Lokmat Sakhi >Inspirational > वस्तीतल्या कामाला सलाम! - भेटा फोर्ब्जच्या शक्तिशाली महिलांच्या यादीत स्थान मिळवणाऱ्या पुण्याच्या प्रतिमा जोशीना

वस्तीतल्या कामाला सलाम! - भेटा फोर्ब्जच्या शक्तिशाली महिलांच्या यादीत स्थान मिळवणाऱ्या पुण्याच्या प्रतिमा जोशीना

२५ हजार शौचालये बांधण्याचा टप्पा ते इतर अनेक विषयांमध्ये झोकून देऊन काम करण्याचा जिद्दी प्रवास...

By सायली जोशी | Published: December 26, 2021 12:21 PM2021-12-26T12:21:12+5:302021-12-26T13:31:25+5:30

२५ हजार शौचालये बांधण्याचा टप्पा ते इतर अनेक विषयांमध्ये झोकून देऊन काम करण्याचा जिद्दी प्रवास...

Salute to the work in the neighborhood! - Meet the image of Pune's Joshina who got a place in the list of powerful women of Forbes | वस्तीतल्या कामाला सलाम! - भेटा फोर्ब्जच्या शक्तिशाली महिलांच्या यादीत स्थान मिळवणाऱ्या पुण्याच्या प्रतिमा जोशीना

वस्तीतल्या कामाला सलाम! - भेटा फोर्ब्जच्या शक्तिशाली महिलांच्या यादीत स्थान मिळवणाऱ्या पुण्याच्या प्रतिमा जोशीना

Highlightsकचरा प्रश्नापासून ते महिला आरोग्याच्या प्रश्नांपर्यंत काम करणाऱ्या महिलेची गोष्ट काम सुरू करणे एकवेळ सोपे पण इतके वर्ष सतत पाठपुरावा करुन त्यात जीव ओतणे वाटते तितके सोपे नक्कीच नाही

सायली जोशी-पटवर्धन 

वस्ती म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं ते चित्र म्हणजे जागा मिळेल तिथे उभी राहीलेली घरं, नाले आणि अस्वच्छ सार्वजनिक शौचालये. अशा ठिकाणी जायला सामान्य व्यक्ती १० वेळा विचार करेल, पण प्रतिमा जोशी या पेशाने आर्कीटेक्ट असलेल्या पुण्यातील महिलेने मात्र कशाचाही विचार न करता या वस्त्यांचे रुप पालटून टाकले. वस्त्यांमध्ये जाऊन त्या जास्तीत जास्त स्वच्छ कशा होतील, याठिकाणी शौचालयांची व्यवस्था कशी करता येईल, प्रत्येक घराची नोंद कशी होईल आणि येथील लोकांचे आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने त्यांनी ध्यास घेतला आणि गेली जवळपास ३० वर्षे त्यांनी या कामात स्वत:ला अक्षरश: झोकून दिले. कोणतेही काम सुरू करणे एकवेळ सोपे आहे, पण इतके वर्ष सातत्याने त्याच्या मागे लागून त्यात जीव ओतणे वाटते तितके नक्कीच सोपे नाही. त्यांच्या याच जिद्दीची आणि कामाची दखल फोर्ब्जने घेतली असून शक्तीशाली महिलांच्या यादीत त्यांना मानाचे स्थान दिले आहे. त्यानिमित्ताने लोकमत सखीने प्रतिमा जोशी (Pratima Joshi) यांच्याशी साधलेला संवाद...

(Image : Google)
(Image : Google)

वस्तीतील कामाला सुरुवात कशी झाली ? 

१९९३ मध्ये काही आर्कीटेक्ट मित्रमैत्रीणींनी मिळून शेल्टर (Shelter) नावाच्या संस्थेची स्थापना केली. वस्तीतील लोकांचे जीवनमान उंचवावे यादृष्टीने प्रयत्न करायला हवेत हा मूळ विचार घेऊन या लोकांपर्यंत मुलभूत सुविधा पोहोचाव्यात हा यामागील मुख्य उद्देश होता. वीज, पाणी, शौचालये आणि नंतरच्या टप्प्यात गृहप्रकल्प त्यांच्यापर्यंत पोहोचले पाहीजेत अशी साधारण कामाची रुपरेषा आम्ही आखली होती. त्यादृष्टीने आम्ही पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथील वस्त्यांचा डेटा जमा करायला सुरुवात केली. 

