माधुरी पाचपांडे (लेखिका सायकलिस्ट आणि युट्यूबर आहेत.)
सायकलने आयुष्य समृद्ध केलं असं सांगणारे अनेकजण आहेत. पण कावेरीची गोष्टच वेगळी. कावेरी वसंत वाघले. तरुण उत्साही सायकलिस्ट मुलगी. तिने खरे करुन दाखवले आहे की गरज ही शोधाची जननी हे आहे. कावेरी ही एक उत्तम सायकलिस्ट आहे पण आता ती 'Crafty Stitch' या ब्रँडची मालकीण सुद्धा आहे. सायकल साठी लागणाऱ्या विविध प्रकारच्या ॲक्सेसरीज /पाउचेस/ बॅग्स ती स्वतः बनवून देते.
सायकलिस्ट ते छोटा उद्योग ही तिची गोष्ट अत्यंत प्रेरणादायी आहे.
कावेरी बीकॉम ग्रॅज्युएट आहे. तिने टॅक्सेशन मध्ये डिप्लोमा सुद्धा केला आहे. तिच्या आयुष्याला नवीन कलाटणी मिळाली ती लॉकडाऊन मध्ये.
कावेरी सांगते लॉकडाऊन मध्ये घरीच होते त्यामुळे एक सायकलिंग ग्रुप जॉईन करून सायकल चालवायला सुरुवात केली. आधी अगदी आवड म्हणून पाच-दहा किलोमीटरच्या राईड ती करायची. एकदा गावाला राहणाऱ्या तिच्या मामाकडे तिने सायकलने जाण्याचा निर्णय घेतला. एक दोन दिवस राहिला जाणार त्यामुळे त्याप्रमाणे सामान सोबत घ्यावे लागणार होते. सायकलला तशी काही सोय नसल्यामुळे तिला सर्वसामान पाठीवरच्या बॅग मध्येच ठेवावे लागले. सर्व वजन पाठीवर घेऊन ती सायकलिंग करीत मामाकडे पोहोचली. पाठीवर ओझं आणि त्यात सायकलींग यामुळे तिला त्रास झाला. त्यातूनच तिचे विचार चक्र सुरू झाले. हे सर्व सामान आपल्याला सायकल लाच लावता आले तर ?
सायकलचा प्रवास किती सुखाचा होईल!
या विचारातूनच तिने स्वतःसाठी तिच्या सायकल फ्रेमला फिट होईल अशी बॅग बनवली. छोटं छोटं सामान बसेल असे पाऊच सुद्धा बनवले.
तिच्या सायकल ला लावलेल्या या सर्व सुंदर सुंदर बॅग्स बघून इतर सायकलिस्ट मित्रमैत्रिणींनी आम्ही तुला ऑर्डर देतो पण आम्हालासुद्धा असेच बनवून दे असे सांगितले. तिने सुद्धा अगदी आवडीने प्रत्येकाच्या सायकलनुसार, त्यांच्या गरजेनुसार, त्यांना जे जे हवे, जसे जसे हवे त्याप्रमाणे बॅग्स आणि पाऊचेस बनवून देण्यास सुरुवात केली. काही काळातच कावेरीने बनवलेल्या बॅग्स आणि पाऊचेस आमच्या सर्व सायकलिस्ट ग्रुपमध्ये चर्चेचा विषय झाले. उत्तम क्वालिटी आणि योग्य दर यामुळे प्रत्येकाला कावेरी कडून बॅग बनवून घ्यायची होती.
यातूनच कावेरीच्या क्राफ्टी स्टीच या ब्रँडचा जन्म झाला. ज्येष्ठ नागरिकांना सायकल चालवताना त्यांच्या गरजेप्रमाणे, त्यांच्या आवडीनुसार पाऊचेस,एंड्युरेन्स रायडर्सना त्यांच्या गरजेनुसार पाऊचेस, स्त्रियांच्या वेगवेगळ्या गरजानुसार सायकल बॅग्स, लॉंग राईड करणाऱ्यांसाठी तशा प्रकारच्या बॅग्स, हे सर्व ती घरीच बनवते.
तुमच्या सायकलचा रंग, सायकलची फ्रेम साईज, सायकलचा प्रकार या सर्वांचा विचार करून तुमची नेमकी गरज लक्षात घेऊन कावेरी त्यानुसार अगदी परफेक्ट अशा सायकल बॅग - पाऊचेस बनवून देते .
स्वतः एक उत्तम सायकलिस्ट असल्यामुळे प्रत्येक बॅगला रिफ्लेक्टर असणे ,लाईट लावण्याची सोय असणे,सेफ्टी असणे वॉटरप्रूफ मटेरियल वापरणे अशा सगळ्या गोष्टींची ती स्वतः काळजी घेते. अतिशय मजबूत तरीही रिझनेबल दरात तिने सुंदर अशा वीस ते पंचवीस प्रकारच्या वेगवेगळ्या बॅग आणि पाऊचेस डिझाईन तयार केले आहेत. कावेरी हे सर्व एकटी सांभाळते. रॉ मटेरियल आणण्यापासून डिझाईन ,स्टिचिंग, प्रोडक्ट डिलिव्हरी हे सर्व ती स्वतः करते.
स्वतःच्या गरजेतून प्रयोग करून, कष्ट करून आज तिने स्वतःचा ब्रँड निर्माण केला आहे. आपल्या आवडीचे कष्टाने व्यवसायात रूपांतर करण्याची जिद्द कावेरीने दाखवली आहे.
(लेखिका सायकलिस्ट आणि युट्यूबर आहेत.)