समीर मराठे
काही वर्षापूर्वीची गोष्ट. हरयाणातलं रोहतक हे शहर. मुलांच्या क्रिकेटचे सामने होणार होते. सगळे खेळाडू उत्साहानं नुसते फुरफुरत होते. पण स्पर्धा सुरू होण्याच्या आधीच एका संघातला प्रमुख फलंदाज आजारी पडला. सामने खेळणं शक्यच नव्हतं. वडिलांनी त्याला सांगितलं, ‘अशा आजारपणात तुला खेळता येणार नाही. डॉक्टरांनीही नाही सांगितलंय.’ शेजारीच उभी असलेली त्याची लहान बहीण वडिलांना म्हणाली, ये तो नहीं खेल सकता, लेकिन उसके जगह पर मैं तो खेल सकती हूं! वडिलांची परवानगी तिनं गृहीत धरली आणि क्रिकेटचे हे सामने ती खेळलीही. आपल्या भावाच्या ऐवजी आणि एक ‘मुलगा’ म्हणून! वयानं ती लहान होती. आधीच तिनं बॉयकट केलेला होता, मुलांसारखीच दिसत होती; पण ती मुलगा नसून मुलगी आहे, हे प्रतिस्पर्धी संघातल्या खेळाडूंना तरी कुठे माहीत होतं? प्रत्यक्ष स्पर्धेतही ती ‘मुलगी’ आहे, हे प्रतिस्पर्धी संघातल्या कोणीच ओळखलं नाही. या स्पर्धेत प्रतिस्पध्र्यावर ती वाघासारखी तुटून पडली, आपल्या संघाला सामने जिंकून दिले. कोण ही मुलगी? -तीचहच नाव शफाली वर्मा.
वयाच्या सोळाव्या वर्षी आणि केवळ सोळा आंतरराष्ट्रीय सामन्यांतच टी-ट्वेण्टीमधील ती जगातील पहिल्या क्रमांकाची खेळाडू बनली. शफाली वर्माने नुकतीच महिला क्रिकेटमधली फास्टेट डबल सेंच्यूरी ठोकली. जेमतेम २० वर्षांची ही मुलगी. कसोटी सामन्यात डबल सेंच्यूरी करणारी मिताली राजनंतरची पहिली भारतीय महिला खेळाडू.शफालीचं वय लहान आहे पण तिच्या बॅटचे तडाखे पाहा ती खेळते प्रचंड आक्रमक. अर्थात या टप्प्यार्पयत पोहोचण्यासाठी अनेक कसोटय़ा तिला पार कराव्या लागल्या. अर्थातच त्यातली एक कसोटी होती, ‘महिला’ असण्याची.
शफाली एका सर्वसामान्य घरातली मुलगी. तिच्या वडिलांचं सराफी व्यवसायाचं एक छोटंसं दुकान आहे. त्यांना स्वत:लाही क्रिकेटची फार आवड. आपल्या परीनं त्यांनी पुढे जाण्याचा प्रयत्न केला; पण पुरेसा पाठिंबा आणि प्रशिक्षणाअभावी आपली क्रिकेटची आवड प्रत्यक्ष मैदानावर त्यांना फार पुढे नेता आली नाही. आपलं अधुरं राहिलेलं स्वप्न आपल्या मुलांनी पूर्ण करावं असं मात्र त्यांना मनोमन वाटत होतं. त्यासाठी मग त्यांनी प्रयत्न सुरू केले. शफालीच्या घरात तशी सगळ्यांनाच क्रिकेटची आवड. त्यामुळे मोठा मुलगा साहीलला त्यांनी स्वत:च क्रिकेटचं ट्रेनिंग द्यायला सुरुवात केली.त्याचा किस्साही मजेदार आहे. साहीलला ट्रेनिंग देण्याचा पहिलाच दिवस. छोटी शफालीही या दोघांबरोबर मैदानावर गेली; पण वडिलांनी तिला सांगितलं, तू काहीच करायचं नाही. फटकावलेला बॉल फक्त आम्हाला परत आणून द्यायचा. बॉल पकडायला, आणायला तासभर शफाली मैदानात इकडून तिकडे पळत होती. शेवटी वडिलांनाच तिची दया आली आणि त्यांनी तिलाही दोन-चार बॉल बॅटिंग करायची परवानगी दिली. पण हे बॉल तिनं आपल्या मोठय़ा भावापेक्षाही जोरात टोलवले!.
