Join us  

अभिमान आणि आनंदाची बातमी! देशातील सर्वोच्च विज्ञान संस्थेच्या प्रमुखपदी प्रथमच महिला, नल्लाथंबी कलैसेल्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2022 3:29 PM

Nallathamby Kalaiselvi Becomes First Woman To Head India's Top Scientific Institute CSIR : महिला शास्त्रज्ञाच्या जिद्दीचा प्रवास

ठळक मुद्देत्यांना संशोधन क्षेत्रातील 25 वर्षांपेक्षा जास्त अनुभव असून इलेक्ट्रोकेमिकल पॉवर सिस्टमवर आधारीत संशोधन त्यांनी केले आहे. यांच्या नावावर आतापर्यंत 125 हून अधिक शोधनिबंध आणि 6 पेटंट आहेत.

विज्ञान-तंत्रज्ञान म्हटले की साधारणपणे पुरुषांना त्या विषयांत गती असते असे समजले जाते. त्यामुळे बहुतांशवेळा देशाच्या महत्त्वाच्या वैज्ञानिक संस्थांच्या संचालक पदी किंवा संचालक मंडळात पुरुष आघाडीवर असल्याचे चित्र असते. मात्र महिलाहीविज्ञान-तंत्रज्ञानासारख्या काहीशा अवघड विषयात आता मागे नाहीत. गेल्या काही वर्षात अवकाश, तंत्रज्ञान, विज्ञान अशा सगळ्या विषयात महिलाही आपले स्थान निर्माण करत असल्याचे चित्र आहे. त्यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. ती म्हणजे नल्लाथंबी कलैसेल्वी (Nallathamby Kalaiselvi) यांची वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या (CSIR) पहिल्या महिला महासंचालकपदी नियुक्ती झाली आहे. नल्लाथंबी कलैसेल्वी या फेब्रुवारी 2019 पासून त्या  तामिळनाडूच्या कराईकुडी  येथील केंद्रीय इलेक्ट्रोकेमिकल रिसर्च इन्स्टिट्यूटच्या (CSIR-CECRI)पहिल्या महिला संचालक म्हणून कार्यरत होत्या. आता त्यांची  CSIR च्या महासंचालकपदी नियुक्ती झाली आहे (Nallathamby Kalaiselvi Becomes First Woman To Head India's Top Scientific Institute). 

(Image : Google)

CSIR हे देशभरातील 38 संशोधन संस्थांचे संघटन असून 1942 मध्ये या संस्थेची स्थापना झाली आहे. कलैसेल्वी यांचा CSIR मध्ये नवोदित शास्त्रज्ञ ते महासंचालक असा प्रवास अतिशय प्रेरणादायी आहे. महासंचालक पदाची नियुक्ती २ वर्षांसाठी करण्यात आली असून वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन विभागाच्या सचिवपदीही नियुक्ती करण्यात आली आहे. याआधी संस्थेच्या महासंचालकपदी शेखर मांडे कार्यरत होते. मांडे एप्रिलमध्ये निवृत्त झाल्यावर जैवतंत्रज्ञान विभागाचे सचिव राजेश गोखले यांच्याकडे CSIR चा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला होता. अखेर या पदावर कलैसेल्वी यांची नियुक्ती करण्यात आली.

त्यांचे शालेय शिक्षण तामिळनाडूच्या तिरुनेलवेली जिल्ह्यातील अंबासमुधराम येथून तामिळ माध्यमात झाले. महाविद्यालयीन शिक्षण घेताना त्यांना विज्ञान विषयात विशेष गती असल्याचे लक्षात आले. कलैसेल्वी यांच्या नावावर आतापर्यंत 125 हून अधिक शोधनिबंध आणि 6 पेटंट आहेत. लिथियम-आयर्न बॅटरीच्या क्षेत्रातील कामासाठी त्यांची विशेष ओळख आहे. त्यांना संशोधन क्षेत्रातील 25 वर्षांपेक्षा जास्त अनुभव असून इलेक्ट्रोकेमिकल पॉवर सिस्टमवर आधारीत संशोधन त्यांनी केले आहे. 

 

टॅग्स :प्रेरणादायक गोष्टीविज्ञानतंत्रज्ञानमहिला