Join us  

बिबट्याच्या हल्ल्यातून ‘तिनं’ लेकराला सोडवलं; मात्र आता जीव खाणाऱ्या जगण्याचं काय करायचं?

By meghana.dhoke | Published: February 12, 2022 6:04 PM

नाशिक जिल्ह्यातील काळूस्ते गावाजवळच्या डोंगणावर राहणाऱ्या सीताबाई घारे, तिनं बिबट्याच्या तावडीतून लेकराला सोडवलं, आता मानाचा गोदा गौरव पुरस्काही जाहीर झाला, पण तिचं डोंगरकपारीतलं जगणं मात्र..

ठळक मुद्देलेकरु वाचलं, याचंच काय ते समाधान म्हणत सीताबाई झगडतेच आहे..

मेघना ढोके

बिबट्या मानगूट पकडून लेकराला ओढून घेऊन चाललेला असताना; त्याच्यावर झेप घेत लेकराला त्याच्या तावडीतून सोडवणारी सीताबाई घारे. इगतपूरी तालूक्यातल्या काळूस्ते गावाजवळच्या फोडसेवाडीच्या डोंगणावर राहणारी. नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानने तिला नुकताच गोदा गौरव पुरस्कार जाहीर केला, साहस गटात. तिला भेटायला थेट काळूस्ते गाठलं. हे काळूस्ते गाव नाशिक-मुंबई हायवेला लागून तसं जवळ आहे. मात्र सीताबाई त्या गावाला लागून असलेल्या फोडसेवाडीच्या डोंगरावर रहायची. एक दिवस सायंकाळी ती आणि तिचा पाच वर्षांचा मुलगा एकटेच असताना, ओट्यावर खेळणाऱ्या मुलावर बिबट्यानं मागून हल्ला केला. मानगुटच पकडलं. सीताबाई लेकाला वाचवायला धावली. स्वत:च्या जीवाची पर्वा न करता, बिबट्या मुलाला ओढून नेत असताना तिनं लेकाचा हात घट्ट धरुन ठेवला आणि बिबट्या अखेरीस लेकरु सोडून पळाला. आता त्या घटनेला तीन महिने झाले. मात्र त्यानंतर सीताबाईला जगण्याचे अनेक प्रश्न छळत आहेतच..

पेपरवाले आले म्हणताच ती म्हणाली, ‘तीन महिने झाले तेच सांगतेय, एक पैशाचा उपेग नाही की मदत नाही. कर्ज काढलं पोराच्या आजारपणात तेच फेडू राहिलोय; नाशिकहून आलथे लोक, सत्कार करणार सांगून गेलेत मला, व्हईल तेव्हा खरं..आपल्याला फार मोठा, मराठी जगात अत्यंत सन्मानाचा पुरस्कार मिळाला आहे हे तर तिच्या गावीही नाही.त्याउलट, तिची लढाई वेगळीच आहे. बिबट्याच्या तोंडातून पोराला सोडवल्यानंतर धास्तावलेली सीताबाई आता आपली दोन्ही लेकरं घेऊन नवऱ्यासह काळूस्ते गावात भाड्याच्या घरात रहायला आली. अशिक्षित बाई. नवराही अशिक्षित. त्यामुळे पेपरात आपल्याविषयी काय छापून येतं, आपला काहीतरी सत्कार करणार हे तिला माहित आहे, पण त्यात काही मोठं आहे हेच तिला माहित नाही. तिचं झापवजा घर फोडसेवाडीच्या डोंगरावर आहे. डोंगर चढत तिच्यासोबत झापात गेलो. कुणालाही धाप लागावी असा चढ. लांबलांब वस्ती नाही. फक्त सन्नाटा. तिथं त्यांचं घर आहे. झापच. डोंगर उतारावर किरकोळ शेती नवराबायको करतात, यंदा अतीपावसामुळे उत्पादन फक्त तीन पोते. सीताबाईच्या सासूचे नुकतेच निधन झाले तर त्याखर्चापायी दोन पोत तांदूळ विकून टाकले. आता सीताबाईचा नवरा मजूरी कामावर जातो.

अजूनही आठवतेच सीताबाईला ती घटना. १९ ऑक्टोबर २०२१ रोजी सीताबाई डोंगरावरच्या घराबाहेर भांडी घासत बसली होती. तिचा धाकटा लेक कार्तिक खेळत होता, बिबट्यानं मागून येत सायंकाळी त्याच्यावर झडप घातली. बिबट्या लेकरु ओढत नेत होता, सीताबाईनं त्याच्या मागे धावत लेकराचा हात धरला. बिबट्या पोर टाकून पळाला. नशिब बलवत्तर कार्तिक वाचला कारण जवळ राहणाऱ्या एका कुटुंबाचा १२ वर्षांचा मुलगा आदल्याच दिवशी त्याच बिबट्यानं ठार केला होता. कार्तिक वाचला, सरकारी दवाखान्यात उपचार झाले पण हात बरा नसल्यानं त्याच्या आजारपणावर नंतरही खर्च झाला. त्यासाठी उधारउसनवारीवर त्यांनी पैसे भरले.सीताबाई सांगते, बिबट्यानं पोराची मान धरली होती, तेव्हा मी त्याचा हात सोडला नाही. एवढंच ठरवलं जे बाळाचं होईल ते माझं होईल. बिबट्यामागं धावलेच.’मात्र लेकरु वाचलं याचं समाधान असलं तरी सीताबाई आणि तिचा नवरा काळू गणपत घारे सांगतात, ‘त्या प्रसंगानंतर चौकशा लई झाल्या, पण आम्हाला सरकारी मदत नाही की हक्काचं घरकूल नाही. घरकूल मिळावं म्हणून मी अर्ज केलाय तर तो मंजूर होत नाही. पोटापुरते आम्ही नवराबायको कमावतो आणि खातो.’लेकरु वाचलं, याचंच काय ते समाधान म्हणत सीताबाई झगडतेच आहे..

टॅग्स :प्रेरणादायक गोष्टीबिबट्या