आपण सगळेच पोटापाण्यासाठी नोकरी किंवा धंदा करतो. पण काही जणांना आपले शिक्षण पूर्ण करण्यासाठी किंवा आणखी काही कारणांसाठी पैसा कमवावा लागतो. कॉलेजचे शिक्षण घेत असताना कधी फी भरण्यासाठी तर कधी पॉकेट मनी म्हणून आणि वह्या-पुस्तकांसाठी आपल्याला पैशांची आवश्यकता असते. बरेचदा आपण सिक्युीटीचे काम करणारे तरुण पुस्तकं वाचताना किंवा कधी कोणी दिवसभर नोकरी करुन रात्रशाळेत शिक्षण घेताना आपल्या आजुबाजूला पाहतो. आयुष्यात तुम्हाला एखादी गोष्ट साध्य करायची असेल तर काहीच अशक्य नाही. कष्ट करण्याची तयारी असेल तर प्रतिकूल परिस्थितीवर मात करुन तुम्ही पुढे जाताच याची प्रचिती नुकतीच एका घटनेतून समोर आली आहे (Poonam From Chandigarh Runs A Panipuri Stall To Support Her Education).
चंदिगडमध्ये राहणाऱ्या पूनमने आपले शिक्षण पूर्ण करण्यासाठी पूनमने शहरात पाणीपुरीचा स्टॉल लावला आहे. अनेकदा आपण रस्त्याने जाताना आपल्याला पाणीपुरीवाले दिसतात. बहुतांशवेळा हे काम करणारे पुरुष असतात. पण फारच कमी वेळा एखादी महिला पाणीपुरीच्या ठेल्यावर असलेली दिसते. फूड ब्लॉगर हॅऱी उप्पल यांना चंदिगडमधील मोहाली येथे एक तरुणी पाणीपुरी विकताना दिसली. हॅरी यांनी नुकतीच पूनमच्या स्टॉलला भेट दिली. हॅरी यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पूनमच्या स्टॉलविषयी माहिती देणारा व्हिडिओ अपलोड केला आहे. आपल्या या चाट स्टॉलसाठी पूनम स्वत: आलू टिक्की, पापडी, चटणी हे सगळे तयार करते. या व्हिडिओमध्ये हॅरी यांनी पूनमला तिच्याकडचे पदार्थ खास असण्यामागचे कारण विचारले. तसेच तिने पैसे कमावण्यासाठी हाच बिझनेस करायेच का ठरवले असेही विचारले.
यावेळी पूनम म्हणाली, यातली कोणतीच गोष्ट मी शिकलेले नाही, तर प्रत्येक गोष्ट मी माझी माझी करते. आधी एका दातांच्या दवाखान्यात पूनम नोकरी करायची. मात्र हा जॉब तिने सोडला याचे कारण म्हणजे तिला अभ्यासासाठी अजिबात वेळ मिळत नव्हता. पैसे मिळवायचे तर एखाद्या एसी ऑफीसमध्ये नोकरी करायची असे आपले साधारण गणित असते. त्यामुळे अशाप्रकारे एखादा स्टॉल लावून पैसे मिळवणे याला आजही आपल्याकडे दुय्यम नजरेने पाहिले जाते. मात्र या माध्यमातून पैसे कमावणे यात लाज वाटण्यासारखे काहीच नाही असे पूनम म्हणते. कोणतेच काम लहान किंवा मोठे नसते असे पूनमचे म्हणणे आहे. तिच्याकडून तरुणांना नक्कीच प्रेरणा मिळू शकते. तुम्हीही कधी चंदिगडला मोहाली याठिकाणी गेलात तर पूनमच्या या स्टॉलला आवर्जून भेट द्या.