Join us  

आयुष्यात सगळं संपलं असं वाटतंय?... शून्य मिनिटात सोलो ट्रिपला निघा!

By नम्रता फडणीस | Published: September 08, 2022 6:45 PM

Rakhi Kulkarni Solo Traveler Inspirational Story : तुम्ही बाहेर निघा आणि बघा आयुष्य किती भारी आहे. तुमचा दृष्टिकोन बदलून बघा.

ठळक मुद्देप्रत्येकांनं स्वत:चा शोध घेण्यासाठी सोलो ट्रिप केलीच पाहिजे. संपूर्ण प्रवासात भेटलेली प्रत्येक व्यक्ती मला समृद्ध करीत आली आहे

नम्रता फडणीस 

पहिल्यांदा पाँडिचेरी येथे मी फिरायला गेले होते. तिथे भेटलेल्या साठ वर्षांच्या रिटा आजींनी माझे पूर्ण आयुष्यच बदलवून टाकलं. आयुष्यात घडून येणाऱ्या या अपघाती भेटी मला फार महत्त्वाच्या वाटतात. त्या आजींचे, वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी आपला देश सोडून तेथे येणे आणि एका अनोळखी देशात आपले उर्वरित आयुष्य आनंदाने घालवणे ही गोष्ट फार भन्नाट वाटली. प्रवाहासोबत स्वत:ला वाहून देणं आणि आपला प्रवास चालू ठेवणं... अशा शब्दांत ‘ट्रॅव्हलर’ राखी कुलकर्णीने ‘स्व’चा शोध घेणारा भन्नाट प्रवास उलगडला.

(Image : Facebook)

राखी म्हणाली, मी देशभर प्रवास केल्यानंतर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की, ट्रॅव्हलर मंडळी सांगतात ते खरंच आहे, प्रत्येकाने आपला देश संपूर्ण एकदातरी बघायलाच हवा. नोकरी करतानाच माझी ही भटकंती सुरू होती. मी ट्रिपवरून पुन्हा कामावर आले तेव्हा माझी काम करण्याची पद्धत बदलली. अनोळखी लोकांसोबत कसं जुळवून घ्यायचं यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे मला गवसली होती. आता मी ‘प्रॉब्लेम सॉल्वर’ झाले होते. माझ्यातला हा बदल मला फार आनंददायी होता.

आपण घरात बसून स्वत:ला बंधनात अडकवून ठेवतो. तुम्ही बाहेर निघा आणि बघा आयुष्य किती भारी आहे. तुमचा दृष्टिकोन बदलून बघा. घरच्यांना बोलून दाखवा, त्यांना विश्वासात घ्या. तुमचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून जाईल. स्त्री म्हणून हे फार महत्त्वाचे वाटते की खऱ्या अर्थी स्वातंत्र्य म्हणजे नेमके काय? आपण घेतलेल्या प्रत्येक निर्णयाचा चांगला आणि वाईट परिणाम पचविण्याची ताकद तुमच्यात असली पाहिजे. सोलो ट्रिपच्या अनेक फायद्यांपैकी सर्वांत महत्त्वाचा फायदा म्हणजे तुम्हाला तुमचे खरे सामर्थ्य कळते. इतर ट्रिपमध्ये कोणीना कोणी आपल्या सोबत असल्यामुळे आपल्याला त्याची फार जाणीव होत नाही, असेही राखी म्हणाली.

(Image : Facebook)

...आणि मी रडायला लागले             मी अरुणाचलमध्ये असताना योमच्या नावाच्या गावात जात असताना मला आलेला अनुभव फार मजेशीर आहे. तेथील बसवाल्याने मला योमचा गाव सांगून रस्त्याच्या मध्येच उतरवले. चार-पाच तास झाले तिथे एकही वाहन फिरकले नाही. संपूर्ण निर्जन स्थळ. माझ्या मर्यादा संपल्या आणि मी रडायला लागले. मग, काही वेळानंतर मी चालायला लागले. पंधरा मिनिटांच्या अंतरावर गाव दिसले अन् माझ्या जीवात जीव आला. तेथील लोक फार भारी होते, त्यांनी माझे छान असे स्वागत केले, खाऊपिऊ घातले. त्यावेळी मला जाणवले की तुमच्या मर्यादा तोडून तुम्ही पुढे गेले पाहिजे. या संपूर्ण प्रवासात भेटलेली प्रत्येक व्यक्ती मला समृद्ध करीत आली आहे, याकडे तिने लक्ष वेधले.

स्वत:चा शोध घेण्यासाठी एकटीने प्रवास करा, राखी सांगते..

एका क्लिकवर तुम्हाला सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत. तुमचं बुकिंग, राहणं, खाणं-पिणं अगदी सगळंच. सोलो ट्रिपसाठी सर्वांत महत्त्वाचं असतं, तुमचं फायनान्शिअल प्लॅनिंग. आपापल्या बजेटनुसार आपण फिरू शकतो. फिरणं कमी आणि जास्त पैशातही होतं. पण, प्रत्येकांनं स्वत:चा शोध घेण्यासाठी सोलो ट्रिप केलीच पाहिजे. यातून आपण खूप नवीन गोष्टी शिकतो. स्वत:ची जबाबदारी घ्यायला शिकतो. 

टॅग्स :प्रेरणादायक गोष्टीट्रॅव्हल टिप्स