Join us  

प्लॅस्टिकच्या कचऱ्याने वैतागलेल्या आसामच्या रुपज्योतीने शोधला भन्नाट उपाय; कचऱ्यापासून तिनं काय काय बनवलं पाहा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2022 5:53 PM

प्लॅस्टिकच्या कचऱ्याने वाढणाऱ्या प्रदूषणाचा (plastic wastage) विचार करुन कोरडा सुस्कारा सोडणारे अनेकजण आहेत पण पर्यावरणाचा विचार करुन अस्वस्थ झालेल्या रुपज्योती साइकिया गोगोई (rupjyoti gogoi) या मात्र त्या अनेकांपेक्षा वेगळ्या आहेत. त्यांनी प्लॅस्टिकच्या कचऱ्याचा  कलात्मक पुर्नवापर करण्याचा पर्याय शोधला आहे.

ठळक मुद्देरुपज्योती गोगोई यांनी प्लॅस्टिकच्या कचऱ्याचा कलात्मक पुर्नवापर करण्याचं व्यावसायिक प्रशिक्षण घेतलं नाही, त्यांना सूचेल तसं त्यांनी त्यात काम केलं.आसाममधील 35 गावातील 2300 महिलांना रुपज्योती यांनी प्लॅस्टिकच्या कचऱ्याचा कलात्मक पुर्नवापराचं प्रशिक्षण देऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम केलं आहे. 

आपल्या आजूबाजूला प्लॅस्टिकच्या कचऱ्याचा ढीग वाढत चालला आहे. आपल्या जगण्याची प्रतिक्रियात्मक बाब म्हणून हा प्लॅस्टिकचा (plastic wastage)  कचरा रोजच्या रोज वाढतच आहे. प्लॅस्टिकच्या वाईट परिणामांबद्दल माहीती सगळ्यांनाच असूनही प्लॅस्टिक आपल्या जगण्यातून वजा करणं अवघड तर झाल आहेच शिवाय वापरलेल्या प्लॅस्टिकच्या कचऱ्याचा प्रश्नही कठीण झालाय. प्लॅस्टिकच्या कचऱ्याने वाढणाऱ्या प्रदूषणाचा विचार करुन कोरडा सुस्कारा सोडणारे अनेकजण आहेत पण प्लॅस्टिकच्या कचऱ्याने धोक्यात आलेल्या पर्यावरणाचा विचार करुन अस्वस्थ झालेल्या  रुपज्योती साइकिया गोगोई  (rupjyoti saikia gogoi) या मात्र त्या अनेकांपेक्षा वेगळ्या आहेत. रुपज्योती साइकिया गोगोई यांचा प्लॅॅस्टिकच्या कचऱ्याचा कलात्मक (plastic reuse into handloom)  उपयोग करण्याच्या प्रयत्नांची माहिती 'हर जिंदगी' या इंग्रजी ऑनलाइन पोर्टलने प्रसिध्द केली आहे. 

 

Image: Google

रुपज्योती साइकिया गोगोई या आसाम येथील काझिरंगा येथे राहातात. काझिरंगा अभयारण्य हे भारतातील नव्हे तर जगातील महत्वाचं पर्यटन स्थळ. भारतातील सर्व पर्यटन स्थळांच्या व्यथेसारखीच काझिरंगाचीही व्यथा. येथेही प्लॅस्टिकचा कचरा अमाप. पर्यावरणाची काळजी असलेल्या रुपज्योती या प्लॅस्टिकचा कचरा बघून अस्वस्थ व्हायच्या. अंगात मुळातच कलात्मकता असलेल्या रुपज्योति यांना प्लॅस्टिकच्या कचऱ्याचा कलात्मक पुर्नउपयोग करण्याचा पर्याय सूचला. त्यांनी कचऱ्यातील प्लॅस्टिक विणून पायपोसणे, टेबलमॅटस, हॅण्डबॅग्ज आणि वस्तू तयार केल्या. या वस्तू देखण्या तर झाल्याच पण उपयोगाच्याही ठरल्या. त्यामुळे आत्मविश्वास वाढलेल्या रुपज्योति यांनी आपल्यासोबत आणखी महिलांना घेऊन हा प्रयोग 'व्हिलेज विव्हज' नावाने मोठ्या स्तरावर सुरु केला.

Image: Google

रुपज्योती आणि त्यांच्यासोबतच्या इतर महिला कचऱ्यातून प्लॅस्टिक गोळा करुन आणायच्या. आणल्यानंतर ते धुवून स्वच्छ करायच्या. धुतलेलं प्लॅस्टिक वाळवायच्या. मग कात्रीच्या सहाय्याने त्याच्या उभ्या पट्ट्या कापून त्या एकात एक विणून त्याचा लांब धागा करायच्या. हे प्लॅस्टिकचे धागे आणि सूती धागे एकत्र विणून त्यांनी पायपोसणे, टेबलमॅटस, हॅण्डबॅग्ज तयार केल्या. लोकांना या वस्तू आवडू लागल्या. प्लॅस्टिकचा असा कलात्मक वापर केलेला बघून लोकं त्यांचं कौतुक करु लागले. या वस्तू सर्वांना पाहायला आणि विकत घ्यायला उपलब्ध व्हाव्या यासाठी 2012 मध्ये रुपज्योति यांनी 'काझिरंगा हाट' नावाचं प्रदर्शन सुरु केलं. काझिरंगा येथे पर्यटनासाठी येणारे पर्यटक काझिरंगा हाटला अवश्य भेट देवून प्लॅस्टिकचा पुर्नवापर करुन तयार केलेल्या सुंदर सुंदर वस्तू घेऊन जातात. 

Image: Google

स्वत: रुपज्योती गोगोई यांनी अशा प्रकार प्लॅस्टिकच्या कलात्मक पुर्नवापराचं  व्यावसायिक प्रशिक्षण वगैरे घेतलं नाही. त्यांना जसं सूचेल तसं त्यांनी ते केलं. पण याचा आधार घेऊन गरजू महिलांना सबळ आणि सक्षम करण्यासाठी त्यांनी आसाममधील 35 गावातील 2300 महिलांना प्लॅस्टिकच्या कलात्मक पुर्नवापराचं प्रशिक्षण दिलं. बांबू विणून वस्तू तयार करण्याची कला आसामी महिलांना अवगत आहे. पण प्लॅस्टिक विणण हे त्यांच्यासाठी वेगळं आणि जरा अवघड होतं. पण रुपज्योति यांनी त्यांना ही कला शिकवली. रुपज्योति यांच्याकडून प्रशिक्षण घेतलेल्या अनेक महिलांनी स्वत:चा व्यवसाय सुरु केला तर अनेक महिला त्या प्लॅस्टिकचा पुर्नवापर करुन तयार करत असलेल्या वस्तू प्रदर्शनासाठी आणि विक्रीसाठी रुपज्योति यांनी सुरु केलेल्या काझिरंगा हाटला पाठवतात. पर्यावरणाच्या संरक्षणाला आव्हानात्मक बनलेल्या प्लॅस्टिकच्या कचऱ्यावर रुपज्योती आणि त्यांच्या सोबतच्या महिलांनी शोधलेला कलात्मक पर्याय प्रेरणा देणारा तर आहेच पण आज आसाममधील अनेक गरजू महिलांच्या उपजिविकेचं साधन झाला आहे. 

टॅग्स :प्रेरणादायक गोष्टीमहिला