग झाल्याचं अश्विनी देवरे सांगतात. 

Image: Google

श्रीलंका, मलेशिया तसेच भारतातील विविध मॅरेथाॅन स्पर्धेत भाग घेत अश्विनी देवरे यांनी आतापर्यंत 40 सुवर्ण पदकं मिळवली आहेत. पोलिस दलात रुजू झाल्यानंतर त्या पाॅवर लिफ्टिंग , वेट लिफ्टिंगचाही सराव करु लागल्या. पण मणका दुखावल्यानं हा खेळ त्यांना अर्ध्यातच सोडावा लागला. पण त्यांची खेळण्याची जिद्द, स्पर्धेत यशस्वी होण्याची इच्छा कमी झाली नाही. मॅरेथाॅन, सायकलिंग याद्वारे त्यांनी आपली खेळाची आवड जोपासली. स्वत:मधली क्षमता वाढवत नेली आणि त्याबळावरच कझाकिस्तानात झालेल्या स्पर्धेत आयर्नमॅन होण्याचा विक्रम केला. 

टॅग्स :प्रेरणादायक गोष्टीमहिलापोलिस