Lokmat Sakhi >Inspirational > हुंड्याच्या पैशातून तिनं सर केले किलीमांजारो शिखर; लग्नासाठीचे दागिने विकून जमवले पैसे! पुण्याच्या तरुणीची साहसी गोष्ट!

हुंड्याच्या पैशातून तिनं सर केले किलीमांजारो शिखर; लग्नासाठीचे दागिने विकून जमवले पैसे! पुण्याच्या तरुणीची साहसी गोष्ट!

हुंडा द्यायचा, लग्नाचा खर्च म्हणून जमवलेले पैसे आणि दागिने विकून आफ्रिकेतले सर्वोच्च किलीमांजारो शिखर सर करणाऱ्या पुण्याच्या स्मिता घुगेचा जिद्दी प्रवास.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 12:42 PM2021-08-26T12:42:11+5:302021-08-26T12:46:33+5:30

हुंडा द्यायचा, लग्नाचा खर्च म्हणून जमवलेले पैसे आणि दागिने विकून आफ्रिकेतले सर्वोच्च किलीमांजारो शिखर सर करणाऱ्या पुण्याच्या स्मिता घुगेचा जिद्दी प्रवास.

Pune girl Smita Ghuge on Kilimanjaro, south africa, says it her battle against dowry , for women empowerment | हुंड्याच्या पैशातून तिनं सर केले किलीमांजारो शिखर; लग्नासाठीचे दागिने विकून जमवले पैसे! पुण्याच्या तरुणीची साहसी गोष्ट!

हुंड्याच्या पैशातून तिनं सर केले किलीमांजारो शिखर; लग्नासाठीचे दागिने विकून जमवले पैसे! पुण्याच्या तरुणीची साहसी गोष्ट!

Highlightsपहिल्याच प्रयत्नात किलीमांजारो हे शिखर सर केले, याचा मला खूप आनंद होत आहे. एवढंच सांगायचं आहे की रूढी, परंपरेपेक्षा मुलीचे कर्तृत्वही जाणून घेणे गरजेचे आहे.

दुर्गेश मोरे

आजही लेकीच्या लग्नासाठी हुंडा आणि अन्य भेटवस्तूंसाठी, थाटामाटात लग्न करून देण्यासाठी लेकीच्या वडिलांना केवढा पैसा उभारावा लागतो. प्रसंगी कर्ज काढून लेकीचं लग्न लावलं जातं. मात्र, हुंड्याची अपेक्षा आणि लग्नाचा प्रचंड खर्च एवढाच एक प्रश्न नाही. मुलगी दिसायला कशी, तिची उंची, जाड आहे की बारीक, जॉब करते की नाही, स्वयंपाक येतो की नाही, घर सांभाळून जॉब करणार का अशा अनेक प्रश्नांचा मारा होतो. नकारघंटा वाजतात आणि लग्न हा मोठाच प्रश्न होऊन बसतो. स्मितानंही हे आपल्या अवतीभोवती अनुभवलं आहे. या साऱ्या प्रश्नांना, त्रासाला कंटाळलेल्या ३१ वर्षीय स्मिताने मग लग्नासाठी म्हणा किंवा हुंड्यासाठी म्हणा जमवलेले पैसे घेतले, लग्नासाठी म्हणून केलेले दागिने विकून टाकले आणि तिनं ठरवलं.. आपण अशा उत्तुंग शिखरावर जायचं तिथून तरी आपला आवाज सगळ्यांच्या कानावर पडेल. स्मिता घुगे. आफ्रिका खंडातील सर्वात उंच आणि खडतर असे माउंट किलीमांजारो हे शिखर तिनं नुकतंच सर केलं. ती शिखरावर पोहोचली आणि त्या शिखरावरून तिनं हुंडाप्रथा विरोेधी नारे दिले. ‘से नो टू डावरी!’ फलक सोबत होताच, त्यावरही लिहिलेलं होतं, हुंड्याच्या पैशातून मी किलीमांजारो सर केले!