प्रत्यक्ष काम सुरू केल्यावर कोणत्या गोष्टींची अडचण जाणवली? 

कामाला सुरुवात केल्यानंतर सर्वात मोठी अडचण आली ती म्हणजे झोपडपट्टी किंवा वस्त्यांचा कोणताच डेटा आपल्याकडे नव्हता. महापालिकेसारख्या यंत्रणांकडेही हा डेटा त्यावेळी नव्हता, त्यामुळे या लोकांपर्यंत नेमक्या कोणत्या सुविधा पोहोचवाला पाहीजे हे त्यांनाही समजत नव्हते. त्यामुळे डेटा गोळा करण्यावर भर द्यायचा असे ठरवून आम्ही कामाला सुरुवात केली. GI (Geogrphical Information) तंत्रज्ञानाचा वापर करुन वस्त्यांमधील घरांचा डेटा एकत्रित करण्याच्या कामाला १९९९ मध्ये सुरुवात झाली. तेव्हा एका वस्तीपासून सुरू झालेला हा प्रवास विविध शहरांतील अनेक वस्त्यांपर्यंत येऊन ठेपला आहे. आता पुणे, पिंपरी-चिंचवडबरोबरच कोल्हापूर, ठाणे, नवी मुंबई, पनवेल याठिकाणचा डेटा गोळा करायला सुरुवात केली. 

(Image : Google)
(Image : Google)

शौचालय विषयांत काम करायला हवे हे कधी आणि कसे लक्षात आले?  

डेटा गोळा केल्यानंतर याठिकाणी मैलावाहिन्या आहेत का, पाण्याची सुविधा, सार्वजनिक शौचालयांची काय अवस्था आहे, घरांची काय अवस्था आहे याबाबत माहिती गोळा करायला सुरुवात केली. सुरुवातीच्या टप्प्यात डेटा योग्य पद्धतीने गोळा केल्यामुळे वस्त्यांमध्ये पाणी आणि वीजेपेक्षाही शौचालयांचा अभाव असल्याचे आमच्या लक्षात आले. एकूण वस्तीत केवळ २६ ते २७ टक्के लोकांकडे शौचालये होती असे लक्षात आले. इतर सगळे जण सार्वजनिक शौचालयांचा वापर करत होते. पिंपरी चिंचवडमधील अवस्था तर आणखीनच गंभीर होती, याठिकाणी केवळ ९ ट्क्के लोकांच्या घरात शौचालये होती. सार्वजनिक शौचालयांची अवस्था अतिशय वाईट होती. नाहीतर इतर लोक उघड्यावर बसायचे, त्यामुळे वस्त्यांमधील अस्वच्छतेत आणखी भर पडत होती. 

एक घर एक शौचालय या प्रकल्पाबद्दल काय सांगाल? 

वस्त्यांमधून फीरत असताना शौचालयांचा प्रश्न सर्वात महत्त्वाचा आहे हे लक्षात आल्यावर ‘एक घर, एक शौचालय’ हा प्रकल्प आम्ही हाती घेतला. येथील लोकांना स्वच्छता, शौचालयांची आवश्यकता, आरोग्य याविषयी प्रबोधन करायला सुरुवात केली. सुरुवातीला त्यांना एकत्र करुन काही खेळ घेणे, त्यांच्याशी गप्पा मारणे असे उपक्रम राबवले आणि त्यानंतर हळूहळू प्रबोधन करायला सुरुवात केली. त्यामुळे या लोकांनाही स्वच्छता आणि घरात शौचालय असण्याची आवश्यकता लक्षात आली. येथील लोकांना एकत्र करणे आणि त्यांना विविध गोष्टी पटवून देणे हा आमच्या कामाचा एक मोठा पाया होता. सीएसआर अॅक्टीव्हीटीजमुळे आम्हाला मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला. तसेच स्वच्छ भारत अभियानामुळे या प्रश्नाला गती मिळाली आणि हे काम आम्ही वेगाने करु शकलो. प्रत्येक शहरामध्ये त्यांना या गोष्टीची दखल घ्यावी लागली. मैलावाहिन्या घालण्यासाठी आम्हाला डेटाचा खूप चांगला उपयोग झाला. घरात शौचालय बांधण्यासाठी ज्या सामानाची आवश्यकता होती ते सामान आम्ही घरपोच त्यांना मिळेल अशी व्यवस्था केली. पुढे ते बांधण्याचे काम लोकांनी स्वखर्चाने केले. त्यामुळे लोकांचा अर्थिक सहभाग होता. 

