Join us  

जिद्दीला सलाम; मुंबईत फुलं विकून, वस्तीत राहून तिने मिळवला अमेरिकेतील विद्यापीठात पीएचडीसाठी प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2022 3:09 PM

शिक्षणामुळे आपलं आयुष्य बदलू शकतं यावर तिच्या वडिलांचा आणि तिचा विश्वास असल्याने सरितासारखी एक अतिशय सामान्य घरातील मुलगी परदेशात उच्चशिक्षण घेत आहे.

ठळक मुद्देशिक्षणामुळे आपलं आयुष्य बदलू शकतं यावर तिच्या वडिलांचा आणि तिचा विश्वास असल्याने तिने अभ्यास करुन उच्चशिक्षण घेण्याच निर्णय घेतला सरिताला लहानपणी वर्णभेदाचा सामना करावा लागला. मात्र, वडिलांनी कायम दिलेल्या खंबीर आधारामुळं सरिता डगमगली नाही.

तुमच्याकडे शिकण्याची जिद्द आणि चिकाटी असेल तर तुम्हाला तुमच्या ध्येयापासून कोणीही विचलीत करु शकत नाही. मात्र त्यासाठी तुमच्याकडे कष्ट करण्याची तयारी असायला हवी. सगळ्या सुखसुविधा असूनही लहानसहान गोष्टींवरुन सतत तक्रारी करणारे काहीजण आपल्या आजुबाजूला असतातच. पण प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आपले वेगळेपण दाखवून देणारे आपला ठसा उमटवतात. तर ही गोष्ट आहे मुंबईच्या वस्तीत राहून फुलं विकून शिक्षण घेणाऱ्या सरिता माळी (Sarita Mali) या जिद्दी मुलीची. मुंबईच्या ट्राफिक सिग्नलवर फुल विकून पोट भरणाऱ्या सरिताचा दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठ ते अमेरिकेत पीएचडीसाठी प्रवेश मिळवणे हा प्रवास नक्कीच सोपा नसणार. पण आपल्या स्वप्नांना गवसणी घालण्यासाठी तिने खडतर मार्गातून स्वत:ची वाट निवडली आणि आज ती पीएचडी करण्यासाठी अमेरिकेत जात आहे. 

(Image : Google)

सरिताचे वडिल मुंबईच्या ट्रॅफिक सिग्नलवर फुलं विकायचे. सरिताही आपल्या वडिलांबरोबर शाळा सुटल्यावर फुलं विकण्यासाठी जायची. बराच वेळ गाड्यांच्या मागे धावून फुलं विकली गेली तर दिवसाकाठी काहीतरी हाती यायचे. पण कुटुंब चालवायचे तर वडिलांना मदत करणे आवश्यक आहे असे वाटल्याने सरिता हे काम आनंदाने करायची. हे करत असताना तिने अभ्यासाकडे अजिबात दुर्लक्ष होऊ दिले नाही. वाढत्या वयात घाटकोपरमधील वस्तीत राहत असताना इतर अनेक गोष्टी अभ्यासापासून दूर नेण्यासाठी समोर असतानाही तिने आपल्या अभ्यासाकडे कायम लक्ष दिले. परिस्थितीची जाण माणसाला जगायला शिकवते म्हणतात तेच खरे. विशेष म्हणजे तिचे आभ्यासावर असलेले प्रेम आणि त्यासाठी ती घेत असलेले कष्ट पाहून तिची मोठी बहिण आणि दोन भाऊ यांनीही अभ्यासाकडे विशेष लक्ष द्यायला सुरूवात केली. 

पुरेसे पैसे नसल्याने कुटुंब चालविताना वडिलांची होत असलेली तारांबळ सरिता स्वत:च्या डोळ्याने पाहत होती. त्यामुळेच तिने शिकून मोठे होण्याचा निर्णय घेतला. दहावीनंतर सरिताने घरातच ट्युशन घेण्यास सुरुवात केली. आपल्या वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी ती मेहनत घेत होती. ट्युशनमधून येणारे पैसे साठवून तिने के.जे सोमय्या महाविद्यालयात प्रवेश घेतला. १२ वीच्या सुट्टीत आजीकडे गेलेली असताना तिचा भाऊ जेएनयूच्या परीक्षेची तयारी करत होता. त्यावेळी आपणही ते करावे असे वाटल्याने बी.एच्या पहिल्या वर्षात असतानाच तिने जेएनयूच्या प्रवेश परीक्षेची तयारी सुरू केली. एम.ए करण्यासाठी ओबीसी प्रवर्गातील शेवटच्या जागेसाठी सरिताला जेएनयूमध्ये प्रवेश मिळाला. त्यानंतर तिच्या स्वप्नांना खऱ्या अर्थाने दिशा मिळाली. जेएनयूमध्ये जाईपर्यंत आपण आपल्या कौटुंबिक व्यवसायाला हातभार लावत असल्याचे सरिता सांगते. सणावारांच्या काळात हार आणि फुलांना मोठी मागणी असायची, तेव्हा आम्ही सगळेच कित्येक तास हे काम करायचो असे सरिता सांगते.  

मात्र जेएनयूमध्ये प्रवेश मिळाल्यानंतर सरिताचे आयुष्य बदलले. याठिकाणी भेटलेले प्राध्यापक, मित्रमंडळी यांच्या पाठिंब्यामुळे आपण हिंदी साहित्यात एम.ए, एम.फिल आणि पीएचडी पर्यंतचे शिक्षण पूर्ण करु शकल्याचे ती म्हणते. यानंतर आपल्य़ाला अमेरिकेतील दोन विद्यापीठात प्रवेश मिळत होता मात्र आपण त्यातील कॅलिफॉर्निया विद्यापिठाची निवड केली असून त्यांनी माझी मेरिट व शैक्षणिक पात्रता पाहून अमेरिकेच्या प्रतिष्ठित फेलोशिपमधील एक असलेली चान्सलर फेलोशिप दिली असल्याचे सरिता सांगते. याठिकाणी पीएचडीचे शिक्षण घेण्याबरोबरच शिकवण्याचे कामही सरिता करणार आहे. आपल्या फेसबुक पोस्टद्वारे सरिताने यासंबंधी माहिती दिली आहे. इतकेच नाही तर सरिताला लहानपणी वर्णभेदाचा सामना करावा लागला. मात्र, वडिलांनी कायम दिलेल्या खंबीर आधारामुळं सरिता डगमगली नाही. शिक्षणामुळे आपलं आयुष्य बदलू शकतं यावर तिच्या वडिलांचा आणि तिचा विश्वास असल्याने तिने अभ्यास करुन उच्चशिक्षण घेण्याच निर्णय घेतला आणि आज इतका मोठा टप्पा यशस्वीपणे पार केला. 

टॅग्स :प्रेरणादायक गोष्टीशिक्षण