स्मिता म्हणते, माझ्या उंचीपेक्षाही आता माझ्या कर्तृत्वाची उंची खूप मोठी झाली आहे आणि तेच मला दाखवून द्यायचे होते.
मूळच्या वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथील असणारी स्मिता गेल्या काही वर्षांपासून पुण्यात स्थायिक आहे. वडिलांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय तर आई गृहिणी आणि एक बहीण, तिचे लग्न झाले आहे. साधारण मध्यमवर्गीय घुगे कुटुंबीय. त्यामुळे मोठ्या बहिणीचे लग्न झाल्यानंतर स्मिताचे २२ वयापासून विवाह जुळवण्यास सुरुवात झाली. त्यासाठी मुलांकडील लोक पाहण्यासाठी येऊ लागले. सुरुवातीला स्मिता यांच्या उंचीबाबत दोष काढू लागले. एमएस्सी होऊनही नोकरी का करत नाही, म्हणून डावलले जाऊ लागले, त्यानंतर नोकरी लागली. स्वत:च्या हिमतीवर स्पॅनिश भाषा शिकून एका आंतरराष्ट्रीय कंपनीत जॉबही लागला. मात्र, हे सर्व करत असताना त्यांना हुंडा प्रथेलाही सामोरे जावे लागले. उंची कमी असल्याने २० ते ५० लाखांपर्यंत हुंड्याची मागणी होऊ लागली. हुंडा देण्यास नकार दिल्यामुळे अनेक मुलांनी मला नाकारले. एखाद्या उच्चवर्णीय कुटुंबात जायचे म्हटले तर मध्यमवर्गीय कुटुंबाला हुंडा दिल्याशिवाय पर्याय नाही, हे पुन्हा एकदा पुढे आले. एकूणच कमी उंची आणि हुंडा या दोन प्रश्नांमुळेच स्मिताच्या आयुष्याला कलाटणी मिळाली आहे.
हुंडा प्रथेची समस्या भेडसावत असतानाच आजूबाजूचे लोक वारंवार लग्न कधी करणार, किंबहुना का होत नाही, अशा अनेक प्रश्नांचा डोंगर उभा करत होते. त्यातूनच एक दिवस ट्रेकिंग संदर्भात स्मिताला ३६० एक्स्प्लोरर या संस्थेचे नोटिफिकेशन मिळाले. २६ जानेवारी २०१९ ला कळसूबाई शिखर सर करताना आनंद बनसोडे यांच्या संपर्कात ती आली. एकीकडे कमी उंची आणि हुंडा देता येत नसल्याने स्मिताची कुचंबणा होत होती; पण दुसरीकडे या सर्वांवर मात करण्यासाठी आपल्याला असे काही तरी करायचे आहे की, हे सर्व त्या कर्तृत्वाच्या उंचीपुढे झाकून जाईल. यासाठी तिच्या मनात सतत वादळ घोंगावतच होते. अखेर तिने गिर्यारोहणाचा मार्ग धरला. त्यासाठी रोज सकाळी तळजाई पठारावर चालणे, झुंबा, कार्डिओ, एरोबिक्स स्मिता करू लागली. स्मिताने जानेवारी २०२१ ला कोकणकडा सर केला. त्यानंतर आफ्रिका खंडातील सर्वात उंच आणि खडतर अशा माउंट किलीमांजारो हे शिखर सर करण्याचा निर्णय घेतला.
हे शिखर सर करण्यासाठी साडेतीन लाख खर्च अपेक्षित होता; परंतु लॉकडाऊनमुळे विमा वगैरेंच्या किमती वाढल्याने पाच ते साडेपाच लाख रुपये खर्चाची तरतूद गेली. एवढे पैसे कोठून आणायचे हा प्रश्न स्मिताला पडला. मग तिने लग्नासाठी जमवलेले पैसे आणि दागिने विकून हे शिखर सर करण्याचा निर्णय घेतला. ११ ऑगस्ट २०२१ रोजी तिचा हा प्रवास सुरू झाला आहे. घनदाट जंगल, चिखलाचा रस्ता पार करत असताना क्षणात ऊन तर क्षणात पाऊस अशा वातावरणाशी जुळवून घेत स्मिता आपल्या ध्येयाकडे मार्गक्रमण करत होती. अनेक संकटे आली; पण त्यावर मात करत हे शिखर तिने सर केलेच. तेथे पोहोचल्यानंतर स्मिताने देशाचा झेंडा फडकावलाच; पण रूढी, प्रथा, परंपरेपेक्षा कर्तृत्व खूप मोठे असते हे दाखवून दिले.

स्मिता सांगते...
मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलीला किती समस्यांना सामोरे जावे लागते हे माझ्या विवाह जुळवण्याच्या प्रसंगी लक्षात आले. त्यातूनच खरं तर मला हे शिखर सर करण्याची प्रेरणा मिळाली. पहिल्याच प्रयत्नात किलीमांजारो हे शिखर सर केले, याचा मला खूप आनंद होत आहे. एवढंच सांगायचं आहे की रूढी, परंपरेपेक्षा मुलीचे कर्तृत्वही जाणून घेणे गरजेचे आहे.

Web Title: Pune girl Smita Ghuge on Kilimanjaro, south africa, says it her battle against dowry , for women empowerment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Womenमहिला