वस्त्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या गृहप्रकल्पांबद्दल थोडक्यात काय सांगाल? 

पुण्यात दोन ठिकाणी तर सांगली आणि मिरज याठिकाणी गृहप्रकल्प राबवला आहे. आता कोल्हापूरच्या वस्तीचे पुर्नवसन प्रकल्पाचे काम सुरू आहे. सुरुवातीला दत्तवाडी येथे ९६-९७ मध्ये पहिला प्रकल्प राबवला होता, त्यावेळी हडकोतून या लोकांना कर्ज मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न केले होते. नंतर पुण्यातील कामगार पुतळा येथील वस्तीचे २००२-०३ या काळात हडपसर भागात स्थलांतर केले. ही वस्ती नेहमी पुराखाली जात असल्याने जवळपास १७५ कुटुंबांचे स्थलांतर करण्याचे ठरवले. लोकसहभागातून हे काम पुढे नेले. महापालिकांच्या जागांतून जागा निवडणे, डिझायनिंग करणे, देखरेख करणे अशी कामे येथील लोकांनी केली. वाल्मिकी आंबेडकर योजनेंतर्गत या लोकांना घरांसाठी निधीही मिळाला. तर सांगली येथे २०११ ते २०१६ या काळात जवळपास १४०० घरांचा प्रकल्प उभा केला. या प्रकल्पाला केंद्र सरकारकडूनही अतिशय उत्तम दाद मिळाली होती. या कामातून आम्हाला खऱ्या अर्थाने समाधान मिळाले. वस्तीमध्ये राहणाऱ्या लोकांना त्यांच्या वस्तीपासून खूप दूर नेऊन उपयोग नसतो कारण त्यांचे रोजचे काम, शाळा, महाविद्यालये या गोष्टी वस्तीच्या जवळ असल्याने त्यांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होऊन चालणार नसते. अशा सगळ्या गोष्टींचा विचार करुन गोष्टी ठरवाव्या लागतात. 

(Image : Google)
(Image : Google)

मॅपिंग आणि डेटा कलेक्शन हा तुमच्या कामाचा पाया होता, हे काम कसे केले? त्याबद्दल थोडक्यात सांगाल का? 

आर्कीटेक्ट असल्यामुळे प्रत्येक गोष्ट खूप बारकाईने पाहायची सवय असते. नुसत्या आकडेवारीवर आम्ही अवलंबून राहात नाही. कोणताही प्रकल्प करताना नकाशा उतरवणे हेच मूळ काम असल्याने मॅपिंगचे काम करणे आम्हाला म्हणावे तितके अवघड नव्हते. पण यासाठी डेटाची आवश्यकता होतीच आणि तो डेटा गोळाा करण्याबाबत आमच्यातील कोणालाच अजिबात माहिती नव्हती. मात्र अगदी बेसिकपासून सुरुवात करुन माहिती घेत, प्रयोग करत आम्ही डेटाच्या कामाला सुरूवात केली. GI तंत्रज्ञान तर त्यावेळी सगळ्यांसाठीच खूप नवीन होते, पण त्यावर बरीच मेहनत घेऊन ते सगळे शिकलो आणि त्याचा वापर केला. २००५ मध्ये गुगल अर्थ लॉँच झाल्यावर त्याच्या मदतीने काम सुरू केले. पण सुरुवातीच्या टप्प्यात स्मार्टफोनही नव्हते, इतकेच काय महापालिकेतसुद्धा त्याकाळी एकच कॉम्प्युटर होता. लोकांना या कोणत्याच गोष्टीबाबत माहित नसल्याने आम्हाला सुरुवातीच्या टप्प्यात बराच विरोधही झाला. पण त्यातही आम्ही जिद्दीने काम पुढे नेत राहीलो. मुख्यत: डेटा गोळा करणे हे आमचे काम नव्हते तर त्या डेटाचा वापर करुन प्रत्यक्ष काम करणे गरजेचे होते. पुण्यापासून सुरुवात केली आणि आता बऱ्याच शहरांतील वस्त्यांपर्यंत आपण पोहचू शकलो आहोत. अशाप्रकारच्या कामासाठी डेटा किती आणि कसा महत्त्वाचा असतो हे आम्ही महापालिकांना पटवून दिले आणि त्या पद्धतीने काम करत गेलो. 

