Join us  

प्रसूतीच्या आदल्या दिवशी तरुणीने दिली स्पर्धा परीक्षा, नवऱ्याने केले कौतुक.. सलाम जिद्दीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2023 6:13 PM

Rhittwika Baruah 9 Months Pregnant Women Who Attend Assam Public Service Commission (APSC) Exam : जिद्द असावी तर अशी...बाळंतपणाचे कौतुक न करता दिली राज्य सेवा परीक्षा

गर्भधारणा आणि बाळंतपण म्हणजे महिलांसाठी शारीरिक, मानसिक बदलाचा काळ. यातही शेवटचा महिना आणि शेवटचे काही दिवस तर इतके अवघडल्यासारखे होते की उठलेले बसता येत नाही आणि बसलेले झोपता येत नाही. ९ महिने एका लहानग्या जीवाला वाढवणे ही महिलेसाठी सर्वार्थाने बरेच बदल घडवणारी गोष्ट असते. या शेवटच्या काळात महिला घरातल्या गोष्टी आणि आराम करण्यालाच प्राधान्य देतात. पण एका तरुणीने या काळातही भरपूर अभ्यास करत स्पर्धा परीक्षा दिली. विशेष म्हणजे बाळंतपणाची तारीख अक्षरश: दुसऱ्या दिवसावर आलेली असताना या तरुणीने अतिशय जिद्दीने ही परीक्षा दिली. रुत्विका बरुआ असे या तरुणीचे नाव असून ती आसामची आहे (Rhittwika Baruah 9 Months Pregnant Women Who Attend Assam Public Service Commission (APSC) Exam). 

बाळंतपणाची तारीख जवळ आलेली असताना महिलांना डॉक्टरकडून आणि कुटुंबियांकडून जास्त प्रमाणात काळजी घेण्यास सांगितले जाते. याचे सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे कोणत्याही वेळेला कळा सुरू होण्याची शक्यता असते. मात्र अशा परिस्थितीतही अभ्यास करुन रुत्विकाने आसाम पब्लिक सर्व्हिस कमिशनची (Assam Public Service Commission (APSC)) परीक्षा दिली. ही परीक्षा राज्य स्तरावरील सर्वात अवघड परीक्षा समजली जाते. मात्र तरीही दुसऱ्यांदा आई होत असलेल्या रुत्विकाने ही परीक्षा २६ मार्च २०२३ रोजी दिली. 

परीक्षा दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी या मातेने गोंडस मुलीला जन्म दिला. रुत्विकाचा पती ज्योती राभा याने फेसबुकवरुन आपल्याला मुलगी झाल्याची पोस्ट करत याबाबत माहिती दिली. आता या परीक्षेचा निकाल जो लागायचा तो लागेल पण आपण प्रयत्नच केला नाही असे व्हायला नको. यासाठी नवव्या महिन्यात अवघडलेली असताना ही परीक्षा देणारी रुत्विका खरंच जिद्दीची आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही. राभा यांच्या पोस्टला सोशल मीडियावर बरेच लाईक्स मिळाले असून अनेकांनी रुत्विका यांच्या जिद्दीला सलाम केला आहे. आसाममधील अनेक जिल्ह्यांमध्ये ही परीक्षा अतिशय शांततेत पार पडली. 

टॅग्स :प्रेरणादायक गोष्टी