शफालीच्या क्रिकेटला सुरुवात झाली ती अशी. मग गल्लीत ती मुलांबरोबर क्रिकेट खेळू लागली. पण कोणीच तिला गांभीर्यानं घेतलं नाही. उलट म्हणायचे, अरे, तू तो छोरी है. तू क्या क्रिकेट खेलेगी? चल हट. बॉल-वॉल लग जाएगा, तो रोते बैठोगी.छोटय़ा शफालीला मुलांचं हे बोलणं फार लागलं. तिला वाटलं, आपल्या मोठय़ा केसांमुळेच मुलं आपल्याला मुलगी समजतात आणि क्रिकेट खेळू देत नाहीत. एक दिवस ती तरातरा वडिलांकडे गेली आणि म्हणाली, वो लडके मुझे खिला नहीं रहे है, मैं मेरे बाल कटवा सकती हूं क्या?. वडीलही तिला म्हणाले, क्रिकेट के लिए तू कुछ भी कर सकती है.
त्याच दिवशी शफाली आपले मोठे केस कापून आली. त्या दिवसापासून ते अगदी आजर्पयत तोच तिचा हेअरकट आहे !घरेलू मैदानावर झालेले सामने असो, आपल्या हरयारणा राज्यातर्फे खेळलेले सामने असो किंवा आताच्या महिला वर्ल्ड टी-ट्वेण्टीचे. फिअरलेस शफालीनं कोणाचीच भीडभाड ठेवली नाही आणि चौकार-षट्कारांची आतषबाजी करताना प्रत्येकाला उचलून मैदानाबाहेर टोलवलं.
कुठून आली तिच्यात इतकी हिंमत आणि जिगर?
शफालीचा आजवरचा प्रवास जाणून घेण्यासाठी तिच्या वडिलांशी, संजीव वर्माशी जेव्हा बोलणं झालं तेव्हा ते हेच सांगतात की, तिच्यात उपजत टॅलेंट आहे. क्रिकेटची ती फार शौकिन आहे. क्रिकेटसाठी काहीही करायला ती तयार असते; पण इतक्या लहान वयात ती आज आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचली, जगभरातल्या महान गोलंदाजांना मोठय़ा हिमतीनं भिडतेय, याचं श्रेय तिच्यापेक्षाही तिच्यावर ज्यांनी विश्वास ठेवला, ते तिचे कोच, हरयाणा क्रिकेटचे पदाधिकारी, बीसीसीआय. अशा अनेकांना जातं.
