Join us  

पी.व्ही. सिंधू सांगतेय सराव आणि फिटनेसचं महत्त्व; खेळात करिअरसाठी आवश्यक ॲटिट्यूडची गोष्ट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 12:33 PM

जिंकलं ऑलिम्पिक पदक आणि झालं असं नाही, आजही दिवसाला आठ तास सराव, व्यायाम करतेय पी.व्ही. सिंधू.

ठळक मुद्देसिंधू सांगत असते..चॅम्पिअन बोलत असते.. आणि गोष्ट उलगडत असते जिंकण्याची, आणि प्रचंड मेहनतीचीही. फिटनेस, सराव आणि सातत्याची!

उमेश जाधव

पी.व्ही. सिंधू. टोक्यो ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकून भारतात परतली त्यानंतर ती नुकतीच पुण्यात आली होती. पदक जिंकल्याचा आनंद तर होताच, मात्र तिचा इथवरचा प्रवास, फिटनेस या साऱ्याविषयीही चर्चा झाली.सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता होता फिटनेसचा. आता जिंकलं पदक झालं असं नव्हतं तर ती सांगत होती, पुढच्या स्पर्धेच्या तयारीबद्दल.सिंधू सांगत होती,  आताही सुरुच आहे रोज सकाळी तीन तास कोर्टवर सराव. मग सायंकाळी तीन तास जीममध्ये व्यायाम. याला जोडून रोज दोन तास धावणं, वेट ट्रेनिंग आणि योग, मेडिटेशन हे सारं माझ्या नियमित रुटीनचा भाग आहे.’ऑलिम्पिकची तयारी करायची तर लॉकडाऊन काळात घरात बसणं शक्यच नव्हतं. मग  कोरोना संसर्ग होऊ नये म्हणून तिने आता  ‘जिम’ तयार केली. जिममधील प्रशिक्षक, फिजिओ, योग प्रशिक्षक हे सारे तिच्या फिटनेसवर लक्ष ठेवून आहे. सराव सुरुच आहे.पण फिटनेसला जोड हवी उत्तम आहाराची. अर्थात सततचा सराव, व्यायाम यांमुळे थकवा येतो. शरीराला पोषक आहारही हवाच. सिंधू सांगत होती, आई-वडील माझ्या आहाराकडे बारकाईने लक्ष देतात. जेवणाच्या वेळा  चुकू देत नाहीत. प्रशिक्षक आहाराविषयी वारंवार सूचना करतात आणि त्यानुसार मी त्यात बदल करते. तंदुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्यास खेळादरम्यान दुखापतींचा धोका अधिक असतो. त्यामुळे नियमित व्यायाम कधीही चुकवत नाही.   माझी तंदुरुस्ती व आहाराकडे लक्ष देता यावे म्हणून आई-वडिलांनी रेल्वेतील नोकरी सोडून दिली. मग प्रश्न आलाच की, खेळात करिअर करायचं तर काय?

(छायाचित्र-गुगल)

सिंधू सांगते, एखादा खेळ आवडला आणि त्यात करिअर करायचं असं ठरवलं तरी प्रत्येक पदकामागे, यशामागे अनेक वर्षांची मेहनत, सराव, सातत्य असतं. एका रात्रीत कुणीच स्टार बनू शकत नाही. कधी लवकर यश मिळते, कधी वाट पाहावी लागते. हे सारं समजून आपल्या खेळावरच फोकस करायला हवा. पालकांनीही मुलांना समजून घ्यायला हवे. मुलांनी स्वत:च्या आणि पालकांनीही मुलांच्या क्षमतांवर विश्वास ठेवायला हवा..सिंधू सांगत असते..चॅम्पिअन बोलत असते.. आणि गोष्ट उलगडत असते जिंकण्याची, आणि प्रचंड मेहनतीचीही. फिटनेस, सराव आणि सातत्याची!

(लेखक लोकमतच्या पुणे आवृत्तीत वार्ताहर आहेत.)

 

टॅग्स :पी. व्ही. सिंधूफिटनेस टिप्स