भारताचा १६ वर्षाचा बुद्धिबळपटू आणि युवा ग्रॅंडमास्टर आर. प्रज्ञानंद याची बुद्धिबळातील खेळी पाहून जगभरातील बहुतांश जणांना आश्चर्याचा धक्का बसत आहे. जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांक पटकावत त्याने मागील वर्षी बुद्धिबळाचा मास्टर असलेल्या मॅग्नस कार्लसनचा पराभव केला आणि वर्ल्ड चॅम्पियनशिप भारताकडे खेचून आणली. इतक्या लहान वयात अशी अद्भूत कामगिरी करणारा प्रज्ञानंद हा एकमेव खेळाडू असल्याने देशातच नाही तर जगात त्याची नोंद घेतली गेली. अजरबैजान येथील बाकू येथे सुरु असलेल्या विश्व कप स्पर्धेत त्याने नुकतेच सेमीफायनलमध्ये स्थान पटकावले. अर्जुन एरीगसीला हरवत त्याने हे स्थान पटकावले. सेमीफायनलमध्ये जागा पटकावल्यानंतर प्रज्ञानंद मुलाखती देत होता आणि आपल्या फॅन्सना ऑटोग्राफ देत होता. त्यावेळी बाजूला उभे राहून पाहणारी त्याची आई अतिशय भावूक झालेली दिसली. आपल्या मुलाचे हे यश पाहून या माऊलीच्या डोळ्याच्या कडा आनंदाश्रूंनी पाणावल्या. हा भावनिक क्षण छायाचित्रकारांच्या कॅमेरात कैद झाला आणि काही वेळात हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले (R Praggnanandhaa Mother Can't Control her tears after son reaches Chess World Cup semi finals Images goes Viral).
आता व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये नागलक्ष्मी आपल्या मुलाकडे अतिशय कौतुकाने डोळे भरुन पाहताना दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोत त्या एका खुर्चीत बसून पदराने आपले डोळे पुसताना दिसत आहेत. आर. प्रज्ञानंद असे नाव असलेल्या या तरुणाचा जन्म चेन्नईमध्ये झाला असून अतिशय लहानपणापासून तो बुद्धिबळ खेळत आहे. त्याची मोठी बहिण वैशाली ही देखील आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू आहे. लहानपणापासून बहिणीला खेळताना पाहून प्रज्ञानंदला आपणही बुद्धिबळ खेळावे असे वाटले आणि तो या खेळाकडे वळला. त्याचे वडील तमिळनाडू स्टेट बँकेत अधिकारी असून आई नागलक्ष्मी गृहिणी आहे. दोन मुलांना बुद्धिबळ शिकवणे परवडत नसल्याने प्रज्ञानंद याने खेळापासून लांब राहावे असे त्याच्या वडीलांचे मत होते. मात्र खेळात त्याला असलेली गती पाहता त्यांनी त्यालाही बुद्धिबळ खेळण्यास परवानगी दिली.
विश्वनाथन आनंदनंतर या स्पर्धेत सेमीफायनलपर्यंत पोहोचणारा प्रज्ञानंद हा दुसरा खेळाडू आहे. आईचे मुलावर असलेले प्रेम आणि त्याच्या यशाने सुखावून गेलेली ती माता पाहून नेटीझन्सना अतिशय आनंद झाला आहे. तर आणखी एका फोटोत आपला यशस्वी मुलगा त्याच्या फॅन्सना ऑटोग्राफ देत असताना ही माता कोपऱ्यात उभे राहून डोळे भरुन पाहत असताना दिसते. अवघ्या १७ वर्षाच्या असलेल्या प्रज्ञानंदने पुढच्या वर्षी असलेल्या कँडीडेटस इव्हेंटमध्ये स्थान मिळवले आहे. आपली आई आपली मॅच लाईव्ह पाहण्याबाबत प्रज्ञानंदने बोलताना सांगितले की, "माझ्या आईचे आता माझ्यासोबत असणे निश्चितच मला प्रेरणा देणारे आहे. ती कायमच माझा पाठिंबा बनून राहीलेली आहे. स्पर्धा हरल्यावरही ती मला शांत करण्याचा प्रयत्न करत होती. माझ्यासाठी माझी आई एक अतिशय मोठा आधारस्तंभ आहे. केवळ माझ्यासाठीच नाही तर माझ्या बहिणीसाठीही आई कायम खंबीर पाठिंबा बनून उभी असते.”