आंतरराष्ट्रीय क्रिकेपटर्पयत पोहोचण्यासाठी शफाली, तुम्हाला काय संघर्ष करावा लागला, असं संजीव वर्मा यांना विचारल्यावर मुलीविषयीच्या अभिमानानं आणि गतकाळ आठवून गदगदत्या आवाजात ते सांगतात, उसकी मेहनत तो सब जानते है, लेकिन एक हादसा मैं जिंदगीभर नहीं भुलूंगा. २०१५मध्ये मी नोकरीसाठी ट्राय करत होतो. खर्चाचा ताळमेळ बसत नव्हता. नोकरीची गरज होती. त्यासाठी माझा आटापिटा चालला होता. माझ्या याच मानसिकतेचा एका भामटय़ानं फायदा घेतला आणि कुटुंबासाठी, मुलांसाठी जी काही पुंजी मी आजवर जमा केली होती, ती सारीच्या सारी त्या भामटय़ानं लंपास केली. तब्बल साडेसात लाख रुपये आणि बायकोच्या अंगावरचं तीन-चार तोळे सोनं. काही म्हणता काही राहिलं नाही. त्यावेळी माझ्याकडे मोजून २८० रुपये राहिले होते !. ‘आज भी वो दिन मुझे याद है. फाटलेले ग्लोव्हज घालून आणि तुटक्या बॅटीनं शफाली मैदानावर खेळत होती. मी विसरूच शकत नाही ते दिवस.’ - त्यांचा आवाज आणखी कातर झाला. यापुढे संजीव वर्मा काही बोलूच शकले नाहीत.रोहतकमध्ये श्री रामनारायण क्रिकेट अकॅडमी ही एक प्रसिद्ध आणि जुनी संस्था आहे. अश्वनी कुमार यांची ही अकॅडमी. ते स्वत: उत्कृष्ट क्रिकेटपटू आहेत आणि १९८२ ते १९९० या काळात हरयाणाकडून रणजी सामने खेळलेले आहेत. ओपनर बॅट्समन म्हणून त्यांनी आपला काळ गाजवलेला आहे. रोहतकमध्ये केवळ ही एकच अकॅडमी महिलांना क्रिकेटचं ट्रेनिंग देते. शफाली त्यांच्याच क्रिकेट अकॅडमीमध्ये शिकली.
शफालीच्या जडणघडणीबाबत अश्वनी कुमार यांच्याशी संपर्क साधला. त्यांनाही शफालीचं अपार कौतुक.ते म्हणतात, टॅलण्ट भी बहोत है. वयाच्या मानानं तिची बॉडी, फिजिक स्ट्रॉँग आहे. तिच्यात ताकदही चांगली आहे. आक्रमक शॉट्स खेळायला तिला आवडतं. हमने उसके नॅचरल गेम के साथ बिलकुल छेडखानी नहीं की. आम्ही तिला एवढंच शिकवलं, तू मार, लेकिन पहले बाउण्ड्री देख. ती किती लांब, रुंद आहे ते बघ. शॉट सिलेक्शन कर. कुठे मारायचं ते ठरव. गॅप में मारो, फिल्डर के उपर से मारो, या तो फिल्डर के आगे. बॅटिंगबरोबर तिच्या फिल्डिंगवरही लक्ष दिलं.
तिला ट्रेनिंग कसं दिलं, यावर अश्वनी कुमार सांगतात, साडेअकरा वर्षाची असताना ती आमच्या अकॅडमीत आली. आम्ही कोणतीही घाई केली नाही. तिचा कल आणि आवाका बघून तिला ट्रेनिंग दिलं. पण तिच्यातली ईर्षा आणि जोष बघून नंतर आम्ही तिला मुलग्यांबरोबर खेळायला दिलं; पण टप्प्याटप्प्यानं. आमच्या अकॅडमीत मॅचेस सुरू असतात. तिथे मुलांच्या टीमकडूनही तिला खेळवलं. आशिष होड्डा, अजित चहल, अमन कुमार. यांच्यासारखे चांगले रणजीपटू आमच्या अकॅडमीत आहेत. आशिष होड्डा तर गेल्या दहा वर्षापासून रणजी खेळतोय. या मुलांसोबतही शफालीला खेळवलं. तिच्यातलं पोटेन्शिअल ग्रुम करण्याचा प्रयत्न केला.'
पुस्तकी शॉट्स तर तिच्याकडे आहेतच; पण आजर्पयत कधीच, कोणीच न अनुभवलेले स्वत:च तयार केलेले ‘टेलरमेड’ शॉट्सही तिच्याकडे आहेत. अत्यंत कष्टानं स्वत:ला घडवत शफाली वर्मा आता स्टार होते आहे, एक तरुण खेळाडू जी भारतीय महिला क्रिकेटसाठी भरीव कामगिरी करेल अशी आशा आहे.
(लेखक लोकमत वृत्तसमूहात वृत्तसंपादक आहेत.)