वस्ती आणि कचरा हे समीकरण असल्यासारखे आहे, त्याविषयातील कामाचे नियोजन कसे होते? 

कचऱ्याबाबत आम्ही वस्त्यांमध्ये जागृतीचे काम केले. साधारणपणे वस्त्यांमध्ये कचरा गटारमध्ये टाकला जातो. त्यामुळे याठिकाणी तुंबते आणि ते खराब पाणी सगळे बाहेर यायला लागते आणि घाणीचे साम्राज्य होते. आम्ही लोकांना एकत्र करुन याबाबत वारंवार समजावून सांगितले. घरात शौचालये बांधली आणि त्यातच कचरा अडकला तर त्याचा तुम्हाला कसा त्रास होईल हे येथील लोकांना वारंवार समजावून सांगितले. कचऱ्याचे वर्गीकरण कसे करायचे, ओल्या कचऱ्याचे खत कसे तयार करायचे, उघड्यावर कचरा टाकणारे, घंटागाडीमध्ये कचरा टाकणारे असा डेटा महापालिकेला दिला. येत्या काळात वस्तीमधील कचऱ्याचे योग्य पद्धतीने व्यवसथापन करायचे असेल तर या डेटाचा खूप चांगल्या पद्धतीने उपयोग होईल. 

वस्तीतील घराला लोकेशन आयडी दिला ते कसे? 

आपण राहतो त्या घराला किंवा इमारतीला ज्याप्रमाणे एक क्रमांक असतो त्याचप्रमाणे वस्तीतील घरालाही एक लोकेशन आयडी असावा यादृष्टीने आम्ही काम केले. हा आयडी तुम्ही गुगल मॅपवर टाकलात तर तुम्हाला वस्तीतील त्या नेमक्या घरापर्यंत पोहोचणे शक्य होईल. त्यामुळे वस्तीतील प्रत्येक घर आता गुगलच्या साह्याने लोकेट झाले आहे. अशाप्रकारचे काम याआधी केलेले नव्हते. याचा सर्वात जास्त उपयोग कोविडच्या काळात झाला. कारण त्यामुळे कोविड झालेले रुग्ण शोधणे, त्यांना औषधोपचार करणे, लसीकरण या सगळ्या गोष्टींसाठी प्रत्येक घराचा लोकेशन आयडी असणे अतिशय उपयुक्त ठरले. एखाद्या कुटुंबापर्यंत कसे पोहोचायचे याची काहीच सुविधा आपल्याकडे नव्हती पण लोकेशन आयडीमुळे ते काम सोपे झाले. 

(Image : Google)
(Image : Google)

वस्तीमधील महिलांच्या आरोग्याचे प्रश्न मोठ्या प्रमाणात होते, तुमच्या कामामुळे हे प्रश्न सुटण्यास मदत झाली, ती कशी? 

एक घर एक शौचालय प्रकल्प राबवत असताना आम्ही जवळपास २५ हजार शौचालयांची बांधणी केली होता. पण आपण करत असलेल्या कामाची असेसमेंट होणे गरजेचे आहे असे वाटल्याने आम्ही गोखले इन्स्टीट्यूटला अपरोच झालो. त्यांनी वस्त्यांमधील कोणतीही १०० घरे घेतली आणि शौचालय बांधणीच्या आधी आणि शौचालय बांधणीनंतर याठिकाणी राहणाऱ्या महिलांची आरोग्य तपासणी केली. अनेकदा शौचालय घरापासून दूर आहे, रात्रीच्या वेळी अंधारात कसे जाणार या कारणामुळे महिला संध्याकाळी ६ नंतर खाणे-पिणे टाळत होत्या. तसेच मासिक पाळीच्या काळातही त्यांना सॅनिटरी पॅड बदलण्यापासून अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. सार्वजनिक शौचालये रात्रीच्या वेळी बंद असणे, उघड्यावर जाण्यास रात्रीची भिती वाटणे या कारणामुळे बहुतांश महिलांना युरीन इन्फेक्शन आणि इतर इन्फेक्शन होत होते. पण घरात शौचालय आल्यानंतर महिलांच्या आरोग्याचे प्रश्न मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचे या अभ्यासात दिसून आले. 

 

Web Title: Salute to the work in the neighborhood! - Meet the image of Pune's Joshina who got a place in the list of powerful women of Forbes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.