Lokmat Sakhi >Inspirational > काश्मिरी तरुण गायिका जेव्हा पसायदान गाते! शमिमा अख्तर सांगते, गाण्यासह भक्तीचं शब्दांपलिकडचं नातं..

काश्मिरी तरुण गायिका जेव्हा पसायदान गाते! शमिमा अख्तर सांगते, गाण्यासह भक्तीचं शब्दांपलिकडचं नातं..

Shameema Akhtar Kashmiri Singer : काश्मिरी गायिका शमिमा अख्तर मराठी भजनं अतिशय तल्लीनेतेनं गाते आणि सांगते सुरांची शब्द-भाषा-जात-धर्मापलिकडची गोष्ट.

By सायली जोशी-पटवर्धन | Published: June 14, 2023 01:44 PM2023-06-14T13:44:56+5:302023-06-14T17:14:06+5:30

Shameema Akhtar Kashmiri Singer : काश्मिरी गायिका शमिमा अख्तर मराठी भजनं अतिशय तल्लीनेतेनं गाते आणि सांगते सुरांची शब्द-भाषा-जात-धर्मापलिकडची गोष्ट.

Shamima Akhtar Kashmiri Singer : When a young Kashmiri singer sings Pasaidan! Shamima Akhtar says, Bhakti's relationship with song is beyond words.. | काश्मिरी तरुण गायिका जेव्हा पसायदान गाते! शमिमा अख्तर सांगते, गाण्यासह भक्तीचं शब्दांपलिकडचं नातं..

काश्मिरी तरुण गायिका जेव्हा पसायदान गाते! शमिमा अख्तर सांगते, गाण्यासह भक्तीचं शब्दांपलिकडचं नातं..

सायली जोशी-पटवर्धन

काश्मिरच्या बांदिपुरा भागात ‘ती’ लहानाची मोठी झाली. अगदी ६ महिन्याची होती, आईच्या कुशीतच तेव्हा एकदा त्यांच्या बसला दहशतवाद्यांनी घेरलं. आईच्या हाताला गोळी लागली आणि ती बेशुद्ध पडली. त्यावेळी साधारण तीन तास हे लहानसं बाळ- शमिमा त्या बसमध्येच होतं. याच हल्ल्यात तिची सख्खी आत्या मारली गेली. आजुबाजूला काय सुरू आहे हे समजण्याचं वय नव्हतंच, पण विखार पाहतच ती मोठी झाली. आज ही तरुणी धर्म, जात, भाषा या सगळ्याच्या पलिकडे जात आपल्या आवाजाने शांतता आणि एकतेचा संदेश देते. एकीकडे धर्मावरुन इतकी तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असताना ही तरुणी आपल्या गोड आवाजाने ‘आता विश्वात्मके देवे’...म्हणते. माझे माहेर पंढरी म्हणत विठ्ठलाची आळवणी करताना तिच्या गळ्यातच नाही तर मनातही ते भाव किती ओतप्रोत भरलेले आहेत याचा अनुभव आपल्याला येतो (Shameema Akhtar Kashmiri Singer). 

मूळची काश्मिरची असलेली शमिमा अख्तर. तिथेच लहानाची मोठी झाली. आई-वडीलांच्या घरातून संगीताचा वारसा लाभलेला असल्याने कानावर सतत सूर येत होते. आजोबा काश्मिरमधील प्रसिद्ध संत कवी. त्यामुळे त्यांच्या कव्वाली ऐकत या लहानग्या शमिमावर गाण्याचे संस्कार होत होते. एकीकडे दहशतवादाचे सावट असतानाही सूरांची कास धरत तिचे आयुष्य फुलत गेले. आजोबांचे गाणे ऐकताना तिही कधी गायला लागली तिचे तिलाच कळले नाही असे ती सांगते. आई-वडील, शाळेतील शिक्षक यांच्या पाठींब्यामुळे तिचं गाणं बहरत गेलं. संगीतााकडे ओढा असल्याने पालकांनीही तिला त्यासाठी प्रोत्साहन दिलं. 

लखनऊ विद्यापीठातून गाण्याची रितसर पदवी घेतल्यानंतर शमिमाने पुण्यातील सरदह (Sarhad) संस्थेच्या आर्ट फेस्टीव्हलमध्ये सहभाग घेतला. काश्मिरी विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची दारे खुली करणारे सामाजिक कार्यकर्ते संजय नहार यांनी शमिमाला पुण्यात आणले. काश्मिरमधील तरुण तरुणींच्या जीवनाला आकार देण्याचे काम अनेक वर्षांपासून सरहदच्या माध्यमातून केले जाते. पंढरीची वारी पुण्यात असताना शमिमाने लोकमत कार्यालयाला भेट दिली आणि विठ्ठलाचे अभंग म्हणत तिने आपल्या आवाजाची जादू दाखवून दिली. पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल म्हणणारी शमिमा विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन होते. सगळ्यात आधी आपण ज्ञानेश्वरांचे पसायदान म्हटले आणि त्यानंतर माझे माहेर पंढरी म्हटले तेव्हा जगभरातून आपल्याला या दोन्हीसाठी खूप मोठ्या प्रमाणात लोकांकडून प्रेम मिळाले. त्यांची दाद माझ्यासाठी खूप प्रोत्साहन देणारी होती असे शमिमा सांगते.

शमिमा सांगते, काश्मिरी, ऊर्दू भाषा बोलत असताना हिंदी, मराठी भाषा समजून घेणे काहीसे कठिण गेले. पण मग सुरुवातीला ऊर्दू आणि इंग्रजीमध्ये तो अभंग लिहून काढणे, प्रत्येक मराठी शब्दाचा अर्थ समजून घेणे, त्याचा उच्चार शिकणे अशा प्रक्रियेतून हळूहळू मी मराठी शिकले. अर्थ समजून घेतल्याशिवाय तो रसिकांपर्यंत पोहोचवणे शक्य नसते, त्यामुळे मी प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून घेतला आणि मगच तयारी केली, अर्थ समजल्यावर त्यावर काम करणे आणि गाण्यातून किंवा सुरांतून तो फिल रसिकांना देणे सोपे जाते. विठ्ठलाचे अभंग गायल्यावर आपल्याला महाराष्ट्रातूनच नाही तर पाकिस्तानमधूनही असंख्य चांगल्या प्रतिक्रिया आल्या, ज्या खऱ्या अर्थाने माझा आत्मविश्वास वाढवणाऱ्या होत्या. काश्मिरमध्ये सुफीयाना संगीताला खूप महत्त्व आहे. तसेच याठिकाणी लोकगीते मोठ्या प्रमाणात गायली जातात. येत्या काळात जास्तीत जास्त भाषांमध्ये संगीताचा प्रचार प्रसार करायचा असून संगीत ही एक उत्तम कलाकृती आहे त्याला भाषेचे, धर्माचे कोणतेही बंधन नाही. शांतता, आनंद प्रस्थापित करण्याचे हे एक उत्तम माध्यम आहे हे सर्वांनी लक्षात घ्यायला हवे.

 

Web Title: Shamima Akhtar Kashmiri Singer : When a young Kashmiri singer sings Pasaidan! Shamima Akhtar says, Bhakti's relationship with song is beyond words..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.