Lokmat Sakhi >Inspirational > वयाच्या साठीत सुरु केले सायकलिंग आणि २१००० किलोमीटर सायकल चालवत पूर्ण केला मोठा विक्रम

वयाच्या साठीत सुरु केले सायकलिंग आणि २१००० किलोमीटर सायकल चालवत पूर्ण केला मोठा विक्रम

भेटा पुण्याच्या जयश्री जाधव यांना, शारीरिक व्याधींची तक्रार न करता त्यांनी वयाच्या साठीत सुरु केलं सायकलिंग आणि बदललं आयुष्य.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2024 05:38 PM2024-07-05T17:38:37+5:302024-07-05T17:51:32+5:30

भेटा पुण्याच्या जयश्री जाधव यांना, शारीरिक व्याधींची तक्रार न करता त्यांनी वयाच्या साठीत सुरु केलं सायकलिंग आणि बदललं आयुष्य.

Pune Based cyclist Jayashri Jadhav, started cycling at the age of 60, completed 21000 kilometers. | वयाच्या साठीत सुरु केले सायकलिंग आणि २१००० किलोमीटर सायकल चालवत पूर्ण केला मोठा विक्रम

वयाच्या साठीत सुरु केले सायकलिंग आणि २१००० किलोमीटर सायकल चालवत पूर्ण केला मोठा विक्रम

Highlightsशारीरिक दुखण्याच्या बेडीत अडकू नका. औषधांवर जगण्यापेक्षा छंद जोपासा आणि आनंदी आयुष्य जगण्यासाठी प्रयत्न करा.

माधुरी पाचपांडे (लेखिका सायकलिस्ट आणि युट्यबूर आहेत.)

वयाच्या साठीत पदार्पण केलेल्या पुण्याच्या जयश्री जाधव. साठीचा उल्लेख मुद्दामच केला कारण आपल्याकडे वयाचा आणि मग ओघाने येणारा व्याधींचा बाऊ करण्याची चढाओढच असते. या सर्वांवर मात करत गेल्या चार वर्षात २१००० किलोमीटर सायकल प्रवास पूर्ण करणाऱ्या पुण्याच्या जयश्री जाधव यांचा सायकल प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहेत.

पीसीएमसी मध्ये वैद्यकीय क्षेत्रात नोकरीला असणाऱ्या जयश्रीताईंचे रुटीन अगदी आखलेले होते. दहा तास नोकरी नंतर नवरा, मुलं, सासू-सासरे, घर आणि संसार. अगदी चाकोरी बद्दल बिझी लाईफ.  रिटायर व्हायच्या वर्षभर आधी त्यांच्या मनात सहज विचार आला की आता मी दहा तास काम करतेय नंतर हे दहा तास मी काय करणार? घरात तर बसून राहू शकत नाही, इतकी कामाची आवड आणि सवय झालेली आहे. या विचारांनी त्यांना थोडी भीती वाटली खरी पण त्यांनी सकारात्मक विचार करून पुढील वेळेचे नियोजन करायला सुरुवात केली. त्यातच त्यांचे अचानक मोठे ऑपरेशन झाले. गर्भाशयाची पिशवी काढावी लागली. त्यानंतर त्यांचे गुडघे आणि टाचेमध्ये प्रचंड वेदना सुरू झाल्या. सर्व प्रकारचे वैद्यकीय उपचार करून सुद्धा काहीही फरक पडत नव्हता. पायाचे व्यायाम करणे आणि टाचेखाली लाटणे फिरवणे हे रोज केलं तरच थोड बरं वाटत असे.
आपल्या आजूबाजूला असणाऱ्या सकारात्मक विचार करणाऱ्या मित्रपरिवारांमुळे आपले आयुष्य ही बदलून जाते याचा अनुभव जयश्रीताईंनीही घेतला. त्यांचे बालमित्र, उत्तम सायकलिस्ट सुनील पाटील हे गेल्या  दोन-तीन वर्षापासून त्यांना निरुपमा भावे यांच्या सायकल प्रवासाचे नवनवीन व्हिडिओ सतत पाठवत राहायचे. तूसुद्धा सायकलिंग सुरू कर, तुझे दुखणे निघून जाईल तू एकदा सायकल चालवून तर बघ असा सल्ला नेहमी द्यायचे. पण जयश्रीताईंनी कधी सायकल चालवण्याचा विचार कधीच केला नव्हता. पण गेली दोन वर्ष सातत्याने मागे लागलेल्या आपल्या बालमित्राच्या सांगण्यावरून त्यांनी सायकल चालवून बघण्याचा निर्णय घेतला. 

