Join us  

अभिमानास्पद! दोन महिला अधिकारी आता थेट वॉर फ्रंटवर! प्रथमच महिलांचा लढाऊ तुकडीत समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2021 7:08 PM

भारतीय महिलांनी आता यशोशिखराचा आणखी एक टप्पा सर केला असून पहिल्यांदाच दोन महिला अधिकारी इंडो- तिबेटीयन बॉर्डर पोलिसांच्या लढाऊ तुकडीत सहभागी झाल्या आहेत. 

ठळक मुद्देया ऐतिहासिक क्षणांचा साक्षीदार झालेल्या अनेक अधिकाऱ्यांनी हा क्षण डोळ्यात साठवून घेतला.

समस्त भारतीयांसाठी ही एक अत्यंत आनंददायी गोष्ट आहे. युपीएससी निवड प्रक्रियेद्वारे प्रकृती आणि दिक्षा या दोन महिला अधिकाऱ्यांची या कामगिरीसाठी निवड करण्यात आली आहे. या दोन्ही अधिकाऱ्यांना सहायक कमांडर पदाचा दर्जा देण्यात आला असून आयटीबीपीने या दोघींनाही रविवारी युद्ध आघाडीवर तैनात केले आहे. अशाप्रकारे भारतात पहिल्यांदाच महिला अधिकारी सीमेवरती तैनात असणाऱ्या रक्षक तुकडीच्या सदस्य झाल्या आहेत. आतापर्यंत केवळ कनिष्ठ स्तरावरच महिलांचा समावेश होता.

 

रविवार दि. ८ ऑगस्ट रोजी झालेल्या पासिंग आऊट परेडदरम्यान त्यांनी देशसेवेची शपथ घऊन आयटीबीपीमध्ये सहभाग घेतला. या तुकडीत एकूण ५३ अधिकाऱ्यांचा सहभाग असून  त्यांचे प्रशिक्षण नुकतेच मसुरी येथे पुर्ण झाले आहे. या ऐतिहासिक क्षणांचा साक्षीदार झालेल्या अनेक अधिकाऱ्यांनी हा क्षण डोळ्यात साठवून घेतला. तर काहीजणांनी टोप्या आकाशात फेकून या अभिमानास्पद क्षणाचा आनंद व्यक्त केला. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. 

याविषयी माध्यमांशी बोलताना मुळच्या उत्तर प्रदेशच्या असणाऱ्या कमांडर दिक्षा म्हणाल्या की, आयटीबीपीमध्ये अधिकारी म्हणून सहभागी होऊन माझे लहानपणीचे स्वप्न आज साकार होत आहे. आजचा आनंद शब्दांत सांगणे कठीण असून निरिक्षकपदी असणाऱ्या माझ्या वडीलांनी मला नेहमीच याबाबतीत प्रोत्साहन दिले. तेच माझा आदर्श आहेत, अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या. 

 

दुसऱ्या महिला अधिकारी प्रकृती या मुळच्या बिहारच्या आहेत. कठोर परिश्रमानंतर आजचा हा दिवस दिसला आहे. या यशामागे कुटूंबाचे योगदान खूप मोठे आहे, अशा भावना प्रकृती यांनी व्यक्त केल्या. ते म्हणाले की, आज त्यांचे स्वप्न कठोर परिश्रमानंतर साकार झाले आहे. ते म्हणाले की, त्यांच्या यशामागे त्यांचे कुटुंब मोलाचे आहे. 

 

टॅग्स :प्रेरणादायक गोष्टीयुद्धसीमारेषा