Join us  

पतीनं फसवलं म्हणून रडत न बसता ‘तिनं’ केला मेकओव्हर, जिंकली ब्यूटी कॉण्टेस्ट, पालटलं नशिब!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2022 3:07 PM

Priya Paramita Paul : लग्नानंतर चारचाैघींसारखंच तिचं आयुष्य सुरु होतं. पण मग एक दिवस कळलं की नवरा आपल्याला फसवतोय, त्यानंतर घटस्फोट, डिप्रेशन.. मात्र त्यांनी हार न मानता पुन्हा आपलं आयुष्य नव्यानं बांधायला सुरुवात केली. त्या जिद्दीची गोष्ट.

आपण फसवलो गेलो हे समजल्यावर दु:ख होतंच. त्यातही वैवाहिक नात्यात जर फसवणूक, प्रतारणा वाट्याला आली तर अनेकजणी मोडून पडतात. मात्र ठरवलं तर आपल्या दिसण्यापासून ते जगण्यापर्यंत अनेक गोष्टी नव्यानं पुन्हा सुरु करता येतात. आपल्यावर जिद्दीने काम करुन आपला चेहरामोहराच नाही तर नशिबही पालटता येतं. आनंदानं जगता येतं आणि यशस्वीही होता येतं असं सांगणारी ही गोष्ट. प्रिया परमिता पॉल यांची. त्या म्हणतात, हार मानून थांबले असते तर काहीच घडलं नसतं, मी जिद्दीनं उभी राहिले म्हणून आज इथवर पोहोचले. प्रिया  मिस इंडिया वर्ल्ड इंटरनॅशल २०२२ चा खिताब जिंकल्या आहेत. ऑगस्टमध्ये होणाऱ्या २०२२ च्या मिसेस इंडिया वर्ल्ड फायनलिस्टमध्येही त्यांचं नाव आहे.  (Mrs india world finalist priya paramita paul weight loss transformation journey and success story)

 

आजतक या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्या आपली जीवनकहाणी सांगतात. प्रिया परमिता पॉल मुंबईच्या. एका आयटी कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर आणि लाईफ कोच आहेत. त्या म्हणतात, 'मी माझ्या आयुष्यात खूप चढ उतार पाहिले पण हार मानली नाही. मी माझी स्वप्न पूर्ण करण्याचं ठरवलं. सौंदर्य स्पर्धा जिंकण्याचं स्वप्न मनाशी होतं ते पूर्ण करण्याच्या दिशेनं मी चालत राहिले, आणि स्वप्न सत्यातही उतरलं.’

प्रिया सांगतात ''ही गोष्ट २०१६ ची आहे. लग्नानंतर सासरी मी सुखात राहत होते. संसार- माझा जॉबही व्यवस्थित सुरू होता. माझे सासू सासरे आणि दोन दीर असं आमचं कुटुंब होतं. काही काळानंतर आम्ही दोघे वेगळे राहू लागलो. एकदा मी ऑफिसमध्ये असताना पतीचा मेल आला, की मी तुझ्या सोबत राहू शकत नाही. त्यानंतर मी  त्यांना खूप कॉल आणि मेसेजेस करण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी काहीच उत्तर दिलं नाही. नंतर कळलं की माझ्या पतीचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर सुरू होतं. म्हणून मला ते सोडून गेले. त्यानंतर  मी काही काळ डिप्रेशनमध्य गेले. माझी नोकरीही गेली. शेवटी २०१८ मध्ये मी घटस्फोट घेतला’.

पण मग खचून न जाता प्रिया यांनी पुन्हा हिमतीनं उभं राहणं स्वीकारलं. त्या सांगतात, मला लहानपणापासूनच ब्यूटी स्पर्धेत भाग घ्यायचा होता. पण घरच्यांच्या दबावामुळे मी ते करू शकले नाही. माझा संसार मोडल्यानंतर मी सेल्फ हिलिंग, योगाची मदत घेतली. त्यामुळे मानसिकरित्या रिलॅक्स व्हायला मदत मिळाली. त्यानंतर मी माझ्या पर्सनॅलिटीवर काम करायला सुरूवात केली.  जवळपास १० किलो वजन कमी केलं. हळूहळू मी खूप स्ट्राँग, बोल्ड आणि कॉन्फिडंट झाले. आज मी मिसेस इंडिया वर्ल्डची फायनलिस्ट आहे. मी माझा हा प्रवास असाच सुरू ठेवेन.''

टॅग्स :प्रेरणादायक गोष्टीसोशल व्हायरल