त्यांच्या या निर्णयाला त्यांच्या मुलाने मुलीने आणि पुतणीने भक्कम साथ दिली.  नवीन सायकल शोधण्याची तयारी सुरू झाली. दोन-तीन महिन्यांच्या शोधकार्यानंतर अचानक एक दिवस मुलानेएक सायकल घरी आणली. इतके वर्ष कार आणि टू व्हीलर चालवण्याची  सवय असल्यामुळे जयश्रीताईंनी जेव्हा पहिल्यांदा सायकल हातात घेतली त्यावेळी अगदीच पावशेर वजनाची ही सायकल माझं वजन कसं काय पेलणार अशी त्यांना भीती वाटली.
पहिले दोन-तीन दिवस तर फक्त सायकल पकडण्याची सवय त्या करत होत्या. सोसायटीतील एका मुलीला सायकलवर बसताना बघून तिच्या मार्गदर्शनाने चौथ्या दिवशी त्या सायकलवर बसायला शिकल्या. आयुष्यात यापूर्वी कधीच सायकलला हात लावला नसल्यामुळे जे काही होणार होते ते सगळेच नवीन होते. हळूहळू सोसायटीतच एक/ दोन किमीचे राऊंड त्यांनी मारायला सुरुवात केली. येणारा थकवा, पायात येणारे गोळे, लागणारी धाप, स्टॅमिना शून्य असे सगळे प्रकार होत असून देखील त्यांनी हिम्मत सोडली नाही. या सर्व प्रोसेस मध्ये त्यांची मुलगी आणि पुतणी त्यांच्यासोबत कायम त्यांना धीर द्यायला होते. त्यांनी आहारात योग्य बदल करून  पूर्ण लक्ष ठेवले. तू करू शकतेस, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत, तू प्रयत्न कर असे शब्द त्यांना रोज धीर देत होते. हळूहळू योग्य आहारामुळे आणि रोजच्या प्रॅक्टीसमुळे ५ ते २० किमी सायकल चालवण्याचा आत्मविश्वास आला. 

पण एक दिवस सायकल राईड करताना मॅडम सायकल वरून पडल्या, मनात भीती बसायच्या आधीच मुलीने सांगितले, टू व्हीलर वरून पडलीस तेव्हा टू व्हीलर चालवणं सोडलं नाहीस आता सायकल चालवणे सोडायचे नाही. अशी मुलांची भक्कम साथ असल्यामुळे त्या उत्साहाने एकेक राईड हिमतीने करीत होत्या. पहिली मोठी आळंदी राईड केल्यानंतर त्यांचा उत्साह खूपच वाढला.
निरूपमा भावे यांचे सायकलिंगचे व्हिडिओ बघून प्रेरणा घेत होत्या त्याच भावे मॅडमसोबत पुणे पंढरपूर घुमान ही नामदेव वारी करण्याचा योग आला. २३ दिवसात २३०० किलोमीटर सायकल प्रवास यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर त्यांना स्वतःचेच नवीन रूप अनुभवायला मिळाले. कौतुक म्हणून मुलांनी त्यांना सत्तर हजारांची ट्रेक सायकल पुढील प्रवासासाठी गिफ्ट दिली.

त्या सांगतात, खूप छान सायकलिंगचा मित्रपरिवार त्यांना मिळाला. या टाचेचे दुखणे बंदच झाले. स्नायू मजबूत झाले.  स्टॅमिना वाढला, शक्ती वाढली. नवीन उत्साह वाटायला लागला.  असह्य दुखणी गायबच झाली.
पुढे त्यांनी त्यांच्या सायकल प्रवासाने अजिबात ब्रेक घेतला नाही.
पुणे ते पंढरपूर,पुणे -शिर्डी - पुणे,  पुणे ते गोंदवले , पुणे - जेजुरी - पुणे ,  खडकवासला परिक्रमा, पुणे - गेटवे ऑफ इंडिया (मुंबई) नाइट राइड, दोन वेळा कुंभार्ली घाट स्पर्धा, अकरा मारुती राईड, रत्नागिरी रोलर कोस्टर राईड अश्या जबरदस्त सायकल राईड त्यांनी यशस्वी रित्या पूर्ण केल्या. उत्तराखंड मध्ये जिम कॉर्बेट दहा दिवसांची जंगल सायकल सफारी त्यांनी एकटीनेच पूर्ण केली.
सायकलिंग सोबतच आठवड्यातून एक दिवस जयश्रीताई निसर्ग सेवा करतात. दिघी येथे असणाऱ्या डोंगरावर वृक्षारोपण करणे, लावलेल्या झाडांचे संगोपन करणे, कॅनने पाणी वर नेऊन सर्व झाडांना पाणी देणे. स्वच्छता करणे अशी सेवा त्या न चुकता करतात. डोंगर चढउताराचा त्यांना फिटनेससाठी फायदाच होतो. प्रत्येक सायकल राईड नंतर त्या प्राणायाम आणि योगा करतात. आहारामध्ये भरपूर ड्रायफ्रूट्स आणि फळांचा समावेश करतात. या सर्वांसोबतच त्यां प्रोफेशनल फोटोग्राफीचा छंदही जोपासतात. 

सायकल त्यांच्या आयुष्यात आणणारे त्यांचे मित्र सुनील पाटील यांचे आभार मानून त्या सांगतात,  स्वतःसाठी जगायला शिका. स्वतः साठी वेळ द्या. इच्छाशक्ती असेल तर अशक्य काही नाही. शारीरिक दुखण्याच्या बेडीत अडकू नका. औषधांवर जगण्यापेक्षा छंद जोपासा आणि आनंदी आयुष्य जगण्यासाठी प्रयत्न करा.
आजूबाजूला कायम सकारात्मक विचार करणारा मित्रपरिवार असेल याची खात्री करा.

Web Title: Pune Based cyclist Jayashri Jadhav, started cycling at the age of 60, completed 21000 kilometers.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.